Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगावची पहिली टॅक्सी चालक सुनीता

-विशाल चढ्ढा

जळगावची पहिली टॅक्सी चालक सुनीता
WDWD
पुरूषप्रधान संस्कृतीत अबला समजल्या जाणार्‍या महिलांनी एक पाऊल पुढे टाकून आपणही आता पुरूषांपेक्षा कमी नाही, हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गोडवाडी या छोट्याशा गावात राहणार्‍या सुनीता सोनवणेने सिद्ध केले आहे.

सुनीता जळगाव जिल्ह्यातील पहिली महिला टॅक्सी चालक बनली आहे. जीवनात सुख-दु:खाचे कालचक्र हे निरंतर फिरतच असते. दु:ख हे सुखाची नांदी असते, असे म्हटले जाते. परंतु सुनीताला आलेले अनुभव फारच निराळे आहेत. जन्मापासून सुनीताच्या जीवनात दु:खाची मालिका सुरू आहे.

लहान असतानाच सुनीताचे आई-वडीलाचे छत्र नाहीसे झाले. अशा परिस्थितीत सुनीताचा तिच्या आजीने सांभाळ केला. तिला लहानाचे मोठे केले. सुनीताचे योग्य वयात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील तरूणासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर सुनिताचे वैवाहीक जीवन हसत खेळत गेले. परंतु काही दिवसातच सुनिताला तिच्या नवर्‍याचे खरे रूप कळले. तिचा नवरा दारूला आधीन झाला होता. सुनीताचा दररोज त्याच्याकडून शाररीक तसेच मानसिक छळ होत असे. नवर्‍याच्या त्रासाला विरोध केला तर पुरूषप्रधान समाज आपल्याला जगू देणार नाही, या भीतीने सुनीता नवर्‍याचा जाच मुकाटपणे सहन करत राहिली. अशा कठीण परिस्थितीत सुनीताला दोन मुले झाली. परंतु नवर्‍याच्या दररोजच्या जाचाला कंटाळून सुनीता आपल्या चिमुरड्यांना घेऊन आपल्या आजीकडे पाचोर्‍याला आली.

चारही बाजूने दु:खाचे डोंगर असलेल्या खाईत सापडलेल्या सुनीताला काय करावे सुचत नव्हते. नातेवाईकानी सुनीताकडे पाठ फिरवली होती. तिला तिच्या आजीचाच सहारा होता.

तिने संघर्ष चालूच ठेवण्याचे ठरविले. तिने स्वबळावर धान्याचा लहान उद्योग सुरू केला, परंतु त्यातही अपयशच आले. संकटाच्या कात्रीत सापडलेल्या सुनीताला तिची मैत्रिण लक्ष्मीचा सल्ला फायदेशीर ठरला. लक्ष्मीच्या मार्गदर्शनाने सुनीताने टॅक्सी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वित्त पुरवठा करणार्‍या एका खाजगी संस्थेने सुनीताला अर्थसाह्य केले व त्यातून टॅक्सी खरेदी करून भाड्याने चालवायला दिली. तरी देखील सुनीताच्या मागे लागलेले समस्याचे भूत पिच्छा सोडायचे नाव घेत नव्हते. टॅक्सी घेतली तरी चालवणारे इतर चालक असल्याने ते सुनीताला फसवत. अखेर सुनीता स्वत: टॅक्सी चालवायला शिकली. ती चालवण्याचा परवाना मिळवला. आता ती स्वत: टॅक्सी चालवून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

गेल्या एक वर्षापासून ती टॅक्सी चालवते आहे. तिच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भारही हळूहळू हलका होत आहे. सुनीताची मुले शिर्डी येथील वसतीगृहात आहेत. मोठा मुलगा पाचवीत तर लहान दुसरीच्या वर्गात आहे. सुनीताला तिच्या सासू- सासर्‍यापासून कुठल्याच प्रकारची अडचण नाही. आता महाराष्ट्र पोलीस सेवेत भरती होण्याचे सुनीताचे स्वप्न आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुनीताला पोलीस वाहन चालक होण्याची इच्छा आहे. संघर्षपूर्ण जीवनातून स्वबळावर सावरलेल्या सुनीताला यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा..!
webdunia
WDWD

Share this Story:

Follow Webdunia marathi