महिला वर्गात लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत नेलपेंट किंवा नेलपॉलिश लावणे ही आवडीची गोष्ट आहे. आजकाल तर नेल आर्ट नावाने विविध डिझाईन्स नखांवर नेलपेंटच्या साहाय्याने काढून घेण्याचा ट्रेंडही लोकप्रिय होतो आहे. सणासमारंभात हातावर मदी तसे नखांवर नेलपॉलिश हवे हे आता मगे पडले असून दररोज नखे नेलपेंटने रंगवायची फॅशन तरूणींमध्ये रूजली आहे. दर दोन तीन दिवसांनी वेगळ्या रंगाचे, वेगळ्या ढंगाचे नेलपॉलिश नखांवर चढविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मात्र असे वारंवार नेलपॉलिश लावणे नुकसानकारक ठरू शकते याची जाणीव किती जणींना असते कुणास ठाऊक?
नेलपेंट दर दोन-तीन दिवसांनी बदलायचे तर आधीचे नेलपेंट रिमूव्हरने काढून टाकावे लागते. या रिूमूव्हरमध्ये असलेल्या असिटोनमुळे नखांतील नैसर्गिक तेल व आर्द्रता शोषली जाते परिणामी नखे कोरडी पडतात. स्वस्तातले नेलपेंट वापरले जात असेल तर त्यात रसायनांचा वापर अधिक असतो व त्यानेही नखांचे नुकसान होते. नखे हा
तुमच्या आरोग्याचा आरसा असतो. पूर्वी डॉक्टर नखे व जीभ तपासूनच प्रकृतीचे निदान करत असत. त्यामुळे नेलपॉलिश वापरताना कमी रसायने असतील हे तपासून मगच वापरले जावे ही काळजी घ्यायला हवी.
आजकाल व्हिटॅमिन असलेली नेलपॉलिशही बाजारात आली आहेत. ती नखांना पोषण देतात असा दावा केला जातो. मात्र त्यातील सत्यता पडताळूनच अशी नेलपॉलिश वापरावीत. नेलपॉलिश सतत वापरण्याने नखे पातळ होतात व तुटतात. त्यामुळे अधूनमधून नेलपॉलिशला पूर्ण सुटी द्यावी. रोज किमान 10 मिनिटे तरी नखे कोमटपाण्यात बुडवून ठेवावीत. यामुळे नखांत पुरेशी आर्द्रता राहते व ती शुष्क होत नाहीत. अनेकदा फंगसमुळे नखे पिवळी पडतात. त्यामुळे बेसकोट लावल्याशिवाय नखांवर नेलपॉलिश लावू नये.
अनेकदा नवीन नेलपॉलिश लावताना जुने खरडून काढले जाते. हे पूर्ण टाळावे. खरडल्यामुळे नखांचे वरचे आवरण कमजोर बनते व नखे अधिक नाजूक होतात व भेगाळतात.
हे दुष्परिणाम लक्षात घेऊनच नेलपॉलिश किती वापरायचे याचा निर्णय घेणे योग्य ठरते.