मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरं केले जाते. महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड हे श्रीमहादेवाचा एक अवतार.
खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात.
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचावध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.
कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रुप घेउन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ला या दैत्यांचा पराभव करत संहार केला.
हा दिवस म्हणजे चंपाषष्ठी असे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरु होते. सहा दिवसांचे हे नवरात्र असून ह्याला चंपाषष्टी असे म्हटले जाते. मार्गशीर्ष प्रतिपदे पासून शुद्ध षष्ठी पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते.
कुळाचार प्रमाणेच सुघट व टाक असतात. दररोज माळी सुघट या घटावर लावल्या जातात. नंदादीप किंवा अखंडदीप प्रज्वलित केले जाते. जेजुरी प्रमाणेच इतर देऊळात पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो. वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्यात समावेश असतो आणि हेच नेवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केले जाते.
भंडारा (हळद) आणि खोबऱ्याची उधळण केली जाते. खंडोबाला भंडारा आणि खोबरे प्रिय आहे. मार्गशीर्षाच्या महिनेतला पहिला दिवस देवदिवाळी असत. ह्या दिवशी ग्रामदैवत, कुलदैवत यांची पूजा केली जाते. हा दिवस त्यांना आव्हाहन करण्याचा दिवस असतो. वडे, घारघे, आंबोलीचा नैवेद्य दाखवतात. चंपाषष्टी महाराष्टात मोठा सण आहे. आणि मोठ्या उत्साहात साजरा होतो.
सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे.
'सदानंदाचा येळकोट येळकोट'"येळकोट येळकोट जय मल्हार"
Edited By- Priya Dixit