प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात
ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना
ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.
जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने
विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.