Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण : यंग्राड

चित्रपट परीक्षण : यंग्राड
, शनिवार, 7 जुलै 2018 (14:17 IST)
कलावंत : शरद केळकर, शशांक शेंडे, सविता प्रभुणे, विठ्ठल पाटील, शंतनु गंगणे, जीवन करळकर, चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, निकिता पवार 
दिग्दर्शक : मकरंद माने 
सिनेमा प्रकार : Adventure,Romantic Comedy
कालावधी : 2 hrs. 12 Min.

झोपडपट्टी किंवा तत्सम परिसरात घडणार्‍या गुन्ह्यांकडे किंवा घटनांकडे आपण नेहमीच अधोविश्र्व म्हणून बघतो आणि अनेकदा कुत्सितपणे त्यांची हेटाळणीही करतो. परंतु त्याचवेळी तेही आपल्या एकूणच जगण्याचा एक भाग आहेत, हे सोयीस्करपणे विसरतो. कळत नकळत त्यांनाही स्वप्नं बघायचा अधिकार आहे, हेच नाकारतो. या नाकारलेपणातूनच जन्माला येते 'यंग्राड'सारखी टोळी. त्यांना जेवढं नाकारावं, तेवढे ते अधिकाधिक बिघडत जाण्याची किंवा प्रसंगी खूनखराबा करण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी खरी गरज पौगंडावस्थेतलं त्यांचं जगणं समजून घेण्याची असते. नाहीतर जगणं सुरू होण्याआधीच ते अचानक संपून जातं.
 
...अशा अनेक शक्याशक्यता 'यंग्राड' आपल्यासमोर विक्या (चैतन्य देवरे), अंत्या (सौरभ पाडवी), मोन्या (शिव वाघ), बाप्पा (जीवन करळकर) यांच्या माध्यमातून साकारतो. 'यंग्राड' हा स्थानिक बोलीभाषेतला शब्द असून, तो नाशिककडे उनाड मुलांसाठी वापरला जातो. नाशिकच्या घाट आणि मार्केट यार्ड परिसरात 'यंग्राड'ची कथा घडते. एकाच वर्गात, एकाच परिसरात आणि काहीशा एकाच सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक वातावरणात वाढलेले चार मित्र. अभ्यासात फार गम्य नसलेले आणि मौजमस्तीतच रमलेले. मौजमस्ती तर सारेच करतात. परंतु हीच मौजमस्ती अभावग्रस्तांनी केली, तर त्यांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे निघतात, ते 'यंग्राड' अधोरेखित करतो. किंबहुना चुकूनमाकून कुणी गुन्हेगारी विश्र्वाकडे वळला, आणि कालांतराने त्याला त्यातून बाहेर पडायचं असेल, तर गुन्हेगारीतील दादामंडळी आणि पोलिसांची हातमिळवणी, त्याला बाहेर कसं पडू देत नाही, यावरही हा सिनेमा भाष्य करतो. तेव्हा 'यंग्राड' टोळीचं पुढे नेमकं काय होतं, ते कळण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मानधन ठरवण्याचे निकष हवेत- आलिया