कथा : आपल्या बापजाद्यांपासून सुरू असलेला प्रेते जाळण्याचा व्यवसाय.. व्यवसाय म्हणता येणार नाही.. गावाने टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना थोडीफार कमाई होत होती. जगण्याचे तेच साधन होते. गावात कुणी मेले म्हणजे श्रीपती (उपेंद्र लिमये) खूश व्हायचा.. आपल्या कुटुंबाला चार घास मिळतील म्हणून आशा पल्लवित व्हायच्या; परंतु त्याच्या मुलाला म्हणजे कृष्णाला (हंसराज जगताप) याला वडिलोपार्जित या धंद्यात पडायचे नव्हते. स्मशानात भुतासारखे राहायचे नव्हते. त्याला शिकून आपल्या कुटुंबाला त्या नरकयातनांतून बाहेर काढायचे होते. कृष्णाच्या आईलाही (उषा जाधव) तसेच वाटत होते.. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.. मनातल्या मनात बांधलेले इमले श्रीपतीला सर्पदंश होऊन झालेल्या मृत्यूमुळे मातीस मिळाले.. मग कृष्णावर प्रेते जाळण्याची वेळ येते.. त्यातून त्याची सुटका होते का? त्याच्या मनात शिकण्याची असलेली ऊर्मी पूर्ण होते का? या सार्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला धग मधून पाहायला मिळतील. हृदयाला चटका लावणारी कथा असलेली हा 'धग' चित्रपट आहे.
अभिनय : उपेंद्र लिमये, उषा जाधव, हंसराज एकूण सर्वांनीच सुंदर अभिनय केला आहे. स्मशानातील जीवन अगदी जिवंत केले आहे!
दिग्दर्शक : शिवाजी पाटील यांनी आपल्या सर्मथ लेखणीतून आणि विचारांतून हा चित्रपट बांधला आहे. अतिशय सक्षम अशी बांधणी असून कुठेही भरकटू दिला नाही. प्रत्येक प्रसंग आणि चित्रचौकट व्यवस्थित तयार झालेली आहे. त्याला साजेसा असा अभिनय आहे. आणि त्यामुळे कथा थेट काळजात घुसायला मदत होते.
पटकथा-संवाद : नितीन दीक्षित यांची पटकथा आणि संवाद चपखल आणि काळजाला भिडणारी आहे. छोट्या पण दमदार संवादातून त्यांनी कथेला योग्य वेग आणि प्रवाह देण्यात यश मिळवले आहे.
संगीत : आदिरामचंद्र यांचे पार्श्वसंगीत आणि त्यांनी केलेले पार्श्वगायन अतिशय चपखल आहे.
छायादिग्दर्शन : नागराज दिवाकर यांचे छायादिग्दर्शन अतिशय चांगले आहे. स्मशानातील वातावरण आणि घर यांच्यातील दुवा बनलेले त्यांचे छायाचित्रण महत्त्वाची भूमिका निभावते.
थोडक्यात : काळजाला भिडणारा, स्मशानातील जीवनावर प्रकाशझोत टाकणारा.. एक ज्वलंत चित्रपट.. प्रत्येकाने पाहायला हवा.. असाच चित्रपट! सन्ना मोरे