Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अतुल्य' अभिनेता

'अतुल्य'  अभिनेता

मनोज पोलादे

मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तब्बल दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अभिनयाची पावती मिळवली आहे. अभ्यासू अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुलला आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे चाकोरीबाहेरचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अतुलचा जन्म बेळगावचा. त्याचे शिक्षण झाले ते सोलापूरात.

शिक्षणात अतुलची गती साधारणच होती. म्हणजे सांगायचं झालंच तर बारावीला तो दोनदा परीक्षेला बसला आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा त्याला तीनदा द्यावी लागली. मग त्यानंतर त्याने आपल्या अंतर्मनाला साद देत आपला कौल असलेल्या कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचे नक्की केले.

त्यासाठी पुन्हा सोलापूरात आला. इंग्रजी साहित्य घेऊन त्याने पदवी घेतली. इंग्रजी साह्त्यि वाचनाने त्यांच्या सृजनाला, अभिव्यक्तीस वाट मिळाली अन जाणीवा समृद्ध होत गेल्या. याच काळात तो नाटकांशीही जोडला गेला. सोलापूरच्या नाट्य आराधना या ग्रूपबरोबर काम करायला सुरवात केली.

सुरवातीला दोन वर्षे तर पडद्यामागचा कलाकार होता. नंतर त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि नंतर मिळतच राहिली. आता त्याने या क्षेत्राचा गंभीरपणे विचार सुरू केला आणि त्यासाठी शास्त्रसुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्याने दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात' प्रवेश घेतला.

तेथे त्याला मार्गदर्शन मिळाले ते नसरूद्दीन शहा, रतन थिय्यम आदी मान्यवरांचे. येथेच त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्याच्यातला कलाकार बाहेर आला. एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर त्याने पहिले व्यावसायिक नाटक केले ते देवदास व गांधींजींमधील संघर्ष मांडणारे गांधी विरूद्ध गांधी. यात त्याने गांधीजींची भूमिका केली.

अतुलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक हिंदी व गुजरातीतही झाले. तेथेही ते कौतुकास पात्र ठरले. त्याच्या भूमिकेला गुजरात सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एडससंदर्भात माहिती देणारे 'क्रॉसरोडस तसेच मृच्छकटिकम, रतन थिय्यम दिग्दर्शित 'थंबानालू, गिरीश कर्नाड लिखित 'अंजु मलिगे' ही काही नाटके केली. ही सर्व नाटके वेगळ्या प्रकारची आहेत.

सद्या अतुल गुलजार यांच्या कवितांवर आधारीत 'खराशे' चे प्रयोग करतो आहे. मराठी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. 'देवराई' चित्रपटात त्यांनी साकारलेली स्किझोफ्रेनिक पात्राची भूमिका दाद मिळवून गेली. 'चकवा, दहावी फ, वास्तुपूरष, हे त्याचे अन्य काही चित्रपट. अतुल खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो हिंदी चित्रपटांमुळे.

कमल हासनच्या 'हे राम' मधील अभ्यंकर या पात्रातील अभिनयानेच त्याने चुणूक दाखवली होती. त्याचे फळही त्याला सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले. त्यानंतर मग 'चांदनी बार, पेज थ्री, खाकी, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम' या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.

शिवाय त्याने काही इतर भाषक म्हणजे इंग्रजी, तेलगू, कन्नड चित्रपटातही काम केले आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलाकार हा नेहमी स्वतच्या अभिव्यक्तीबाबत असमाधानी असतो. पूर्णत्वासाठी त्याचा स्वतःशीच संवाद सुरू असतो. आपण रंगविलेल्या पात्रांचा अभ्यास करीत कच्चे दुवे हेरून त्याला पूर्णत्व देतानाच कलेच्या अभिव्यक्तीबाबत विविध प्रयोग करीत असतो.

अतुलला हे सारे तंतोतंग लागू पडते. ‍त्यासाठी त्यांनी रंगभूमीशी आपले नाते आजही कायम ठेवले आहे. अतुल केवळ अभिनेता नाही, तर त्याच्यात एक संवेदनक्षम माणूसही दडला आहे. म्हणून नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मेधा पाटकरांनी दिल्लीत आंदोलन केले होते.

त्यावेळी तेथेच असणाऱ्या आमीर खान व अतुल कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता व त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतरही तो आपल्या भूमिकेशी ठाम होता.

अतुल कुलकर्णी अभिनित चित्रपट : चांदनी बार, हे राम, सत्ता, कैरी, देवराई, खाकी, दम, रंग दे बसंती , मानसरोवर, गोवर‍ी, केडी

नाटके ः समुद्र, माणूस नावाचे बेट, गांधी विरूद्ध गांधी, आपण सारेच घोडेगावकर, झाले मोकळे आभाळ

पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार ः सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (चांदनी बार)

राष्ट्रीय पुरस्कार ः सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (हे राम)













Share this Story:

Follow Webdunia marathi