मराठी चित्रपटातील सोशिक सून असे अलका कुबल यांचे वर्णन केल्यास ते वावगे ठरणार नाही. मराठीत सासर-माहेर चित्रपटांची लाट आणण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. सामान्य घरातून आलेल्या अलका कुबल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
कै. दत्ता भट आणि शांता जोग यांच्याबरोबर त्यांनी बालकलाकरार म्हणून नटसम्राट या गाजलेल्या नाटकाचे तब्बल अडीचशे प्रयोग केले. याशिवाय 'संध्याछाया, वेडा वृंदावन, मी मालक या देहाचा ही नाटकेही केली. मधल्या काळात गुजराती, भोजपुरी चित्रपटही केले.
नायिका म्हणून सुस्थापित होण्यासाठी त्यांना अण्णासाहेब देऊळकर यांचा 'लेक चालली सासरला' या चित्रपटाची वाट पहावी लागली. यात हुंडाबळी असलेल्या सुनेची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली हा चित्रपट तुफान चालला. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
यानंतर दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांचा 'माहेरची साडी' हा चित्रपट आला. त्यात कुबल यांची सोशिक सूनेची मध्यवर्ती भूमिका होती. हा चित्रपट सुपरहीट ठरला. मराठीत बऱयाच काळानंतर एखाद्या चित्रपटाने एवढे यश मिळविले होते. या चित्रपटाने अलका कुबल हे नाव राज्यात घरोघर जाऊन पोहोचले.
त्यांची सोशिक सून ही प्रतिमा आणखी गडद झाली. त्यामुळे त्यानंतर त्यांना अशाच भूमिका जास्त येऊ लागल्या. या चित्रपटांनाही बऱयापैकी यश लाभले. त्यामुळे त्या बऱयाच काळ अशा चित्रपटांमध्ये अडकल्या. वास्तविक रिक्षावाली, रणांगण, जखमी कुंक यांत त्यांच्या भमिका काहीशा वेगळ्या आहेत.
या चित्रपटांनंतर धार्मिक चित्रपटांची लाट आली. त्यातही अनेक देवतांच्या भूमिकेत त्यांना होत्या. हे चित्रपट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चालले. त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले. हिंदीत केवळ तीन चित्रपट केले.
अलका कुबल यांचे काही चित्रपट :
लेक चालली सासरला
माहेरची साडी
नशीबवान
स्त्रीधन
पोरीची कमाल बापाची धमाल
तुझ्यावाचून करमेना
नवसाचे पोर
मधुचंद्राची रात्र
बाळाचे बाप ब्रम्हचारी
झाकली मुठ सव्वालाखाची
बंडलबाज
आंधळा साक्षीदार
दुर्गा आली घरा
वाट पाहते पुनवेची
कमाल माझ्या बायकोची
17. वादळवार सुटलं गं
सोबती
येडा की खुळा
धरलं तर चावतय
माहेरचा आहेर