‘स्वप्नाली लाड हिच्या प्रकरणानंतर रिक्षातून एकट्या महिलेला प्रवासाची दहशत बसली होती. शूटिंगवरून रात्री-अपरात्री एकाकी घरी परततांना भीती वाटू लागली आहे. अनेकदा घराखाली फेरफटका मारतांनाही असुरक्षित वाटते’, अशा शब्दांत आघाडीची मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने सध्याच्या भयग्रस्त परिस्थितीबाबत तरुणींची मानसिकता वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर एकाकी महिला प्रवाशांनी स्मार्ट ओळखपत्र असलेल्या रिक्षांमधूनच प्रवास करावा, असे आवाहन मृणालने केले. या स्मार्ट कार्डासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सदस्यांची माहिती फॉर्मद्वारे गोळा केली. त्या आधारे तयार झालेल्या स्मार्ट कार्डाचे वाटप पोलीस रिक्षामालकांना करत आहेत. आतापर्यंत पाच हजार रिक्षामालकांनी त्यासाठी नोंदणी केल्याची माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. या कार्डसाठी रिक्षामालकांना अवघा शंभर रुपये खर्च करावा लागत आहे.