Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जब्बार पटेल : सर्जनशील दिग्दर्शक

जब्बार पटेल : सर्जनशील दिग्दर्शक

मनोज पोलादे

प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांची ओळख आहे. ' सिंहासन, सामना, जैत रे जैत, मुक्ता' असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. वेगळा विषय, वेगळा आशय नि वेगळी मांडणी हे पटेल यांचे वैशिष्ट्य.

डॉक्टरकीसाठी स्टेथेस्कोप हाती धरलेल्या जब्बार यांना त्यापेक्षा कॅमेरा अधिक खुणावत होता. त्यामुळे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले तरी करीयर केले ते मात्र चित्रपट क्षेत्रात. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखन, दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले.

अनेक एकांकिका, नाटकं बसवली. नाट्य स्पर्धा गाजवल्या. त्यांचा सपूर्ण गोतावळाच कलावंतांचा. यात अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी मंडळीही होती. शिक्षण डॉक्टरकीचं पणं पींड हा संपूर्णतया कलावंतांचा. याकाळात त्यांचा नाट्यसंस्था व कलावंतांशी संपर्क आला.

डॉ. जब्बार पटेलांनी त्यानंतर संपूर्णतः नाट्य व चित्रपट क्षेत्रास वाहून घेवून एकाहून एक सरसं नाटक व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट त्यांच्या कारकिर्दीवर कळस ठरविणारा ठरला. कारण अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब होती. मात्र, पटेल यांनी ती करून दाखवली. अतिशय उत्कृष्ट जमलेल्या या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळविले.

या चित्रपटाने त्यांची गणना अव्वल दिग्दर्शकात होऊ लागली आहे. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषात हा चित्रपट अनुवादित झाला आहे. पटेलांनी थिएटर अँकेडमी नावाच्या प्रयोगात्मक नाट्य संस्थेची स्‍थापना केली आहे.

सत्तरच्या दशकात विजय तेंडूलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने सामाजिक व सांस्कृतिक वातावरण ढवळून काढले होते. या नाटकाचे पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत.

कुसुमाग्रजांवरील त्यांचा लघुपट प्रसिद्ध आहे. शिवाय इंडियन थिएटर, लक्ष्मण जोशी, मी एस. एम. हे त्यांचे इतर काही लघुपट. सध्या ते महात्मा फुलेंवर चित्रपट काढण्यात व्यस्त आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सध्या ते अध्यक्ष आहेत.


जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट-

सामना
सिहासन
उंबरठा
एक होता विदुषक
डॉ बाबासाहेब आंबेडकर
मूक्ता
जैत रे जैत
मुसाफिर
पथिक

Share this Story:

Follow Webdunia marathi