Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीवनात 'चव' आणते ती 'लावणी'

जीवनात 'चव' आणते ती 'लावणी'

अभिनय कुलकर्णी

webdunia
NDND
''लावणीचे तीन अर्थ आहेत. लावणी म्हणजे लावण्य, लावणी म्हणजे पिकाची लावणी आणि तिसरा आणि माझ्या मते महत्त्वाचा असलेला अर्थ थोडासा वेगळा आहे. लवण म्हणजे संस्कृत भाषेत मीठ. हे मीठ जेवणात नसेल तर जेवणात चव रहाणार नाही. त्याचप्रमाणे लावणी आपल्या जीवनात नसेल तर आयुष्याला चव येणार नाही. नुसतं डोळा मारणं म्हणजे लावणी नव्हे'' नृत्यसमशेर या नावाने ज्यांची कीर्ति दिगंत झाली आहे, त्या माया जाधव लावणीची फोड करून सांगत होत्या.

लावणीला अवघं आयुष्य वाहून घेतलेल्या मायाताई आजही म्हणजे वयाच्या ५२ व्या वर्षी पायात चाळ घालून नृत्य करतात तेव्हा बिजली नाचतेय असं वाटतं. त्यांना बोलतं केलं तेव्हा अनेक बाबी सामोर्‍या आल्या. ज्या काळात मायाताई या क्षेत्रात उतरल्या त्यावेळी चांगल्या घरातल्या मुली या क्षेत्रात यायला फारशा तयार नसायच्या. मायाताईंच्या मते आता मात्र, काळ बदलला आहे. पांढऱपेशा वर्गातल्या मुलीही आता या क्षेत्रात येऊ लागल्या आहेत. लोककला आता विशिष्ट समाजापर्यंत मर्यादीत राहिलेली नाही. बदललेली सामाजिक बाजूही त्याला बरीचशी कारणीभूत ठरलेली आहे, असे त्यांचे निरिक्षण आहे.

त्या म्हणाल्या, मी चीन व पाकिस्तान सोडून जवळपास सर्व प्रमुख देश फिरले आहे. जिथे जिथे गेले तिथे तिथे मला चांगला प्रतिसाद मिळाला. पॅरीसच्या आयफेल टॉवरखाली नृत्य करण्याचीही संधी मला मिळाली.
webdunia
लावणीने मायाताईंना काय नाही दिलं? अगदी चोवीस देशांत फिरण्याची, तेथे महाराष्ट्राची ही लोककला सादर करण्याची संधी दिली. त्याविषयीचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, मी चीन व पाकिस्तान सोडून जवळपास सर्व प्रमुख देश फिरले आहे. जिथे जिथे गेले तिथे तिथे मला चांगला प्रतिसाद मिळाला. पॅरीसच्या आयफेल टॉवरखाली नृत्य करण्याचीही संधी मला मिळाली. पहिल्या दिवशी तर तेथे लाख-दोन लाख लोक आले होते. पण दुसर्‍या दिवशी ही संख्या चार ते पाच लाखांवर पोहोचली होती.

मायाताईंना इस्त्रायलमध्ये आलेला अनुभव फार ह्रदयस्पर्शी आहे. त्याविषयी त्या म्हणाल्या, इस्त्रायलमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा लोकांना तो फार आवडला. पडदा पडल्यानंतर तर अनेक मुली चक्क रडत होत्या. त्यांनी नंतर माझ्याशी बोलताना लावणी नृत्य शिकण्याची इच्छा दाखवली. एवढे दिवस थांबता येणे मला शक्य नव्हते. पण तरीही मी त्यांना काही बाबी शिकवल्या. त्यानंतर मग तेथे लावणी नृत्याच्या स्पर्धाच व्हायला लागल्या. दुसर्‍यांदा मी इस्त्रायलमध्ये गेले तेव्हा मधल्या काळात त्या मुलींना जे शिकलं होतं ते माझ्यासमोर सादर केलं. लोक किती प्रेम करतात आपल्यावर या भावनेनं मला तर अगदी भरून आलं.

अवघ्या देशभर प्रेम मिळालं तरी महाराष्ट्रात मात्र लावणीची काहीशी उपेक्षाच होते, असा मायाताईंचा सूर आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा कोणत्याही ठिकाणी गेलं तरी महाराष्ट्राचं लोकनृत्य म्हणून कौतुक होतं. पण महाराष्ट्रात मात्र या कलेला जगविण्यासाठी फार गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. असे त्यांचं म्हणणे आहे. अकलूजला होणारा व मुंबईत होणारा लावणी महोत्सव सोडला तर बाकी काही होत नसतं, असं त्या म्हणतात. सरकारतर्फे दिलं जाणारं पॅकेजही या व्यवसायाला तगवायला फारसं उपयोगाचं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

लावणीमध्ये प्रामुख्याने शृंगाररसाला महत्त्व दिले जाते. पण लावणी नवरसातही सादर होऊ शकते. पण तसा प्रयत्न करताना कुणी दिसत नाही. मायाताईंनी याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, की लोकांनाच शृंगारप्रधान लावण्या जास्त आवडतात. त्यामुळे आम्ही कितीही वेगळेपणा करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना तो आवडत नाही. मध्यंतरी मधु कांबीकरने लावणीचे विविध रंग दाखविणारा कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रम अतिशय सुंदर होता. पण रसिकांचा प्रतिसाद त्याला मिळाला नाही. शेवटी त्यात पैसे अडकलेले असतात. तेच निघाले नाहीत. तर मग सगळा उत्साह कमी होतो.

मायाताईंच्या आतापर्यंतच्या प्रवासात हजारांहून अधिक शिष्या तयार झाल्या आहेत. आज महाराष्ट्रातील नामवंत नृत्यांगना म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर, प्रियंका शेट्टी, अभिनेत्री प्रिया अरूण या मायाताईंच्या शिष्या. एवढे शिष्य निर्माण करणार्‍या मायाताईंची लावणीसंदर्भात एखादी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे सध्या लावणीसाठी प्रशिक्षण दिलं जातं. पण दहा बारा दिवसांच्या प्रशिक्षणात लावणी शिकता येत नाही, असं परखड मत त्या व्यक्त करतात. कारण त्यांच्या मते केवळ नाचायला शिकवणे एवढेच शिकवणे मर्यादीत नाही. हावभाव, देहबोली यांच्याबरोबर मेकअप, केशरचना या बाबीही शिकवण्यात येतात. त्याशिवाय चांगली नृत्यांगना तयार होऊ शकत नाही.

लावणीसंदर्भात नव्याने काही प्रयोग व्हायला पाहिजेत असंही त्यांचं म्हणणं आहे. कारण रिमिक्स संगीताने लावणीलाही सोडलं नाही, अशी त्यांची खंत आहे. नवीन लावणी लिहिणारे कवी नाहीत. चांगले संगीतकार नाहीत. त्यामुळे हे क्षेत्र जुने गाठोडे खांद्यावर घेऊनच वाटचाल करतेय असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात लावणीचे 'रिमिक्सी'करण झाले तरी लोक पुन्हा जुन्याकडेच वळतील असा त्यांना विश्वासही आहे. पण त्याचवेळी नवे कवी, नवे संगीतकारही लावणी क्षेत्रात यायला हवेत, अशी त्यांची कळकळ आहे.

लावणी हे लोकनृत्य असल्याने त्याला शास्त्र असे काही नाही. पण मायाताईंच्या नावे लावणी हे कथकच्या आसपास जाणारे नृत्य आहे. त्यासाठी शास्त्र नाही. पण काही नियम नक्की आहेत. त्यासाठी पुस्तक लिहिण्याचाही त्यांचा विचार आहे. फक्त त्यासाठी वेळ काढण्याची गरज असल्याचं त्या हसत हसत म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi