2 मे 1975 दादरमधील कोहिनूर थिएटरमध्ये दादा कोंडके यांच्या पांडू हवालदारचा प्रीमियर होता. थिएटरबाहेर तुफान गर्दी होती.
अशोक सराफ आणि त्यांचे भाऊ सुभाष त्यांच्यासाठी राखून ठेवलेली तिकिटं घेऊन आत गेले. कोणीही त्यांच्याकडे पाहिलंही नाही. कारण त्या दिवशीचे स्टार दादा कोंडके आणि उषा चव्हाण होते. सिनेमा संपला. बाहेर पडायला अशोक सराफ उठले, तेव्हा एकेक जण त्यांच्याकडे येऊन कौतुक करायला लागला. ऑटोग्राफ मागत होता. पाहता पाहता त्यांना लोकांचा गराडा पडला की, बाहेर पडणं मुश्किल होऊन गेलं. तीन तासांमध्ये मराठी सिनेमाला एक असा अभिनेता मिळाला होता, जो त्याच्या अभिनयाने हसवणार होता, हसवता-हसवता डोळ्यांच्या कडा ओल्या करणार होता, भावूक करणार होता, तर कधी त्याचाच तिरस्कारही करायला लावणार होता. पुढच्या चाळीस वर्षांहूनही अधिक काळ त्याच्या भूमिकांची, अभिनयाची जादू कायम राहणार होती.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. हा त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीचा गौरव आहे. अशोक सराफ यांचा स्टार म्हणून प्रवास भलेही पांडू हवालदारपासून सुरू झाला असेल, पण त्यांचा अभिनयाचा प्रवास अगदी शाळकरी वयापासून सुरू झाला होता.
शाळेतल्या स्पर्धांतील नाटकं, प्रॉम्पटिंगची कामं, नंतर छोट्या भूमिका, संगीत रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी, सिनेमा, टेलिव्हिजन अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने अशोक सराफ यांच्या याच कारकिर्दीचा आढावा घेऊया.
घरातूनच रंगभूमीचा संस्कार
अशोक सराफ यांच्यावर अगदी लहानपणापासूनच रंगभूमीचे संस्कार झाले. कारण त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांची स्वतःची नाटक कंपनी होती. कलामंदिर नावाची. हा तो काळ होता जेव्हा नाटक कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद फायद्यात नसायचा. त्याकाळात चारच मराठी नाटक कंपन्या चालत होत्या. भालचंद्र पेंढारकरांची, मो. ग रांगणेकरांची, संयुक्त महाराष्ट्र कलावंत आणि गोपीनाथ सावकार म्हणजेच अशोक सराफ यांच्या मामांची कलामंदिर. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून ते आपल्या मामांची नाटकं पाहात होते. मामांनाच गुरू मानून त्यांचं काम पाहून शिकत होते. पण मामांनी त्यांना कधी रुढार्थाने शिकवलं नाही. किंबहुना मामा स्वतःच अशोक सराफ यांनी नाटकात काम करण्याच्या विरोधात होते. अशोक सराफ यांच्या वडिलांचाही पूर्णवेळ अभिनय करायला तसा विरोधच होता.
नाटकातल्या नफ्या-तोट्यांची गणितं मामांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी कधी त्यांच्या नाटकात भूमिका करायला सांगितलं नाही. मात्र, योगायोगाने मामांच्या ययाती आणि देवयानी या नाटकात अशोक सराफ यांना भूमिका करावी लागली. त्या भूमिकेचं कौतुक झालं आणि मामांनीच अशोक सराफ यांना ययाती देवयानीतील विदूषकाची भूमिका करायला सांगितलं. तिथून अशोक सराफ यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं काम सुरू झालं.
या सगळ्यामध्ये इंटर आर्ट्सला असतानाच स्टेट बँकेत नोकरी लागली. त्या काळात इंटरबँक स्पर्धांमधून वेगवेगळ्या प्रकारची नाटकं केली. संगीत नाटकांमध्येही कामं केली. 1968 ते 1978 या काळात बँकेत काम करत असताना व्यावसायिक नाटकांमध्येही त्यांनी कामं केली.
हिमालयाची सावली, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, वरचा कानून यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं. हिमालयाची सावलीमध्ये अशोक सराफ हे डॉ. श्रीराम लागूंसोबत काम करत होते.
त्यावेळेचा एक किस्सा त्यांनी मी 'बहुरूपी' या आपल्या पुस्तकात लिहिला आहे. “हिमालयाची सावलीच्या तालमीचा पहिला दिवस होता. फोर्टमधून बँकेतून निघून तालमीला पोहोचेपर्यंत दहा-पंधरा मिनिटांचा उशीर झाला होता. तोपर्यंत सगळे कलाकार खुर्च्या टाकून बसलेले आणि वाचन सुरू झालं होतं. डॉ. लागूंनी माझ्याकडे एक नजर टाकली. पुन्हा उशीर झाला तर चालणार नाही, असं सांगणारी ती करारी नजर होती. तालमीतही शिस्तीने वागायचं हा संस्कार आपोआप डॉ. लागूंनी केला. त्यानंतर कधीही तालमीला उशीर केला नाही.”
डॉक्टर लागूंसोबत काम करताना गोष्टी कशा करायला हव्यात याची जाणीव झाली, संवादफेक, पॉझ किंवा स्टेजवरचं त्यांचं वावरणं यातून बरंच शिकायला मिळालं, असं अशोक सराफ सांगतात. डॉक्टर लागूंची एक सवय होती - मेक अप झाला की विंगेत एकटेच खुर्ची घेऊन बसायचे. कोणाशी काही बोलायचे नाहीत. हीच सवय अशोक सराफ यांनीही स्वतःला लावून घेतली. ते नाटक सुरू व्हायच्या आधी एक तास मी थिएटरवर पोहोचतात. मेकअप झाला की विंगेत खुर्ची टाकून बसतात.
अशोक सराफ यांचं 'डार्लिंग डार्लिंग' नावाचं नाटकही ट्रेंड सेटर होतं. यामध्ये राजा गोसावींसारख्या विनोदाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्यासोबत ते काम करायचे. स्लॅपस्टिक कॉमेडीचा ट्रेंड या नाटकाने सुरू केला.
तुझ्यासारख्या चांगल्या नटाचं काय करुन ठेवलं यांनी? अशोक सराफ यांच्या कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी. विजया मेहतांनी दिग्दर्शित केलेलं नाटक. लयाला जात असलेले कोठे, तिथल्या गणिकांचं आयुष्य असं हे गंभीर स्वरूपाचं नाटक होतं. त्यामध्ये अशोक सराफ यांनी नकारात्मक छटा असलेलं लुक्का दादाचं काम केलं होतं. हे नाटक सुरू असतानाच अशोक सराफ यांचे पांडू हवालदार आणि राम राम गंगारामसारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे एक ओळख मिळाली होती. त्यातही राम राम गंगाराममधील व्यवसायाने खाटीक असलेल्या म्हमद्याची भूमिका लोकप्रिय झालेली.
त्यामुळे अनेकदा प्रेक्षक नाटक सुरू असतानाच म्हमद्या, म्हमद्या असं ओरडायचे. नाटक गंभीर होतं, त्यात अशोक सराफ यांच्या एन्ट्रीला अशा हाका आल्या की विजया मेहता वैतागायच्या. एकदा तर त्या अशोक सराफ यांना म्हणाल्याही की, तुझ्यासारख्या चांगल्या नटाचं काय करुन ठेवलं यांनी? एकदा खाटीक मंडळींनी प्रयोग सुरू व्हायच्या आधी स्टेजवरच अशोक सराफ यांचा सत्कार केला.
या लोकप्रियतेचे हवेहवेसे अनुभव येत असताना, 'हमीदाबाईची कोठी'च्या एका प्रयोगादरम्यान अतिशय हिंसक असा अनुभव केवळ अशोक सराफ यांनाच नाही, तर हमीदाबाईच्या सगळ्या टीमलाच आला होता.
एका आडगावात प्रयोग होता, रुढार्थाने थिएटर असं नव्हतंच. स्टेजवर कलाकार बोलायला लागले. पण प्रेक्षकांना काही दिसेना, आवाज येत नव्हता. पाच मिनिटांमध्ये पडदा पाडला. नाटक रद्द करायची वेळ आली होती, लोक बाहेर ओरडत होते.
अशोक सराफ हा ओळखीचा, लोकप्रिय चेहरा असल्याने म्हमद्याच्या नावाने बाहेर प्रचंड गलका सुरू होता.
सगळा प्रसंग ओळखून या नाटकात भूमिका करणाऱ्या नाना पाटेकरांनी अशोक सराफांचा हात धरून त्यांना मागून बाहेर काढलं. तिकडे थिएटरमध्ये मारामारीला सुरूवात झाली होती. हा सगळा प्रसंग अशोक सराफ यांनी मी बहुरूपी या आपल्या पुस्तकात लिहिला आहे. “आम्ही दोघं रस्त्यावर पोहोचलो. तिथे चिटपाखरूही नव्हतं. नानानं एक सायकल रिक्षा थांबवली. त्या वयस्क रिक्षाचालकाला तो चढणीचा रस्ता चढणं झेपेना. नानानं त्याला उतरवलं आणि स्वतः रिक्षा ओढू लागला. नाना नसता तर त्या लोकांनी मारलंच असतं मला. नाटक न झाल्याचा सगळा राग माझ्यावर काढला असता. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो.” त्यानंतर पहाटे पोलिसांच्या सुरक्षेत या नाटकाची सगळी टीम बाहेर पडली.
दादा कोंडके आणि पांडू हवालदार
2 मे 1975 ला अशोक सराफ यांचा पांडू हवालदार हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा हिट झाला, अशोक सराफ यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण पांडू हवालदार हा त्यांचा पहिला सिनेमा नाहीये. त्याच्या आधी अशोक सराफ यांनी दोन सिनेमांमध्ये काम केलं होतं. 1971 साली बँकेतल्या स्पर्धेत काम करताना त्यांना दिग्दर्शक गजानन जहागिरदार यांनी दोन्ही घरचा पाहुणा या सिनेमातील एका भूमिकेसाठी विचारलं होतं. आयलं तुफान दर्याला नावाच्या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. पण या दोन्ही चित्रपटांतील भूमिका तुलनेनं लहान होत्या. अशोक सराफ यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली पांडू हवालदारने. या सिनेमातील टायटल रोल स्वतः दादा कोंडके करणार होते. दुसऱ्या हवालदाराच्या भूमिकेसाठी दादा कोंडकेंची पहिली पसंती अशोक सराफ नव्हते. दादांना काही लोकांनी त्यांचं नाव सुचवलं होतं.
दादांसारख्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या, लोकनाट्याची पार्श्वभूमी असलेल्या कलाकारासोबत काम करण्यासाठी नेमकी कशी तयारी केली होती, हे अशोक सराफ यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. “कामाच्या पहिल्या दिवशी माझा एकही सीन झाला नाही. दुसरा, तिसरा दिवसही तसाच होता. पण मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेटवरच थांबायचो. दादांचं काम पाहायचो. ते कसा अभिनय करतात याचं निरीक्षण करत राहायचो. आमची स्टाईल वेगळी असली तरी आमचा मेळ कसा घालता येईल, याचा विचार करत होतो.”
अशोक सराफ यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखा पाहताना भूमिकेचा विचार करण्याची सवय दिसून येते. पांडू हवालदारच्या यशानंतर अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबत तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम हे सिनेमे केले. दोन्ही हिट झाले. त्यानंतर मात्र अशोक सराफ आणि दादा कोंडकेंनी एकत्र काम केलं नाही. दादांसोबत त्यांना एक सिनेमा ऑफरही झाला होता. मात्र भूमिका राम राम गंगाराममधल्यासारखीच आहे, हे कळल्यावर त्यांनी दादांना नकारही दिला. त्याबद्दल मी बहुरूपीत त्यांनी लिहिलंय, की “दादा कोंडकेंबरोबर काम केल्यामुळे किंवा करत राहिल्यामुळे आपल्याला हिट सिनेमे मिळतील असा विचार माझ्या डोक्यात आला नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्याकडे काम मागायला गेलो नाही. प्रत्येक नटानं स्वतःच्या प्रयत्नांनीच मोठं व्हायचं असतं. म्हणूनच मी पुढच्या काळात दादांनाही नकार देऊ शकलो
व्हॅख्यॅ व्हिखी वुखू
पांडू हवालदारनंतर अशोक सराफ यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. नायक, साईड हिरो, व्हिलन अशा व्यक्तिरेखा त्यांनी केल्या. पण विनोदी भूमिकेतून सुरूवात झाल्यामुळं सुरवातीला त्याच प्रकारच्या भूमिका त्यांच्याकडे येत राहिल्या. स्वतः त्यांनीही आपल्या मुलाखतीत ही खंत व्यक्त केली होती. मात्र एक अभिनेता म्हणून आपल्या या सगळ्या भूमिका एकसाची आणि एकसुरी होणार नाहीत, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसतं.
अशोक सराफ यांनी साकारलेले अनेक कॅरेक्टर्स पाहताना आपल्याला त्यांच्या अनेक लकबी आठवतात. गुपचूप गुपचूपमधली प्राध्यापक धोंड यांची पँट वर ओढण्याची सवय, नवरी मिळे नवऱ्याला मधल्या बाळासाहेबांची कपाळावर हात मारून घेण्याची सवय आणि सर्वांत कहर म्हणजे धुमधडाका मधली व्हॅख्यॅ व्हिखी वुखू असं खोकतच बोलण्याची सवय. या व्हॅख्यॅ व्हिखी वुखूचा किस्सा अशोक सराफ यांनी मुलाखतींमधूनही सांगितला आहे, पुस्तकातही लिहिला आहे. दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या धुमधडाका चित्रपटात अशोक सराफ हिरोचा बाप म्हणून येतात. केसांचा विग, दाढी-मिशा, सूट-बूट, हातात पाईप असा तो सगळा गेटअप होता.
या कॅरेक्टरचं पहिलं दृश्य पाइप ओढतानाचं होतं. अशोक सराफ यांनी कधीही पाइप ओढला नव्हता. पाइपचा तंबाखू हा जास्त जोरात लागतो. अशोक सराफ यांनी पाइप ओढता ओढता संवाद बोलायला सुरूवात केली आणि त्यांना जोरात ठसका लागला. खोकला आल्यावर अशोक सराफ यांच्या लक्षात आलं की, या सगळ्या बनवाबनवीमध्ये ठसकत ठसकत बोलायचा वापर केला तर गोंधळ अजून मजेशीर होईल. आणि हाच विचार करून त्यांनी प्रत्येक खोकल्याबरोबर व्हॅख्यॅ, व्हिखी, वुखू वापरलं. आजही या ठसक्यातली गंमत कमी झालेली नाहीये. कॅरेक्टर्सना हे असं छोट्या बारकाव्यांनिशी सादर करण्याबद्दल त्यांनी लिहिलंय की, रोजच्या जगण्यात आपण अनेक माणसं पाहतो. काही खांदे उडवत बोलतात, काही डोळे मिचकावत...त्यांच्याशी बोलताना आपलं लक्ष त्यांच्या सवयींवर खिळून राहतं. ती माणसं त्यांच्या लकबीसकट मनात कुठेतरी घर करून राहतात. आणि कधीतरी कुठल्यातरी भूमिकेच्या निमित्ताने अचानक समोर उभी ठाकतात.
विनोदाबद्दलचं त्यांचं मतही असंच आहे. कॉमेडी ही गांभीर्याने करायची गोष्ट आहे. द्वयर्थी विनोद करून कोणीही हसवू शकतं, पण निखळ विनोद करणं खूप कठीण आहे, असं ते म्हणतात. म्हणूनच त्यांच्या विनोदाने कधीच सवंगतेची पातळी गाठली नाही. लोकांना काहीही करून हसविण्याचा खटाटोप त्यांनी केला नाही. म्हणूनच पंचवीस-तीस वर्षांनंतरही पाहताना त्यांचे चित्रपट हे निखळ, निर्मळ आनंद देणारे आहेत.
अनेकदा नायकाच्या भूमिका करत असताना कॅरेक्टर रोल करायला अभिनेते कचरतात. पण अशोक सराफ यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नायक साकारत असतानाच कॅरेक्टर रोलही केले. वर्षा उसगावकरसोबत नायकाच्या भूमिका करत असताना त्यांनी लपंडाव मध्ये चक्क त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली. कळत नकळतमध्ये सविता प्रभुणे यांच्या भावाची भूमिका केली. वाजवा रे वाजवामध्ये प्रशांत दामले आणि अजिंक्य देव यांचे वडील झाले होते. कोणतेही विशेष गेट अप न करता केवळ बॉडी लँग्वेज आणि मुद्राभिनयाने त्यांनी अतिशय कन्व्हिन्सिंगली हे रोल केले.
धनंजय माने इथंच राहतात का?
अशोक सराफ यांच्याबद्दल लिहिताना-बोलताना अशी ही बनवाबनवी या सिनेमाचा उल्लेख येणार नाही, असं होऊच शकत नाही. चार मित्र, जागा मिळवण्यासाठीची त्यांची खटपट, त्यातून दोन मित्रांनी घेतलेलं बायकांचं सोंग...सगळाच धमाल मामला. या सिनेमातली धनंजय माने ही व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी केलेली. हा मित्र सगळ्या बनवाबनवीचा कर्ता करविता. मित्रांना आसरा देणारा, भावाची जबाबदारी घेणारा, जागेसाठी वणवण करायची वेळ आल्यावर आपल्याच दोन मित्रांना बायका बनायला लावणारा. या सिनेमाला 36 वर्षं झाल्यानंतरही धनंजय माने इथचं राहतात, इस्रायलवरून येणारं डायबेटिसचं औषध, वारलेले सत्तर रुपये यांवर मीम्स बनत राहतात. पुरुषांनी स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारताना अनेकदा विनोद बीभत्सपणाकडे, अश्लीलतेकडे झुकल्याची उदाहरणं अनेक आहेत. पण बनवाबनवी हे क्लीन कॉमेडीचं उत्तम उदाहरण आहे. स्वतः अशोक सराफ यांना जेव्हा एका मुलाखतीत सर्वांत आवडती हिरॉईन कोणती हा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी बनवाबनवीमधला सचिन असं उत्तर दिलं होतं. सचिन आणि अशोक सराफ यांचं ऑफ स्क्रीन बाँडिंगही खूप सुंदर आहे. सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांच्यापासून दोन्ही कुटुंबांचे घरगुती संबंध तर होतेच. पण व्यावसायिक पातळीवरही अशोक सराफ यांच्यासाठी सचिन यांच्या सिनेमात नेहमीच खास भूमिका असायची.
मायबाप, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, पती माझा करोडपती, आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखेच आम्ही, भुताचा भाऊ असे अनेक चित्रपट एकत्र केले. व्यक्तिरेखेच्या लांबी-रुंदीपेक्षाही अशोक सराफ यांच्यातल्या अभिनेत्याला वाव मिळेल, अशा भूमिका कायमच सचिन यांच्या सिनेमात अशोक सराफ यांना मिळाल्या. सचिनबद्दल अशोक सराफ यांनी लिहिलं आहे की, सचिननं नेहमी निखळ विनोदी सिनेमे दिले. तो मुळी आमचा धर्मच आहे. द्वयर्थी संवाद नाहीत, कमरेखालचा विनोद नाही एखादा शब्द अश्लील वाटलाच तर तो बोलायचा नाही, असं आम्ही ठरवलेलंच होतं. दिग्दर्शक-अभिनेता, अभिनेता-अभिनेता यांच्यामध्ये असलेल्या याच ट्युनिंगमुळेच अगदी आजही जेव्हा हे चित्रपट पाहतो, ते तितकेच फ्रेश वाटतात.
हैराण झालेल्या बापाची गोष्ट
नाटक, सिनेमा सुरू असतानाच अशोक सराफ हे टेलिव्हिजनकडे वळले. नटखट नारद ही त्यांनी केलेली पहिली टीव्ही सीरियल. हा टेलिव्हिजन मालिकांचा अगदी सुरुवातीचा काळ होता. डेलि सोप हा प्रकार नव्हता. त्यानंतर छोटी बडी बातें, चुटकी बजाके, डोन्ट वरी हो जाएगा, टण टणा टण अशा अनेक मालिका त्यांनी केल्या. पण खऱ्या अर्थाने अशोक सराफ यांना देशभरातील घराघरांतला चेहरा बनवलं ती मालिका म्हणजे हम पाँच. पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या किंबहुना तऱ्हेच्या पोरींच्या बापाची ही गोष्ट. अशोक सराफ यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर नुसती बापाची नाही तर हैराण झालेल्या बापाची गोष्ट होती. मुली कमी म्हणून या माणसाच्या आयुष्यात त्याची बायको आणि फोटो फ्रेममधून संवाद साधणारी त्याची मृत बायको याही असतात. या मालिकेतलं सगळ्यांचं बाँडिग कुटुंबासारखं झालं होतं. या मुलीही आपल्यावर वडिलांसारखं प्रेम करायला लागल्या होत्या. बापूने कहा तो कहा असं त्यांचं झालं होतं, असं अशोक सराफ यांनी सांगितलं होतं. याच काळात अशोक सराफ यांना ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांची दाद मिळाली होती. प्रिया तेंडुलकर या अशोक सराफ यांच्या पहिल्या पत्नीचा रोल करायच्या, जी फोटो फ्रेममधून बोलत असते. त्यानी एकेदिवशी अशोक सराफ यांना म्हटलं की, 'अरे, मी बाबांना म्हटलं- बघा बाबा, मी नुसती एका फ्रेममध्ये आहे, अॅक्शन नाही; पण नुसते संवाद म्हणून प्रसिद्ध झालीये की नाही! त्यावरबाबा (विजय तेंडुलकर) मला म्हणाले की, तुझ्यासमोर जो उभा आहे ना, तो तुला रिअॅक्ट करतोय म्हणून तुझं काम चांगलं वाटतंय हे लक्षात घे.' विजय तेंडुलकरांसारख्या दिग्गज नाटककाराकडून मिळालेली ती शाबासकीची थापच होती.
आशा भोसले यांची ती दाद
विजय तेंडुलकरांप्रमाणेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडूनही एकदा झालेलं कौतुक अशोक सराफ यांच्यासाठी खूप खास होतं. अशोक सराफ यांनी अलीकडच्या काळात जे काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले त्यांपैकी एक म्हणजे प्रवास. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा. या सिनेमाचा एक खास प्रीमियर पद्मिनी कोल्हापुरे यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. ज्येष्ठ गायिका आशा भोसले हा शो पाहायला आल्या होत्या. सिनेमा संपल्यानंतर अशोक सराफ त्यांना जाऊन भेटले.
आशा भोसले त्यांना म्हणाल्या की, “चांगलं काम केलं आहे तुम्ही.” एवढं बोलून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुढे म्हटलं, “तुम्ही चांगलं काम केलंय असं म्हणणं म्हणजे लता मंगेशकर चांगली गाते म्हणण्यासारखं आहे!”
अशोक सराफ यांनी पुढे यावर प्रतिक्रिया दिली होती की, 'हे वाक्य ऐकून मी स्तब्धच झालो. भरून पावलो.'
इंडस्ट्रीचे मामा
अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीतले लोक हे प्रेमाने 'मामा' म्हणून ओळखतात. त्यामागे त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव, आदर आहेच, पण त्यांना मामा ही ओळख करिअरच्या खूप सुरूवातीपासूनच मिळाली आहे. आणि त्याला कारणीभूत ठरली एक लहान मुलगी. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी तो किस्साही सांगितला होता. त्यांनी सांगितलं होतं, की “प्रकाश शिंदे म्हणून कॅमेरामन होते. ते कोल्हापूरला त्यांच्या लहान मुलीला घेऊन सेटवर यायचे. ते त्या मुलीला म्हणायचे की, हे कोण आहेत? अशोक मामा आहेत... असं तो सारखा दररोज म्हणायचा. नंतर नंतर तर तो स्वतःच मला मामा म्हणायला लागला.
मग सेटवरचे बाकीचे लोक होते, स्पॉट बॉईज होते, त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच असायचा. अशोक असं एकेरी म्हणू शकत नव्हते किंवा अशोक साहेबही आवडायचं नाही. त्यामुळे ते मला मामा म्हणायला लागले. बघता बघता ते मामा असं पसरत गेलं, की सगळेच मामा म्हणतात. अगदी प्रेक्षकही.”
चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केलेलं मनोरंजन, आपल्या अभिनयाने रंगभूमी आणि मराठी सिनेमाच्या समृद्धीत घातलेली भर, नवीन पिढीसाठी दिलेला अनुभवाचा वारसा यांमुळे सहकलाकार आणि प्रेक्षकांकडून त्यांना हे प्रेम मिळणं स्वाभाविकच म्हणायला हवं. महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार ही याच प्रेमाची एक औपचारिक पोचपावती असते...