हिंदी चित्रपटसृष्टीत अभिषेक बच्चन आणि अन्य बड्या नायकांची नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर आपले स्थान निर्माण करणारी हृषिता भट्ट आता चक्क एका मराठी चित्रपटात मराठी नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. मणी मंगळसूत्र नावाने तयार झालेल्या या चित्रपटात ती सावित्री या मुख्य नायिकेच्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. मोडकेतोडके मराठी आणि हिंदीमध्ये वेबदुनियाशी हृषिताने मारलेल्या गप्पांचा सारांश-
मराठीत यावे असे का वाटले? मी ठरवून मराठीत आलेले नाही. मी कधीही काहीही ठरवून करीत नाही. हिंदी चित्रपटांबरोबरच मी अनेक प्रादेशिक चित्रपट केलेले आहेत परंतु मणी मंगळसूत्र हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी मराठी चित्रपट करेन किंवा एखादा मराठी निर्माता मला मराठीत मुख्य भूमिका साकारण्याची संच्च्ी देईल. याचे कारण असे की मराठीत उत्कृष्ट कलाकार आहेत. मराठी कलाकारांना हिंदी, मराठी इतकेच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही झेंडा रोवलेला आहे. मी महाराष्ट्र रहाते परंतु मला जास्त मराठी येत नाही. परंतु या चित्रपटामुळे मी तोडकी मोडकी का होईना मराठी बोलायला शिकले आहे.
हा चित्रपट मला मिळाला कसा? मी तुला नुकतेच सांगितले की माझा मराठीत येण्याचा कधीही विचार नव्हता. एक दिवस गौरी नावाच्या मुलीचा मला फोन आला. तीने सांगितले की ती एक मराठी चित्रपट करीत आहे आणि त्यानिमित्ताने तिला मला भेटायचे आहे. मुलगी असल्याने मी म्हटले चला बघूया ती काय म्हणते ते म्हणून मी तिला घरी भेटायला बोलावले. ती आली आणि तिने मला सरळ कथा ऐकवायला सुरुवात केली. कथा ऐकली आणि मी थक्कच झाले. अत्यंत विलक्षण आणि वेगळी कथा होती. मी तिला म्हटले की कथा चांगली आहे आणि तू जर दिग्दर्शन करीत असशील तर मी नक्कीच हा चित्रपट करीन. यानंतर मी तिला विचारले की या भूमिकेसाठी तू माझीच निवड का केलीस तर तिने सांगितले कि या भूमिकेवर विचार करताना तिच्या डोळ्यासमोर माझाच चेहरा होता. विलक्षण कथा आणि उत्कृष्ट भूमिका असल्यानेच मी हा चित्रपट स्वीकारला.
शूटिंगच्या वेळचा अनुभव कसा होता? तुला एक गंमत सांगते. मी मुख्य भूमिका साकारण्याचे मान्य केले. तिने मला कथा दिली. मी पूर्ण तयारी केली. दुसर्या भाषेतील चित्रपट मी केलेले असल्याने मला पूर्ण आत्मविश्वास होता कि मी मराठीतील ही भूमिकाही उत्कृष्टरित्या सादर करीन. आमचे पहिले शेड्यूल होते. मला माझे संवाद दिले गेले होते ते मी पाठ करीत होते. आता काही वेळाने शूटिंगला सेटवर जाणार तेवढ्यात कोण जाणे मला काय झाले, माझे हातपाय कापू लागले. माझा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि आपण ही भूमिका योग्यरित्या साकार करू शकणार नाही असे मला वाटू लागले. मला बोलवण्यासाठी गौरी आली तेव्हा मी तिला स्पष्ट सांगितले की, मी ही भूमिका करू शकत नाही. तू दुसर्या कोणाला तरी घे आणि चित्रपट पूर्ण कर. मला स्वतःबद्दल खात्री वाटत नाही. गौरी चकित झाली. सेट लागलेला, शूटिंगची तयारी झालेली आणि मुख्य नायिकाच नाही म्हटल्यावर तिच्या मनाला काय वाटले असेल त्याची मी कल्पना करू शकते, परंतु मी स्वतः डळमळीत झाले होते आणि तिचे नुकसान होई नये असे मला वाटत होते. गौरीने माझे ऐकून घेतले आणि ती माझ्याबरोबर गप्पा मारायला बसली. गप्पा मारता-मारता तिने मला कच्च्ी तयार केले ते मला कळलेच नाही आणि मी सेटवर पोहोचले. माझे सहकलाकार रविंद्र मंकणी, मधुराणी, आशालता, उमेश कामत यांनी मला सांभाळून घेतले. मी मराठी नसतानाही मी उत्कृष्टरित्या संवाद बोलत असताना पाहून ते सगळे चकित झाले. त्यांनी मला चांगलेच सावरून घेतले. शक्य तेथे मदत केली त्यामुळेच मी हा चित्रपट करु शकले. मी सगळ्यात जास्त द्रन्यवाद देईन गौरीला. तिने माझ्याकडून ही भूमिका साकार करून घेतली. ती जर नसती तर मला वाटते मी या भूमिकेत दिसलीच नसते.
चित्रपटाची कथा काय आहे? हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. पति-पत्नीच्या नात्यावर आधारित या चित्रपटात एक अशी गोष्ट सांगितली आहे जी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणारी आहे. पति-पत्नीचे नाते आणि लिव-इन रिलेशनशिप यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी तीन काळातील नायिका सावित्रीची भूमिका साकारीत आहे. १९५० से २०१० पर्यंतचा माझा प्रवास यात मांडण्यात आलेला आहे. चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा पडद्यावर पहाण्यातच गंमत आहे. मी तर म्हणेन की माझे भाग्य म्हणून मला हा चित्रपट मिळाला. गौरीने ही कथा खूपच उत्कृष्टरित्या पडद्यावर मांडलेली आहे. हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. माझ्या भूमिकेची प्रेक्षकांनी प्रशंसा केली तर त्याचे संपूर्ण श्रेय मी गौरीला देईन.
हा चित्रपट हिंदीत करावा असे वाटते का? सुरुवातील मला असे वाटले होते. परंतु काही कथा अशा असतात ज्या काही ठराविक समाजाचेच प्रतिबिंब दाखवणार्या असतात. मणी मंगळसूत्रची कथा मराठी कुटुंबाचीच असू शकते. प्रत्येक राज्याची, भाषेची एक संस्कृति, परंपरा असते. ती संस्कृति, परंपरा अन्य राज्य वा भाषेमध्ये नेल्यास त्याचा मूळ गाभा हरवण्याची भिती असते. त्यामुळे हिंदीपेक्षा मराठीतच हा चित्रपट तयार करणे अत्यंत योग्य आहे असे मला वाटते. दुसरी गोष्ट अशी की कलाकाराला भाषेचे बंच्च्न नसते. कोणताही कलाकार कोणत्याही भाषेतील चित्रपट योग्यरित्या करू शकतो. मी बंगाली आणि दक्षिण भारतीय चित्रपट केले आहेत. एकदा का भूमिका समजली की ती पडद्यावर साकारणे कठिण जात नाही. या चित्रपटात माझ्यासोबत गौरी आणि मराठीतील दिग्गज कलाकार होते त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही.
चित्रपटाचे संवाद तुझ्या स्वतःच्या आवाजात डब आहेत का? हो. संपूर्ण चित्रपट मी माझ्याच आवाजात डब केला आहे. काही ठिकाणी म्हणजे फारच कमी ठिकाणी एका मराठी अभिनेत्रीचा आवाज वापरण्यात आला आहे.
यापुढेही मराठी चित्रपट करण्याची इच्छा आहे का? मणी मंगळसूत्रसारखी कथा असेल तर नक्कीच करेन.