त्यानंतर त्यांच्याशी कधी संवाद साधला जाण्याची शक्यताही नव्हती. पण पत्रकारित आल्याने योगायोगाने ही संधीही मिळाली. सांस्कृतिक प्रतिनीधी म्हणून कार्यरत असताता मुलाखतीच्या निमित्ताने अनेक कलाकारांशी संवाद होऊ लागले. त्यांच्या बोलण्यातून जयश्रीताईंचा उल्लेख व्हायचा. मराठीतील काही जुने कलाकार आजही चित्रपटात दिसतात पण, सध्या त्या कोठेच दिसत नाहीत असे वाटून जायचे. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहिर झाला. फुलेंविषयी त्यांचा सहवास लाभलेल्या इतर कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दूरध्वनीवरून जयश्रीताईंशी बोलण्याचा योग आला. 'माझी प्रकृती बिघडली आहे.. पण, आपण निळूभाऊविषयी विचारता आहात म्हणून बोलल्याशिवाय रहावत नाही..' असे म्हणत त्यांनी फुलेंविषयी उत्कट भावना व्यक्त केल्या. त्या थकल्याचे जाणवत होते. त्या सध्या चित्रपटात का दिसत नाहीत याचे उत्तरही न बोलताच मिळाले. त्यांची थेट भेट घेण्याचा योगही 'योग' या संस्थेने आणला. कलेसाठी आयुष्य वेचणा-या कलाकारांना या संस्थेतर्फे पुरस्कार दिला जातो. त्यावर्षी जयश्रीताईंची निवड झाली होती. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार मास्टर अविनाश तथा गणपतराव मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. यावेळी जयश्रीताईंचे पती श्री. बाळ धुरी आवर्जून उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर जयश्रीताई व बाळ धुरींचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होता. अडीच तास चाललेल्या या मुलाखतीमध्ये जयश्रीताईंनी आपला जीवनपट उघडत आयुष्यातील अनेक चांगले वाईट प्रसंग सांगताता श्रोते भावनावश झाले होते. कोणत्याही भूमिकेसाठी डमी वापरता स्वतः भूमिका साकारण्याचा हट्ट त्यांना अनेकदा भोवला. चित्रीकरणावेळी अनेकवेळा अपघात होऊन त्यांना गंभीर इजा झाल्या. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत गेला. अशाच एका अपघातावेळी त्यांना अंधत्व आले. जीवन अंधारमय झाले पण, कलेच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे त्या त्यातू्नही सावरल्या. या आठवणी व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातूनही नकळत अश्रू ओघळले. बोलताना त्यांना थकवा जाणवत होता. ठसका लागल्यावर पाण्याचा घोट घेता घेता त्या संवाद साधत होत्या. पडद्यामागचे वास्तव अनुभवणारा सारा माहोल भारावून गेला होता. कलेसाठी जगणार्या या कलाकाराची दखल उशिरा घेतली गेली याचे नवल वाटू लागले.
बाळ धुरींवरचे प्रेम त्यांनी या मुलाखतीदरम्यान अनेकवेळा व्यक्त केले. पहिल्यापासू्नच त्यांच्या पाठीशी असणा-या धुरींनी शेवटच्या क्षणापर्यत त्यांना साथ दिली. एकमेकांची अशी काळजी घेताना पाहून सहचर कसा असावा याची जाणीव होत असे. जयश्री ताईच्या अचानक जाण्याने मराठी मने हळहळली आहेत. त्यांचे निधन झाल्याचे समजताच लहानपणी पाहिलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आणि त्यांची मुलाखत डोळ्यासमोर तरळू लागली. चित्रपटांतू्न त्यांच्या आठवणी चिरंतर राहतील पण, त्या आपल्यात नाहीत या जाणीवेने मन सदगदीत होते आहे.