गंगूबाईंची आई अंबाबाई कर्नाटिक संगीतातली. पण मुलीने ध्यास घेतला तो हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्याचा. तेही किराणा घराण्याचे. श्री कृष्णाचार्य, श्री. दत्तोपंत देसाई हे त्यांचे आरंभीचे गुरू. पण त्यांच्या जीवनावर ज्यांचा ठसा उमटला तो पंडित रामभाऊ कुंदगोळकर अर्थात सवाई गंधर्व यांचा. गंगूबाईंच्या गानकलेला पैलू पाडले ते सवाई गंधर्वांनी. ते रहायचे कुंदगोळला आणि गंगूबाई हुबळीला. त्या रोज तीस किलोमीटरचा प्रवास करून तिथे जायच्या. स्टेशनवर उतरल्या की 'गानेवाली आ गई' अशा हेटाळणीयुक्त शब्दांतच त्यांचे स्वागत होत असे. त्यावेळी भीमसेन जोशी हे गंगूबाईंचे गुरूबंधू गुरूगृही राहूनच शिक्षण घेत होते. मुलगी असलेल्या गंगूबाईंना ते शक्य नव्हते. पण तरीही त्यांनी चिकाटीने शिक्षण घेतलेच. गंगूबाई एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, गुरूजींनी मला फक्त चार राग शिकवले. वारंवार ते 'पलटे' घ्यायला लावाचये. त्यांनी पलटे फार घोटून घोटून घेतले. अगदी कंटाळा यायचा. पण पुढे त्यांनी दिलेल्या या शिक्षणाचे महत्त्व कळले. त्यावेळी केलेल्या रियाझावरच पुढची कारकिर्द उभी राहिली.' गंगूबाईंची ही विनम्रता त्यांच्याविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. त्यावेळी सवाई गंधर्वांनाही आर्थिक अडचण होती. आपल्या दोघांना पुरेल एवढे पैसे मिळाले तरी खूप झाले, असे ते म्हणत. गुलाबाईंनी पहिला स्टेज शो केला तो मुंबईत. मुंबई म्युझिक सर्कलमध्ये लहानग्या गंगूबाईंचे गाणे गायले गेले आणि सर्व उपस्थित प्रभावीत झाले. त्यावेळी अभिनेत्री नर्गिसची आई जद्दनबाई तिथे उपस्थित होती. तिने गंगूबाईंना कोलकत्याच्या म्युझिक कॉन्फरन्सला येण्याचे निमंत्रण दिले. गंगूबाई कोलकत्याला गेल्या खर्या, पण मुख्य कार्यक्रमाआधी त्यांना एका खासगी मैफलीत गायला लावण्यात आलं. याचं कारण त्यांनी विचारलं, तेव्हा संयोजकानी सांगितलं, तुमचं वय पाहून तुम्ही या मैफलीत गाल असा विश्वास नव्हता. म्हणून 'ट्रायल' घेण्यासाठी ही मैफल ठेवली.' पुढे इथल्या कॉन्फरन्समध्येच गंगूबाईंना त्रिपूराच्या महाराजांतर्फे सुवर्णपदक मिळाले!त्यावेळचा काळ भारावून टाकणारा होता. गंगूबाई एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, त्यावेळी ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स व्हायची. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात देशभरातील दिग्गज गायक यायचे. पंडित ओंकारनाथ, केसरबाई, बिस्मिल्लाखान, अल्लाउद्दिन खान, सिद्धेश्वरी देवी अशा बड्या कलावंताचे कार्यक्रम व्हायचे. परस्परांना दाद दिली जायची. हल्ली तसं होत नाही. दुसर्या गायकाचं गाणं ऐकलंही जात नाही. सिद्धेश्वरी देवींच्या आयु्ष्यातील एक प्रसंग आहे. पक्षाघाताने सिद्धेश्वरी देवी अंथरूणावर पडल्या होत्या. त्यावेळी गंगूबाई त्यांना भेटायला गेल्या. देवींनी त्यांची इच्छा गंगूबाईंना सांगितली. ही इच्छा होती, भैरवी म्हणण्याची. गंगूबाईँनी देवींच्या म्हणण्याला मान देवी भैरवी म्हटली नि किती तरी वेळ सिद्धेश्वरी देवींचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. एका कलावंताप्रती दुसर्या कलावंताचे असलेले सुह्रद यातून कळून यावे. गंगूबाईंचे नाव एकीकडे गाजत असताना वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच रितेपण होते. त्यांचे पती गुरूराव कौलगी आर्थिक विपन्नावस्थेत होते. गंगूबाई कार्यक्रम करून त्यांना पैसे द्यायच्या. पण गुरूराव ते उधळून टाकत. पैसा पुरत नव्हता. घरात ठरतही नव्हता. आर्थिक अडचणी संपत नव्हत्या. सावकार तगादा लावत. घरी येऊन धमक्या देत. गुरूराव घरातून महिनोन महिने निघून जात. अशा परिस्थितीतही बाईंनी गाणे सोडले नाही. त्या म्हणत, तानपुरा घेतल्यावर जगाचा विसर पडतो, असे म्हणतात. पण माझ्याबाबतीत तसं नव्हतं. तानपुरा घेतल्यानंतर बोटं फिरवली की माझ्या भोवतीचं जग उलटं फिरायला लागायचं. गळ्यातनं रडण्याव्यतिरिक्त आणि डोळ्यातून अश्रूंव्यतिरिक्त काही निघायचं नाही. इतक्या विवंचनेत मी होते.' या काळातले त्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. एकदा पुण्यात एका प्रख्यात गायिकेने त्यांना घरी बोलवले. त्यांच्या मातोश्रींनी गंगूबाईंना त्यांची बिदागी विचारली. गंगूबाईंनी १२५ रूपये अशी सांगितली. मग त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. माझ्या मुलीने नाकारलेले कार्यक्रम तुम्ही घ्या, असं सुचवलं. संतापलेल्या गंगूबाई तडक तिथून निघून गेल्या. पण नंतर 'कदाचित, त्या बाईने आपली अवस्था पाहूनच कदाचित हा प्रस्ताव दिला असावा, असावा अशी समजूत त्यांनी घातली. आर्थिक विपन्नावस्था असतानाच गंगूबाईंचे पती गुरूराव गंभीर आजारी पडले होते. गंगूबाईंचे त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम होते. त्यामुळे त्या त्यांच्याजवळ थांबल्या होत्या. पण त्याचवेळी मुंबईच्या म्युझिक कॉन्फरन्सचे निमंत्रण मिळाले. अन, गुरूरावांनी आपल्या प्रकृतीची काळजी न करता तिथ जावे असे सांगितले. गंगूबाई तिकडे गेल्या आणि इकडे गुरूरावांचे निधन झाले. त्यांच्या निधनावेळी आपण तिथे नव्हतो, याची खंत शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहिली.
पुढे गंगूबाईंना दिगंत कीर्ति मिळाली. सरकारी, बिगर सरकारी मानमरातब पायी येऊन पडले. सरकारने पदमभूषण पुरस्कार दिला. हा पुरस्कार दिला त्या दिवशीची गोष्ट. गंगूबाई रात्री जागत बसल्या होत्या. आयुष्यातून पुसून टाकाव्या वाटणार्या घटना, प्रसंगांची याद करत मिळालेल्या यशाची गोळीबेरीज मांडत होत्या. उदंड कीर्ति मिळाली, पुरस्कार मिळाले, तरी ऐन उभारीच्या काळात मिळालेली हेटाळणी, ते फुत्कार त्या कधीही विसरू शकल्या नाहीत. त्यांच्या शांत नि स्निग्ध चेहर्यामागे तो सल कायम राहिला.