केदार शिंदे म्हणजे आज मराठी चित्रपटसृष्टीतील चलनी नाणे. नाटक असो वा सिनेमा केदारच्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करतातच. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकमेव उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन केदार आपली निर्मिती करीत असतो. केदारचा नवा सिनेमा ऑन ड्यूटी २४ तास २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानिमित्ताने केदारने वेबदुनियाशी त्याच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये विशेष गप्पा मारल्या.
ऑन ड्यूटी २४ तास काय करतोयस? अरे तुला खरं सांगू जसे चित्रपटाचे नाव आहे ना अगदी तसेच माझे गेल्या काही दिवसांपासून चालले आहे. २४-२४ तास मी काम करतोय. आता मी तुझ्याशी गप्पा मारतोय परंतु माझ्या डोळ्यावर प्रचंड झापड आलीय, सगळी खोली माझ्याभोवती गरगर फिरतेय कारण तीन रात्री मी झोपलेलोच नाही. आजही सकाळी मी घरी गेलो. आमच्या बिल्डिंगच्या वॉटमनची आणि माझी ड्यूटी एकत्रच बदलतेय. रात्रभर चित्रपटाच्या एडिटिंगचे काम सुरु होते. थोडा वेळ झोपलो आणि सकाळी लगेच सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेलो. तेथून आता सरळ तुझ्याशी बोलण्यासाठी इथे ऑफिसमध्ये आलो आहे. सकाळी मी काही मीटिंग ठेवल्या होत्या त्या आता सगळ्या पूर्ण करायच्यात. त्यानंतर परत रात्री चित्रपटाच्या कामासाठी जायचे आहे. उद्या सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहाणार आहे. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी २४ तास ऑन ड्यूटीच राहाणार आहे. खरे तर २४ डिसेंबर पर्यंतच नव्हे तक ३१ डिसेंबरपर्यंत मी या चित्रपटाच्या कामातच व्यस्त राहणार आहे कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या व्यवसायावर मला लक्ष द्यायचे आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे काम झाले असे नाही. ज्या निर्मात्यांनी चित्रपटात पैसे लावले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे कामही मला करायचे आहे. जत्रा चित्रपट मी माझ्या पैशांनी बनवला होता परंतु त्यासाठी काढलेले कर्ज मी अजून फेडतोय. मला ठाऊक आहे तुला हे खरे वाटणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. चित्रपटाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्या कॅमेरामनने म्हटलेच होते चित्रपटाचे नाव २४ तास ऑन ड्यूटी ठेवले आहे आपल्यालाही चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत २४ तास ड्यूटी करावी लागेल. आणि ते खरेच होत आहे.
चित्रपटाचे कथानक काय आहे? आजवर हिंदी आणि मराठी चित्रपटात पोलीस दलाबद्दल जास्त काही कोणी दाखवलेले नाही. चित्रपटात एक तर भ्रष्ट पोलीस अधिकारी असतो वा एकदम चांगला आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी. या दोन शेडव्यतिरिक्त संपूर्ण पोलीस दलाबद्दल कोणीही काहीही दाखवलेले नाही. प्रथमच मी संपूर्ण पोलीस दलाबद्दल मनोरंजनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी फक्त पोलीस दलाची चांगलीच बाजू मांडत आहे. पोलीस दलात जे काही घडते त्याचे खरेखुरे चित्रण मी केले आहे.एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पोलीस कसे २४ तास घर-दार विसरून आपली सेवा आणि सुरक्षा करीत असतात ते मी एका कथेच्या माध्यमातून दाखवले आहे. एका पोलीस अधिकार्यावर करण बेदीवर आतंकवादविरोधी पथक निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली जाते. या पथकासाठी त्याला जे १४ पोलीस दिलेले असतात ते संपूर्णपणे अपयशी ठरलेले पोलीस असतात. संपूर्ण पोलीस दलाला ठाऊक असते की, हे १४ जण काहीही करू शकणार नाहीत. परंतु करण बेदी कशा पद्धतीने या अपयशी १४ पोलिसांच्या मदतीने एक उत्कृष्ट टीम तयार करतो आणि शहराला तीन मोठ्या संकटातून वाचवतो त्याची कहानी म्हणजे माझा हा चित्रपट. मात्र पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की ही कथा मी मनोरंजनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांमध्येच नव्हे तर सगळ्या क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसे असतात परंतु आपण संपूर्ण पोलीस दलाला भ्रष्ट म्हणत असतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर पोलिसांकडे पाहाण्याची प्रेक्षकांची नजर नक्कीच बदलेल.
WD
हा चित्रपट बनवावा असे का वाटले? २६-११ नंतर लेखक संजय पवारने एक कथानक लिहिले होते. त्याने माझ्याशी बोलताना सांगितले की, पोलिसांचे खरे काम नागरिकांची सुरक्षा करणे आणि कायदाव्यवस्था व्यवस्थित राखणे आहे. असे असताना दहशतवाद्यांशी लढण्याचे कसलेही प्रशिक्षण नसताना आणि कसलीही आधुनिक हत्यारे नसताना त्यांनी ज्या बहादुरीने दहशतवाद्यांचा सामना केला त्याला सलाम ठोकावा वाटतो. त्याचे बोलणे ऐकल्यावर माझाही पोलिसांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण बदलला आणि मला वाटले की ही कथा पडद्यावर मांडणे आवश्यक आहे. त्यानंतर मग मी आणि संजय एकत्र बसलो आणि पटकथा, संवाद तयार केले. संजयचे वडील पोलीस असल्याने त्याला लहानपणापासूनच पोलीस दलाबद्दल चांगली माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारेच त्याने एक उत्कृष्ट कथानक रचले आहे.
चित्रपटाचा नायक पंजाबी का? मी मराठी-नॉन मराठी असे काही मानत नाही. तसे पाहिले तर पोलीस दलातील जास्तीत जास्त वरिष्ठ अधिकारी हे नॉन मराठीच आहेत. मी अनेक अशा अधिकार्यांशी बोललो जे उत्कृष्ट मराठी बोलतात. माझ्या कथेमध्ये करण बेदीचेच कॅरेक्टर सूट होत होते म्हणून मी करण बेदी ठेवला.
चित्रपटात एक हिंदी आइटम साँगही ठेवले आहेस? हो. मराठीमध्ये हिंदी आइटम साँगची सुरुवात मीच केली होती आणि आता समापन ही मीच करीत आहे. सहा वर्षांपूर्वी सोनालीला घेऊन मी आइटम साँग केले होते आणि आता या चित्रपटासाठी योहाना आणि स्वप्निल जोशीला घेऊन मी हिंदीमध्ये आइटम साँग केले आहे ज्याचे बोल आहेत सैयां है सनकी। मला हिंदी मराठी असे द्रेड़गुजरी काही नको होते. हिंदी भाषेमध्ये जसे टिपिकल टपोरी शब्द आहेत तसे मराठीत नाही म्हणूनच मी हे गाणे हिंदीत केले. मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल.
अमोल कोल्हेला करण बेदीच्या मुख्य भूमिकेसाठी का निवडलेस? या चित्रपटासाठी मला असा कलाकार हवा होता जो बोलत असताना १४-१५ लोकं शांतपणे त्याचे बोलणे ऐकतील. अमोलची मी शिवाजी महाराजांवर आच्चरित मालिका पाहिली होती. त्यात तो बोलत असताना अनेक मावळे शांतपणे त्याचे ऐकत असतात. हेच मला आवडले आणि म्हणूनच मी त्याची निवड केली. अमोलने खूपच चांगले काम केले आहे. या चित्रपटानंतर अमोलची एक वेगळी ओळख निर्माण होईल यात शंका नाही.
ऑन ड्यूटी २४ तासची निर्मिती ओडिसी कार्पोरेशन लि.ची असून संगीत पंकज पुष्कर यांचे असून अमोल कोल्हे यांच्याबरोबर क्रांती रेडकर, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, नकुल घाणेकर के साथ दहा विनोदी कलाकार चित्रपटात काम करीत आहेत.