भारतातले पहिले चित्रपटकार दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन... धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिकमध्ये झाला. पहिल्यापासूनच कलेची आवड असल्यामुळे त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस तसेच बडोद्याच्या कलाभवनमधून कलेचे शिक्षण घेतले. .
सुरुवातीला स्थिरचित्रणाचा अर्थात फोटोग्राफीचा छंद असलेले दादासाहेब जादूचे प्रयोगही करीत. त्यांनी चलत्चित्रच्या निर्मितीप्रक्रयेचा शोध घ्यायला सुरुवात केली. शिक्षणाच्या निमित्ताने जर्मनीत गेलेल्या दादासाहेब यांना त्याठिकाणी चलत्चित्र पाहायला मिळाले आणि असा चित्रपट भारतात आणण्याच्या ध्येयाने झपाटून जाऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. आपले घरदार विकले, कर्जे काढले आणि सरतेशेवटी त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट निर्माण केला.
१९१३ मध्ये कॉर्पोरेशन सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तर सगळे वातावरणच भारावून टाकले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मोहिनी-भस्मासूर, सत्यवान-सावित्री असे चित्रपट केले. लंकादहन या चित्रपटाने त्यांना अफाट यश मिळवून दिले. 1937 मध्ये त्यांनी गंगावतरण हा चित्रपट केला आणि तोच त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या प्रवासात त्यांनी भरपून पैसा, प्रसिध्दी मिळवली पण, नियतीच्या मनात काही औरच होते. त्यानंतर त्यांना खुप हाल सोसावे लागले. व्ही. शांताराम व इतर सहकार्यांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि याच आधारावर त्यांनी नाशिकमध्ये घर बांधले. १६ फेब्रुवारी १९४४ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या या योगदानामुळेच कलाक्षेत्रातील मान्यवरांना मानाचा, प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या चित्रमहर्षीचे योगदान रसिकजन कधीच विसरू शकणार नाहीत.