Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीत काम करायला छान वाटतं

मराठीत काम करायला छान वाटतं

वेबदुनिया

PR


सध्या काळाचा ट्रेंड बदलतो आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांचा दर्जा चांगलाच वधारला आहे. विशेष म्हणजे चांगले प्रेक्षक वाढले आहेत. वेगळे विषयही सुरू आहेत. हिंदी चित्रपटांत केवळ पैसा महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. त्या तुलनेत मराठी चित्रपट, आपली भाषा हे लक्षात घेतले तर ती आपली भाषा आहे, त्यामुळे मराठीत काम करायला छान वाटतं, अशी संवेदनशील प्रतिक्रिया खेडेकर यांनी दिली आहे. सचिन खेडेकर नुकतेच नांदेडच्या भेटीवर आले होते.

एरवी पडद्यावर आपल्या धीरगंभीर भूमिकांनी आपल्या अभिनयाचा आगळा ठसा उमटविणारे सचिन या भेटीदरम्यान बरेच दिलखुलास दिसून आले. खेडेकर म्हणाले की, एखादा मराठी चित्रपट पुनःपुन्हा चित्रपटगृहात झळकत नाही. काही महिन्यांतच तो टीव्हीवर येतो. त्यामुळे चित्रपट- निर्मितीचा, आमच्या अभिनयाचा जो आनंद, समाधान असते ते टिकून राहात नाही. टीव्हीमुळे मराठी चित्रपटांच्या दुर्दैवाचा दशावतार सुरूच आहे. आमची कला सिनेमा म्हणून चालली पाहिजे, मात्र प्रेक्षकांची ‘प्रायॉरिटी’ ही वेगळीच असते. आम्ही पुस्तके वाचत नाही, गाणी ऐकत नाही, त्यामुळे भाषेबद्दल आमची आत्मीयता जागी होतच नाही. सध्या विषय, सिनेमे उत्तम सुरू आहेत; पण पे्रक्षकांचा पाठिंबा पाहिजे तसा मिळत नाही. तुलनेत हिंदी चित्रपटांत एखादेच गाणे चांगले असते, मात्र ते सतत आपल्यावर बिंबवले जाते. त्यामुळे हिंदीतील ‘रद्दी चित्रपट’ देखील प्रेक्षक बघतात, ही मराठी चित्रपटांची शोकांतिका आहे, असे सचिन म्हणाले.


webdunia
PR


मराठी चित्रपट-नाटकांकडे प्रेक्षक वळले तरच संवाद वाढीस लागेल. नाट्यसंमेलनास हजारोंची उपस्थिती असते, मात्र नाटकास काही ‘शे’ च येतात. यावेळी खेडेकर यांनी ‘काकस्पर्श’ बद्दल माहिती सांगितली. ‘ही कथाच वेगळी होती. त्यात दिग्दर्शकाच्या व कथानकाच्या वळणावर अभिनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच सध्याच्या मराठी चित्रपटांच्या ‘विनोदात’ अडकलेल्या परिस्थितीतही हा चित्रपट उत्तम चालला’ . सध्या मल्टीप्लेक्समुळे चित्रपटांचे गणित व अर्थकारण बदलले आहे. असे असले तरी मराठी चित्रपट सध्या एका वेगळ्या वळणावर आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी सचिन खेडेकरांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्त्कृष्ट भूमिकेवर बोलताना त्यांनी ‘बोस-द फॉरगॉटन हिरो’ चित्रपटात साकारलेली नेताजी सुभाषबाबूंची साकारलेली व्यक्तिरेखा आवडल्याचे प्रांजळपणाने सांगितले. नाटक व चित्रपट हे दोन्हीही वेगळे आहेत. एकाची तुलना दुस-याशी होऊच शकत नाही. दोन्हीतही तेवढेच सामथ्र्य आहे. त्यामुळे मी आयुष्यात पडद्यावर नाटक अन् रंगभूमीवर सिनेमा करू शकत नाही. केवळ प्रेक्षकांनी मराठीकडे वळावे हीच माझी इच्छा आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह वेळेवर उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही मागणी करून थकलो आहोत. राजकीय दबावाचादेखील प्रयत्न झाला आहे. मात्र प्रेक्षकांच्या अट्टाहासाशिवाय चित्रपटगृह वेळीच उपलब्ध होणे शक्य नाही. प्रेक्षकांनीही आपला वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांसाठी आग्रही नसतात, ही खंतही खेडेकर यांनी व्यक्त केली. यावेळी सचिन खेडेकर यांनी त्यांच्या आगामी ‘पितृऋण’ या चित्रपटाबद्दल माहिती दिली. यात प्रख्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची भूमिका आहे. या चित्रपटाबाबतही ते आशावादी असल्याचे भेटीदरम्यान दिसून आले. हा चित्रपट सुधा मूर्ती यांच्या कादंबरीहून घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi