Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला नाविन्याचा ध्यास- राजीव पाटील

- अभिनय कुलकर्णी

मला नाविन्याचा ध्यास- राजीव पाटील
PR
'सनई चौघडे' या मुक्ता आर्ट्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. सुरवातीला 'कांदे पोहे' या नावाने बनविल्या जाणार्‍या या चित्रपटाचे नाव मध्यंतरी अचानक बदलून 'सनई चौघडे' केल्याने हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला. या मागे काही तरी वाद असल्याचेही बोलले जात होते. चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ आलेली असताना वादही उत्पन्न झाल्याने यामागचे कारण काय आणि चित्रपटही नेमका कसा बनला आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी दिग्दर्शक राजीव पाटील यांच्याशीच संपर्क साधला. 'सावरखेड एक गाव' या चित्रपटामुळे राजीव पाटील हे नाव मराठी रसिकांना चांगलेच ओळखीचे झाले आहे. त्यांच्याशी चर्चा करताना सहाजिकच पहिला प्रश्न चित्रपटाच्या नावासंदर्भातच विचारला गेला.

'कांदे पोहे'चं 'सनई चौघडे' कसं काय झालं?
पाटील- सुरवातीलाच कांदे पोहे, कांदे पोहे डॉट कॉम, ढोल ताशे, सनई चौघडे ही नावं समोर होती. ही सगळी लागू पडणारी होती. पण कथावस्तूला 'कांदे पोहे' हे नाव जास्त योग्य ठरत असल्याने आम्ही ते नाव घेतलं. पण मध्यंतरी एका मराठी तरूणानेच आमचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. त्याने आमच्या नावाला आक्षेप घेतला. आपण हे नाव नाटकासाठी रजिस्टर केल्याचं त्याने सांगितलं. आम्ही कांदे पोहे डॉट कॉम हे नाव घेतलं. तर त्यालाही त्याने आक्षेप घेतला. तो माघार घ्यायला तयार नव्हता. कोर्टातही हे प्रकरण वाढायची चिन्हे दिसू लागली. म्हणून मग आम्हीच नावापेक्षा चित्रपटाला महत्त्व द्यायचे ठरवले आणि सनई चौघडे हे नाव घेतलं. हेही नाव चित्रपटाला अतिशय सूट होणारं आहे.

कांदे पोहे आणि सनई चौघडे या नावावरून चित्रपट लग्नासंदर्भात दिसतोय. नेमकी कथावस्तू काय आहे?
पाटील- आजच्या तरूण पिढीच्या अपेक्षा, डॉट कॉमच्या या फेझमध्ये निर्माण झालेले नवनवीन प्रश्न यांचा उहापोह यात केलेला आहे. कांदे पोहे नावाच्या एका मॅरेज कंपनीच्या माध्यमातून तरूण पिढीचे आजचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

webdunia
PR
तुमच्या चित्रपटाचं संगीत वैशिष्ट्यपूर्ण असतं. 'सावरखेड'चं संगीत आजही गाजतं आहे. 'सनई चौघडे'त संगीताचं काही वेगळेपण आहे काय?
पाटील- नक्कीच आहे. यावेळी मी प्रथमच अवधूत गुप्तेबरोबर काम करतोय. या चित्रपटात अवधूतच्या स्टाईलचं एक गाणं आहे. हे रॉकी गाणं तरूणांना नक्कीच आवडल्याशिवाय रहाणार नाही. सुनिधी चौहान या निमित्ताने मराठीत गाते आहे. एकुणात संगितात काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीताबरोबरच मी सगळ्या बाबींकडे जाणीपवूर्क लक्ष देतो. कारण चित्रपट परिपूर्ण हवा अशी माझी इच्छा असते. याशिवाय त्यात काही वेगळेपण असावं असाही माझा प्रयत्न असतो.

चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत श्रेयस तळपदे आहे? पण 'स्टार कास्ट'मध्ये त्याचं नाव दिसत नाही. चित्रपटात तो कलावंत म्हणून आहे की नाही?
पाटील (हसत हसत) - हा एक सस्पेन्स आहे. तो आहेही आणि नाहीही. त्यामुळे ते पडद्यावर प्रत्यक्ष पाहिल्यावरच कळेल.

इतर कलावंतांबरोबरचा अनुभव कसा होता?
पाटील- शिल्पा तुळसकर आणि तुषार दळवी या ज्येष्ठ कलावंतांसोबत काम करण्यास मी स्वतः खूप उत्सुक होतो. कारण हे दोघेही ताकदीचे कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा अनुभव अतिशय चांगला होता. या कलावंतांचं वैशिष्ट्य म्हणजे ते चित्रपटात मोठ्या प्रमाणात गुंततात आणि हवी ती सगळी मदत करतात. याशिवाय या चित्रपटात मी नवोदित पाच अभिनेते आणि अभिनेत्रींना संधी दिली आहे. यांना आपण कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर पहातोच. पण आता त्यांना या चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे.

चित्रपटाचं शूटींग कुठे झालं?
पाटील- बहुतांश शूटींग पुण्यात झालं. काही मुंबईत झालं.

webdunia
PR
मुक्ता आर्ट्स हे बॅनर मराठीत उतरल्याने चित्रनिर्मितीत किती फरक पडू शकतो?
पाटील- नक्कीच. वास्तविक मी 'सावरखेड' केला त्यावेळीही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं होतं. त्यानंतर मग तांत्रिकदृष्ट्या चांगले सिनेमेही आले. पण यावेळी मात्र मुक्ता आर्ट्सबरोबर काम केल्यामुळे अतिशय उच्च दर्जाच्या तांत्रिक पाठबळावर मी हा चित्रपट केला. त्यामुळे निर्मितीमुल्यात नक्कीच फरक पडला. मुक्ता आर्ट्स एका प्रादेशिक भाषेत चित्रपट बनविते ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मराठीचा चेहरा मोहराही बदलू शकतो.

शेवटचा प्रश्न. सावरखेड एक थरार-रहस्यपट होता. मध्ये एक पौराणिक चित्रपटही केला. एका संताच्या चित्रपटावरही तुम्ही काम करता आहात. आणि 'सनई चौघडे' हा पुन्हा वेगळा चित्रपट. हे वैविध्य कसे काय?
पाटील- मी आतापर्यंत पाच चित्रपट केले आहेत. हे सगळे वेगळे आहेत. वेगळ्या विषयांचे, पार्श्वभूमीचे आहेत. मला वेगळं काही तरी करायला आवडतं. प्रत्येक चित्रपटाची चित्रभाषा वेगळी आहे. सध्या मी सयाजी शिंदेबरोबर एक फिल्म करतो आहे. शिवाय संत तुकडोजी महाराजांवरही चित्रपटाचे काम सुरू आहे. 'सनई चौघडे' तर पूर्णपणे 'सोशल' फिल्म आहे. थोडक्यात मला तेच तेच करायचा कंटाळा येतो. काही तरी नवीन करावंसं वाटतं. आणि तीच माझी उर्जा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi