Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट

- चंद्रकांत शिंदे

रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट

वेबदुनिया

WD
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे. अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्‍या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्‍या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून बॉलीवुडचे प्रख्यात संकलक प्रकाश जाधव यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) नावाचा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले जाणार. नुकताच हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवण्यात आला.

प्रकाश जाधव यांनी प्रकाश मेहरा यांच्या मोहब्बत के दुश्मन, जादूगर, जिंदगी एक जुआसाठी सहाय्यक संकलक म्हणून काम केले आहे. तसेच आग का तूफान, वीर, पोलीस लॉकअप, आग और चिंगारी हे हिंदी चित्रपट आणि सुखी संसाराची बारा सूत्रे, कलम ३०२, चकवा, अक्षदा अश्रुंच्या या मराठी चित्रपटांबरोबरच एका लग्नाची गोष्ट, अशी ही फसवा फसवी, मुलगा, भंडारा प्रेमाचा, नवरा अवली बायको लवली या मराठी चित्रपटांचेही संकलन केले आहे. त्यांचे या एकाच वर्षात पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याबरोबरच ई टीव्ही, साम टीव्हीसाठी त्यांनी काही मालिकांचेही संकलन केलेले आहे. आता ते प्रथमच निर्माचा, दिग्दर्शक आणि संकलक अशा तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर रमाबाई भीमराव आंबेडकर चित्रपटाद्वारा येत आहेत.

वेबदुनियाशी आपल्या या महत्वाकांक्षी चित्रपटाबद्दल माहिती देताना प्रकाश जाधव यांनी सांगितले, बॉलीवुडमध्ये मी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. मला स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी मी एक चांगला चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. अनेक दिवस कथानकावर विचार करीत असतानाच मी बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा वाचत होतो. ती वाचताना मला जाणवले की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी जिजाऊंचा मोठा वाटा होता तेवढाच मोठा वाटा बाबासाहेबांना मोठे करण्याच त्यांच्या पत्नी रमाईचाही होता. मी रमाबाईंच्या जीवनावरच चित्रपट बनवण्याचे नक्की केले. मी चौकशी केली असता मला कळले कि अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी हे शिवधनुष्य पेलण्याची घोषणा केली होती. परंतु घोषणेच्या पुढे चित्रपट सरकला नाही. मी ठरवले की आपण हे शिवधनुष्य पेलायचे. मी माझ्या काही मित्रांना माझी योजना सांगितली, ती त्यांना खूपच आवडली. आम्ही जराही घोषणाबाजी न करता चित्रपटाचे काम सुरु केले. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर जितकी पुस्तके होती ती सर्व आणली. ती वाचली आणि त्यातून महत्वाच्या घटना निवडून पटकथा तयार केली.

प्रकाश जाधव यांनी पुढे सांगितले, पटकथा तर तयार झाली आता कलाकारांची निवड करणे कठिन काम होते कारण रमाबाईंचे चरित्र हुबेहूब साकारणारी नायिकाच सापडत नव्हती. बाबासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी गणेश जेठेला घेण्याचे नक्की केले कारण त्याने यापूर्वी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती आणि तो या भूमिकेत फिट होता. रमाबाईंच्या भूमिकेसाठी विचार करीत असताना मला निशा परुळेकरचे नाव आठवले. मी तिच्याबरोबर काही चित्रपट केले असल्याने तीचा आवाका मला ठाऊक होता. मी तिला विचारले तेव्हा तीही तयार झाली आणि आम्ही लगेच चित्रपट सुरु केला. चित्रपटाचे शूटिंग कुठे-कुठे केले विचारता प्रकाश जाधव यांनी सांगितले, जास्तीत जास्त शूटिंग आम्ही कोकणात केले. फक्त मुंबईत बाबासाहेब आणि रमाबाई जेथे राहात होते तेथेच शूटिंग केले. मी स्वतः संकलक असल्याने चित्रपटाचे पूर्ण रूप माझ्या डोळ्यासमोर होते आणि मी जसे ठरवले तसाच हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी कोकणातील कलाकारांनी आणि लोकांनी खूपच मदत केली आहे. त्यांच्या मदतीविना हा चित्रपट पूर्णच होऊ शकला नसता.

webdunia
WD
चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करणार का विचारता प्रकाश जाधव यांनी सांगितले, हो. मराठीबरोबरच हिंदीतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याची आमची योजना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे उत्तर प्रदेशमध्येही आहेत. त्यांच्यापयर्ंतही आम्ही हा चित्रपट पोहोचवू इच्छितो. त्याचबरोबर परदेशातही आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत. त्यासाठी इंग्रजी सबटाइटलही आम्ही करून घेतले आहेत. हा चित्रपट भव्य व्हावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहेत. यासाठी आम्ही सरकार वा आंबेडकरवादी संघटनांकडून एक पैसाही घेतलेला नाही.

आंबेडकरांच्या नात्यातील लोकांना हा चित्रपट दाखवला आहे का विचारता प्रकाश जाधव यांनी सांगितले, अजून नाही. जेव्हा चित्रपटाची डॉल्बी प्रिंट येईल तेव्हाच मी त्यांना हा चित्रपट दाखवणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.

साईनाथ चित्र या बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटात निशा परुळेकर आणि गणेश जेठे यांच्याबरोबर दशरथ हातिसकर, स्नेहल वेलणकर, मनोज टाकणे, दत्ता रेडकर, बाल कलाकार कृति शेरीगर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाला संगीत देव चव्हाण यांनी दिले असून गीते द. ब. सकपाळ यांची आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

फोटो गॅलरी

Share this Story:

Follow Webdunia marathi