रसिकाला प्रॉमिस केले होते : सोनाली
‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर्स’ हे नाटक जेव्हा रंगमंचावर आले तेव्हा इतरांप्रमाणे मीही या नाटकाची आणि रसिका जोशीची जबरदस्त फॅन झाले. तेव्हा नाटकाच्या निर्मितीसाठी मी जवळजवळ हट्टच धरला होता. तेव्हा ते जमले नाही मात्र, मी रसिका जोशीला प्रॉमिस केल्याप्रमाणे या वेळी संधी हुकू दिली नाही.’ तब्बल 12 वर्षानी मराठी रंगभूमीवर पदार्पण करत असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगत होती.नव्याने रंगमंचावर अवतरणार्या ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर्स’ या नाटकात सोनाली कुलकर्णी अभिनेत्री आणि सहनिर्माती या भूमिकेत सहभागी झाली आहे. तरुणाईला आपलासा वाटणारा ‘चॅटिंग’ हा कम्युनिकेशनचा पर्याय मध्यवर्ती ठेवून स्त्री-पुरुष नात्यातला मोकळेपणा, सहजीवन यांच्यावर बोलणारं नाटक ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर्स’ रंगमंचावर आले आणि तरुणाईने ते ‘लाइक’ केले. फेसबुक, ट्विटर, वॉट्स अँपच्या माध्यमातून सतत कनेक्टेड असलेल्या रसिकांना ताकदीची रसिका जोशी यांची ‘व्हाइट लिली’ तर मिलिंद फाटक यांचा ‘नाइट रायडर’ या दोघांचे टय़ुनिंग खूप आवडले होते. मात्र, मोजके प्रयोग झाल्यावर रसिका जोशी यांच्या जाण्याने नाटक बंद पडले.