Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विनोदातील 'दादा'गिरी

- मनोज पोलादे

विनोदातील 'दादा'गिरी
PR
मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी किंग हे विशेषण द्यायचे झाल्यास कुठलाही वाद न होता ते दादा कोंडकेंना दिले जाईल हे निश्चित. केवळ द्वयर्थी विनोद असणारे चित्रपट असे म्हणून दादांच्या चित्रपटांना हिणवणारा तथाकथित 'क्लास' प्रेक्षकवर्ग त्याच दादांचे चित्रपट घरात सीडी आणून पाहतात हेही एक सत्य आहे.

द्वयर्थी विनोद एवढेच दादांच्या यशाचे कारण असते तर तसे प्रयत्न करणारे इतर चित्रपटही यशस्वी ठरले असते. पण हे फक्त दादांच्या बाबतीतच घडले. आणि सलग नऊ चित्रपट यशस्वी ठरल्याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्समध्ये त्याची नोंदही झाली आहे. दादांनी ग्रामीण भागात व चारचौघांत केल्या जाणाऱया विनोदाला विस्तृत अभिव्यक्तीची संधी दिली.

रोजच्या कष्टाने थकलेल्या जनतेला चार घटका हसायला भाग पाडले. त्यामुळे सामान्यांचे प्रतिनिधित्व खऱया अर्थाने त्यांच्या चित्रपटात दिसले. ग्रामीण जीवन, संस्कृती, लोकसंगीत, चालीरीती यांचे चित्रण त्यांच्या चित्रपटातून दिसते. आणि विनोद हा त्यांच्या चित्रपटांचा आत्मा होता.

त्याची कथा काहीही असो. विनोदाच्या माध्यमातून अनेक प्रश्वांवर, चुकीच्या प्रथांवर त्यांनी अचूक बोट ठेवले. दादांनी चित्रपटातील नायकाबद्दलच्या संकल्पनांना छेद दिला. हाफ पँट, खाली लोंबणारी नाडी, दिसायला साधारणं, बोलणही वेगळ्या धाटणीचं असा नायक लोकप्रिय ठरू शकतो का असा प्रश्न एरवी पडला असता.

पण दादा ही वैशिष्ट्ये घेऊनच लोकप्रिय ठरले. दादांचे बालपण मुंबईतल्या परळ भागात गेले. लहानपणापासूनच ते खोडकर. आई वडिलांच्या निधनानंतर दादा राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात रमले. तेथे ते सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत. राष्ट्र सेवा दलात काम करतांना अनेक बड्या व्यक्तींशी त्यांच्या ओळखी झाल्या.

त्यातूनचं मैत्रीचे नाते निर्माण झाले. निळू फुले आदी व्यक्तीशी परिचय याच दरम्यान झाला. येथेच काम करताना त्यांनी छपरी पलंगाचा वग अर्थात 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकात काम केले. ते तुफान यशस्वी ठऱले. हास्याचे फवारे उडवित दादा राज्याच्या कानाकोपर्‍यात पोचले.

त्यांना चित्रपटसृष्टीत खरा ब्रेक दिला तो भालजी पेंढारकरांनी त्यांच्या तांबडी माती या चित्रपटातून. यानंतर दादांनी चित्रपट निर्मितीत उतरून यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू केली. वसंत सबनीस लिखित 'सोंगाड्या' हा खऱया अर्थाने निर्मळ विनोद असलेला त्यांचा एकमेव चित्रपट.

त्यानंतर त्यांनी 'पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, मुका घ्या मुका, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या' असे एकाहून एक असे चित्रपट देऊन बहार उडवून दिली. पण या चित्रपटांचा गाभी द्वयर्थी विनोद हाच होता. हे चित्रपट म्हणजे सबकुछ दादा असत.

ते अभिनय तर करीतच पण निर्मिती, दिग्दर्शन या बाबींबरोबरच कथा, पटकथा लेखनाबरोबर गीतलेखनही करीत. त्यांच्या चित्रपटाची गाणी व संगीतही खास त्यांच्या 'स्टाईलचं' असे. बहुतेक करून त्यांचे संगीत राम लक्ष्मण या जोडीने दिले. त्यांच्यासाठीचा आवाज प्रामुख्याने महेंद्र कपूर वा जयवंत कुलकर्णी यांचा असे.

तर पार्श्वगायिका म्हणून ते नेहमी उषा मंगेशकरांना पसंती देत. सहाजिकच दादांच्या चित्रपटाचे संगीतही वेगळे असे. 'ढगाला लागली कळ, गंगू तारूण्य तूझं बेफाम यासारखी गाणी ही काही उदाहरणे आहेत. ग्रामीण प्रेक्षकांसोबतचं शहरी प्रेक्षकही त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीशी, जीवनाशी तुटलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न करायचे.

त्यांच्या चित्रपटाची पार्श्वभूमी ग्रामीण असली तरी आशय हा सर्वव्यापकच असायचा. द्वयर्थी विनोदामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. सेन्सॉर मंडळ व दादा यांच्यात वाद ठरलेले असायचे. सेन्सॉरच्या कचाट्यातून शिताफीने ते आपले संवाद सोडवून आणायचे. सेन्सार मंडळाशी होणार्‍या वादाचे अनेक किस्से आज खळखळून हसायला लावतात.

दादांनी चित्रपटाकडे अभिव्यक्तीचे उच्च माध्यम वगैरे अशा नजरेतून पाहिलेच नाही. त्यांनी फक्त सामान्य प्रेक्षकाच्या कष्टी चेहऱयावर हसू फुलवायचे आहे एवढेच पाहिले. त्यासाठी समकालिन संदर्भाची, प्रश्नांची कथा घेतली नि त्याला आपल्या पद्धतीने मांडली. हे करताना कळत नकळत समाजातील उणीवांवर बोटही ठेवले.

त्यामुळेच त्यांचे चित्रपट यशस्वी ठरले. मराठी जनतेने त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. त्यांच्या चित्रपटांचे इतर भाषांतही रिमेक झाले. त्यानी ही हिंदी चित्रपटही केले. फावल्या वेळात त्याच्या डोक्यात सतत चित्रपटाबाबत चिंतन चालायचे.

ते अस्सल कलाकार होते आणि कलाकार रमतो तो कलेत. दादांचही तसेच होते. दादांनी कलेच्या प्रांतात चौफेर मुशाफिरी केली. असा हा कलंदर माणूस, एक दिवस दृदयविकाराच्या झटक्याने अनंताच्या प्रवासाला निघून गेला.

दादांनी केलेले चित्रपट:

1. येऊ का घरात
2. राम राम गंगाराम
3. आली अंगावर
4. वाजवू का
5. ह्योच नवरा पाहिजे
6. बोट लावीन तिथं गुदगुल्या
7. मुका घ्या मुका
8. तुमचं आमचं जमल
9. पांडू हवालदार
10. पळवापळवी
11. मला घेवून चला
12. एकटा जीव सदाशीव
13. सोंगाड्या
14. आंधळा मारतो डोळा
15. तांबडी

Share this Story:

Follow Webdunia marathi