Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्ही शांताराम : महान दिग्दर्शक

व्ही शांताराम : महान दिग्दर्शक

मनोज पोलादे

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शकांमध्ये व्ही. शांताराम यांचे नाव घ्यावे लागेल. ' दो आँखे बारा हात, आदमी, माणूस, शेजारी, पिंजरा' यासारखे आशयगर्भ आणि अविस्मरणीय चित्रपट त्यांनी दिले. शांताराम हे दुरदृष्टी असणारे दिग्दर्शक होते. चित्रपट माध्यमाची समाजमनावर प्रभाव पाडण्याची ताकद त्यांनी अचूक ओळखली होती.

त्यामुळेच शांताराम यांनी चित्रपटास समाज सुधारणेचे माध्यम मानून मानवतावादाचा पुरस्कार करण्यासोबतच त्यांनी समाजातील अन्याय, अत्याचार, ढोंगी रूढी, परंपरा यांवर भाष्य केले. कोल्हापुरात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची. प्रसंगी त्यांना रेल्वेत काम करावे लागले.

नंतर ते गंधर्व नाटक मंडळीत काम करू लागले. काम होते पडदा ओढण्याचे. त्यांच्या करकिर्दीला वळण मिळाले ते बाबूराव पेंटर यांच्या कंपनीत काम करायला लागले तेव्हा. तेथे काम करत असताना त्यांनी निर्मितीचे सर्व पैलू जाणून घेतले. अभिनयसुद्धा केला. ' सावकारी पाश' या १९२५ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी तरूण सावकाराची भूमिका केली होती.

प्रशिक्षण भरपूर झाल्यानंतर त्यांना याच कंपनीत दिग्दर्शनाची पहिली संधीही मिळाली. चित्रपट होता ' नेताजी पालकर' . नंतर त्यांना स्वतंत्र चित्रनिर्मितीच्या संधी खुणावू लागल्या. म्हणून मग व्ही. जी. दामले, एस.बी. कुलकर्णी, एस. फत्तेलाल, के. आर. धायबेकर यांच्या साथीने ' प्रभात' कंपनीची स्थापना केली.

१९३२ मध्ये आलेला ' अयोध्येचा राजा' हा या संस्थेचा पहिला चित्रपट. त्यानंतर प्रभातने एकाहून एक संस्मरणीय चि‍त्रपटांची निर्मिती करत इतिहास घडविला. १९३३ साली ही कंपनी कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतरीत झाली. सुरवातीला शांताराम यांना पेंटर यांचाच फॉर्म्यूला वापरत पौराणिक चित्रपटांची निर्मिती केली.

पण जर्मनीला जाऊन आल्यानंतर मात्र, त्यांच्या दृष्टीकोनात खूप फरक पडला. यातूनच प्रदर्शित झाला तो 'अमृतमंथन' हा चित्रपट. बुद्धकाळाचे दर्शन घडविणार्‍या या चित्रपटात पारंपरिक रूढीविरोधात भाष्य केले आहे. १९३६ मध्ये आलेला ' अमर ज्योती' हा चित्रपटही एका बंडखोर महिलेच्या लढ्याची कहाणी सांगतो.

यानंतर त्यांचे कुंकू (हिदीत दुनिया ना माने), शेजारी आणि माणूस हे अत्यंत गाजलेले व माईलस्टोन ठरलेले चित्रपट आले. त्यांच्या चित्रपटातील स्त्रिया ह्या पुरोगामी व बंडखोर विचारांच्या होत्या. 'कुंकू' हे त्याचे उत्तम उदाहरण. ' माणूस' हा त्यांचा सवौत्तम चित्रपट मानला जातो. शेजारी (पडोसी) हा जातीय सौहार्दावर बेतलेला चित्रपट उल्लेखनीय आहे.

या तीन चित्रपटांनंतर शांताराम यांनी प्रभात कंपनी सोडली आणि राजकमल स्टुडीओची १९४२ मध्ये स्थापना केली. ' शकुंतला' ही या कंपनीची पहिली निर्मिती. त्यानंतर अजरामर चित्रपटांच्या यादीत असलेला डॉ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट आला. चीन जपान युद्धात डॉ. कोटणीस यांनी केलेले कार्य हा या चित्रपटाचा विषय होता.

त्यावेळी टोरांटोत भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यांनंतर अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दहेज, नवरंग, गीत गाया पत्थरोने हे चित्रपट आले. दो आँखे बारा हात या त्यांच्या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबतच राष्ट्रपती पारीतोषिकाने गौरविण्यात आले.

मराठीतील माईलस्टोन ठरलेला 'पिंजरा' हा चित्रपटही शांतारामबापूंचाच. प्रभात स्टुडिओचे नंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूट ऑफ इडियात रूपांतर करण्यात आले. या संस्थेतून भारतीय चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलावंत निर्माण झाले. या संस्थेने अनेक दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, छायाचित्रकार, तंत्रज्ञ चित्रपटसृष्टीस दिले आहेत.

पुण्यातील या संस्थेत आजही हे कलाकार विस्डम ट्री खाली बसून गत आठवणीत गुंतून जातात. शांताराम यांनी लावलेला वृक्ष आजही फळं देत आहे. शांताराम यांनी आपल्या चित्रपटांमधून समाज व मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंचे दर्शन घडवित अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कलेच्या माध्यमातून सर्वस्पर्शी व सर्वकालिक अभिव्यक्ती करणारा शांताराम यांच्यासारखा दिग्दर्शक हा विरळाच.


व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट -


कुंकू
पिंजरा
झांजर
माणूस
शेजारी
नेताजी पालकर
गोपाळ क्रिश्न
उदयकाळ
राणी साहेबा
चंद्र सेन
जलती निशानी
अयोध्येचा राजा
धर्मात्मा
दुनिया ना माने
अमृतमंथन
गीत गाया पत्थरोने
दो आँखे बारा हाथ
झनक झनक पायल बाजे
डॉ कोटणी‍स की अमर कहानी















Share this Story:

Follow Webdunia marathi