संगीत क्षेत्रात मराठी तरुणाचा जोरदार प्रवेश
चंद्रकांत शिंदे , शनिवार, 12 फेब्रुवारी 2011 (16:02 IST)
रत्नागिरीतल्या एका छोट्याशा वाडीतील गीतकार, गायक आणि संगीतकार असलेला संतोष सावंत गेली दहा वर्ष संगीत क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचा हा प्रयत्न आता यशस्वी झाला असून त्याचा पहिला सोलो हिंदी अलबम व्हॉईस ऑफ हार्ट व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर टी सीरीज बाजारात आणत आहे. हिंदी अलबमच्या क्षेत्रात प्रथमच एका मराठी गायक, गीतकार आणि संगीतकाराचा अलबम आला आहे.रत्नागिरीतील एका छोटया वाडीतील घरात जन्माला आलेल्या संतोषला लहानपणापासून कविता करण्याची, गाण्याची आणि संगीत देण्याची आवड होती. त्याच्या संपूर्ण पंचक्रोशीत त्याची गाणी चांगलीच लोकप्रिय झालेली आहेत. गरीब घरच्या संतोषने रस्त्यावरील लाइटमध्ये अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण केले. कठिण परिस्थितितही न डगमगता त्याने आपले शिक्षण आणि संगीताचा ध्यास सुरु ठेवला. वेबदुनियाशी खास गप्पा मारताना संतोषने सांगितले, मी कधी विचारही केला नव्हता की माझा सोलो हिツदी अलबम बाजारात येईल. तोही टी सीरीजसारखी मोठी कंपनी आणेल. मी कोकणातील एका छोटया खेड्यातील गरीब घरातील मुलगा. माझे वडील खूप चांगले लोकगायक होते परंतु मला त्यां चे गाणे ऐकण्याची सं धी मिळाली नाही कारण मी छोटा असतानाच त्यांचे माझ्या डोक्यावरील छत्र हरपले. परंतु त्यांचे संगीत माझ्या रक्तात आले होते. त्यामुळे मी लहानपणापासूनच कविता करीत असे. त्यांना संगीत देत असे. आमच्या वाडीत माझी गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत. घरची परिस्थिति चांगली नसतानाही मी शिक्षण सुरु ठेवले. मॅकेनिकनल इंजीनियरिंग केले आणि नोकरीला लागलो. मात्र तरीही संगीताशी नाते तोडले नाही. मला प्रत्येक प्रसंगात कविता सुचत असे आणि ती मी लिहून काढत असे. भाषा माझ्या कवितांच्या आड कधी आलीच नाही. मराठीबरोबच मी हिंदीतही चांगल्या कविता लिहू लागलो होतो. आपला स्वतःचा अलबम आणावा अशी माझी इच्छा होती आणि गेल्या दहा वर्षांपासून मी त्यासाठी प्रयत्न करीत होतो. गेल्या वर्षी मी माझ्या काही निवडक गीतांचा अलबम बनवला आणि टी सीरीजकडे घेऊन गेलो. पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांना अलबम आवडला आणि त्यांनी लगेच तो बाजारात आणण्याचे ठरवले. या अलबममध्ये एकूण आठ गाणी आहेत ज्यापैकी दोन रिमिक्स आहेत. सर्व गाणी मीच लिहिलेली असून त्यांना संगीतही मीच दिले आहे आणि मी ती गायलीही आहेत. दोन गाण्यांचा म्यूजिक व्हीडियोही तयार करण्यात आलेला आहे जो सर्व वाहिन्यांवर दाखवला जात आहे आणि चांगलाच लोकप्रियही झालेला आहे. गीतांमध्ये मी भारतीय संगीताचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण भारतीय संगीत कालातीत आहे. मधुर संगीत असेल तरच ते अनेक वर्ष टिकते आणि लोकांना आवडते. धांगडधिंगा असलेले संगीत तेवढ्यापुरते लोकप्रिय होते. संतोषने पुढे सांगितले, मला जेव्हा एखादे गीत सुचते तेव्हा ते सोबत संगीतही घेऊन येते त्यामुळे माझ्या मनात त्या गीताची चाल आपोआप तयार होते आणि माझे काम सोपे होते. आज माझ्याकडे अनेक गीते तयार आहेत. आता लवकरच माझा दूसरा अलबमही टी सीरीजतर्फेच बाजारात आणला जाणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि कलेच्या प्रति माझे प्रेम यामुळेच माझे हे पहिले यशस्वी पाऊल पडले आहे. मी बॉलीवुडमध्ये गीतकार, गायक आणि संगीतकार अशा रूपात स्वतःचे स्थान निर्माण करू इच्छितो. मला ठाऊक आहे हे सोपे नाही. माझ्यासारखे लाखों कलाकार देशात आहेत ज्यांना संधीची गरज आहे. मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी मला मदत करणार्यांचा खूप आभारी आहे. मला ठाऊक आहे एका अलबमने मी उच्च शिखरावर पोहोचू शकणार नाही. मलाही घाई नाही. एक-एक पायरी चढतच मी पुढे जाणार आहे. व्हॉईस ऑफ हार्टनंतर आता माझ्या नवीन येणार्या अलबमच्या म्यूझिक व्हीडियोमध्ये काम करण्यासाठी सारा खान तयार झाली आहे. माझ्यासाठी ही मोठी गोष्ठ आहे.