महाराष्ट्राप्रमाणेच परप्रांतात गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील मराठी बांधवही एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. श्रावण संपून गणेशोत्सव सुरू झाला तरी इंदूरात मात्र गणेशोत्सवात श्रावणाचा अनुभव आला. निमित्त होते, प्रख्यात गायिका सावनी शेंडे यांच्या मैफलीचे. श्रावणात गायलं जाणारं गीत म्हणजे सावनी. त्यामुळे या श्रावणी भिजपावसाची आठवण सावनीताईंच्या चिंब सूरांनी श्रोतृवर्गाला करून दिली. श्री. गणेश मंडळात रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी इंदूरमधील दर्दी रसिकांनी गर्दी केली होती. सावनी यांनी आपल्या सुरावटीने केलेली गणेशवंदना श्रोत्यांना इतकी भावली की, आपसूक ओठातून 'क्या बात है...' ची दाद निघाली. सावनीच्या मैफलीची नि तिच्या प्रवासाचे हे काही ठळक टप्पे....
'पुरीया धनश्री'ने प्रारंभ
या मैफलीचा औपचारीक प्रारंभ गणरायाच्या सुरेल आरतीने झाला. त्यानंतर मग सावनी यांनीच रचना केलेल्या पुरीया धनश्रीतील 'केसर रंग शाम सांज दुल्हन बनी' या बंदिशीने या स्वरयात्रेची सुरवात झाली. एकतालातील या बंदिशीवर रसिकही डोलत होते. 'क्या बात है' ची खास इंदुरी आवृत्तीही योग्य जागी ऐकू येत होती. आलाप आणि तानांची वलये जणू त्या वातावरणाला कवेत घेत होती. रसिकही त्यात अलगदपणे नकळत लपेटले जात होते.
गायनाचा 'श्रीगणेशा' घरातूनच
गात असताना अधूनमधून सावनीताईंनी श्रोत्यांशीही संवाद साधला. आपल्या आजीकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताची संथा घेतली. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शोभा गुर्टू या त्यांच्या गुरू. गुरूप्रती सावनीताईंची अतिशय भक्ती आहे. सूरांनाच परमेश्वर मानून त्या रोज पाच ते सहा तास रियाझ करतात. वडिल डॉ. संजीव शेंडे यांनी सुरांचे संस्कार केले त्यामुळे मी कमी वयात यशाच्या शिखरापर्यत पोहचू शकले.' असेही त्या नम्रतेने सांगतात. मैफिल पुढे नेताना त्यांनी गणरायावर आधारीत स्वरचित बंदीश पेश केली.' गणपती विघ्नहरण गजानन, विरागत चंद्रमा भाल, एकदंत चर्तुभुज आनंदकारक... ' या बंदिशीने वातावरणाला कलेच्या अधिपतीचा स्पर्श झाला.
ज्येष्ठांनी दिली कौतुकाची थाप..
या मैफलीस इंदूरमधील ज्येष्ठ आणि मर्मज्ञ रसिकांची उपस्थिती होती. त्यामुळेच गायनातल्या प्रत्येग जागेवर योग्य दादही मिळत होती. या संगीत रसिकांनी मध्यंतरात आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. सावनी यांनी लहान वयात मिळवलेल्या यशाची स्तुती करत त्यांनी कौतुकाची थाप दिली. गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मराठे, गिरीश बोरगांवकर, सुभाष देशपांडे, गणेश रानडे, किरण मांजरेकर, पुरूषोत्तम जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जाणत्या रसिकांची तुडूंब गर्दी
या कार्यक्रमासाठी इंदूरमधील जाणते रसिक मोठ्या प्रमाणात आले होते. गणेश मंडळाचे सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते. त्यामुळेच प्रत्येक तानेला मिळणार्या प्रतिसादाने सावनीताई भारावून जात होत्या. या बंदिशीत त्यांनी काही सांगितीक प्रयोगही सादर केले. हंसध्वनी रागातील बंदिशीनंतर त्यांनी गाण्यातील चतुरंग प्रकार सादर केला. यामध्ये तबल्याचे बोल, तराणा, स्वर आणि आलापी सादर करून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हिंडोल, भूपाली, छायानट, श्री, भैरव, बसंत, मारवा, बिलावल, शंकरा, देस, तिलककामोद, पुरीया, गुजरी, भैरवी अशा विविध रागांनी रागमालाही सजवली.
भरभरून प्रतिसादाने आनंदाश्रू'
गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण आम्ही देऊच पण, पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन सावनीजींना आम्ही आजच करतो..' असे मंडळाचे सदस्य जयंत भिसे यांनी सांगताच सावनीजींना भरून आले. 'असे दर्दी श्रोते असले आणि उत्स्फूर्त दाद मिळाली की मनाला बरे वाटते,'' अशा उत्कट भावना त्यांनी व्यक्त केल्या. उज्जैनचे डॉ. हिरेंद्र दीक्षितयांनी तबल्यावर, इंदूरचे विवेक बनसोडे यांनी संवादिनी साथ करुन मैफलीत रंग भरला. शिल्पा मसूरकर व रुचा शर्मा यांनी तानपुर्यावर साथ केली. श्रावणातलं सुरेल गीत