सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने मराठी चित्रपट दिग्दर्शनात विषय, आशय, सादरीकरण व हाताळणीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या दिग्दर्शकांच्या जोडीने मराठी चित्रपटात नवीन अध्यायास सुरवात केली. दोघी, देवराई, वास्तुपूरूष, दहावी फ' या अप्रतिम चित्रपटांची निर्मिती या द्वयींची आहे.
सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नाहीत. त्यांचा पिंड समाजसेवकाचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यांचे सहकारी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातून दिग्दर्शनाचे धडे गिरविले.
या नवीन, तरूण उमद्या कलाकाराने या संस्थेतून बाहेर पडतानाच चित्रपट माध्यमाचा वापर सामाजिक जाणीवेतून करण्याचा ध्यास बाळगला होता. सुरवातीस ते वळले मराठी रंगभूमीकडे. तेथे त्यांनी विविध प्रयोग केले. त्यानंतर ते चित्रपटाकडे वळले.
सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन झपाटलेल्या व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ' दोघी, वास्तूपुरूष' यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले.
'दोघी' चित्रपटात पुरूषप्रधान संस्कृतीत महिलेचा आधार हरविल्यानंतर प्रस्थापित सामाजिक परिस्थितीत तिच्या वाट्याला येणारे जीवनाचे चित्रण केलेले आहे. ' वास्तूपुरूष' चित्रपटातून त्यांनी कर्मठ कुटुंबात वाढलेल्या डॉक्टरची कथा मांडली आहे. ' दहावी फ' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.
शाळेत काही कारणामुळे मोडतोड करणारी मुले नंतर ठिकठिकाणी काम करून हे नुकसान भरून देतात अशी ही कथा. अतिशय प्रभावी मांडणीतून प्रेक्षकांपुढे येते. चित्रपट विषय व आशयाच्या बाबतीत वेगळा आहे. ' देवराई' या चित्रपटात स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामुळे व्यक्तीच्या जीवनात घडणारे बदल व त्याचा कुटूंबावर होणारा परिणाम मांडला आहे.
' नितळ' या चित्रपटात कोडाची समस्या हाताळली आहे. या दिग्दर्शक द्वयींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा चित्रपट अभ्यासपूर्ण व वस्तूनिष्ठ असतो. हाताळणीत कोठेही भडकपणा नसतो. प्रस्थापित सामाजिक रूढी, परंपरा, व विविध समस्यांचा व्यक्ती किवा समाजावर होणार्या परिणामांचे विविध बाजूंनी विश्लेषण करून तो विषय प्रेक्षकांपर्यत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट-
१. बाधा
२. नितळ
३. वास्तुपूरूष
४. दोघी
५. दहावी फ
६. जिंदगी झिंदाबाद