Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही - निर्माती संगीता आहिर

स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही - निर्माती संगीता आहिर
, सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (12:18 IST)
गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहात निर्माती म्हणून काय आव्हान पेललीत?
याबाबतीत मी नशीबवान आहे. माझ्या वाट्याला फार काही स्ट्रगल आला नाही. निर्माती होण्यासाठी मी व्यवस्थित पेपरवर्क केलं. करत असलेल्या प्रोजेक्टची आणि त्याच्यासाठी लागल्या गोष्टीची सखोल माहिती करून घेतली. या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार मंडळींशी मी बोलले त्यांच्याकडून बरंच काही शिकले. त्यासोबत मला लाभलेली सगळ्यांची साथ खूप मोलाची ठरली. आता मी निर्माती म्हणून दगडी चाळ आणि 'कॅलेंडर गर्ल्स' असे दोन सिनेमे करतेय. 
 
रिअलिस्टिक चित्रपट करणाऱ्या दोन व्यक्ती या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेत कसा अनुभव होता ?
मधूर आणि आणि माझ्यातील एक सामाईक दुवा म्हणजे कोणत्याही प्रोजेक्टचा आम्ही सखोल अभ्यास करतो. एकसारख्या विचारांची माणसं एकत्र आल्यावर नक्कीच काम उत्तम होणार यात शंका नाही. मुळात मी इंटिरियर डिझायनर असल्याने सिनेमाशी थेट संपर्क आला नाही. मात्र सिनेमाचा सेट किंवा त्याची डिझायनिंग कशी असते किंवा असावी याची साधारण माहिती होती. मधुरने जेव्हा 'कॅलेंडर गर्ल्स' हा प्रोजेक्ट माझ्याशी शेअर केला  तेव्हा आम्ही बरीच चर्चा केली. मॉडलिंग क्षेत्राबाबत आजही बरीच उत्सुकता आपल्यात आहे. मुळात मला महिलांशी संबधित एक सिनेमा करण्याचा उद्देश्य असल्याने या सिनेमाच्या निर्मिती मी मनापासून स्वीकारली.
 
तुमच्या मते सिनेमा उत्तम होण्यासाठी अचूक निर्मिती मुल्य काय असावीत?
एक उत्तम सिनेमा होण्यासाठी खूप प्लानिंग लागतं. मुळात आपल्या योजना आणि कल्पना पारदर्शी असाव्या लागतात. त्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये किती गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. मी स्वतः एक महिला असल्यामुळे मी करत असलेल्या इतर जणींना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार मंडळीना सिनेमात कोणत्या गोष्टींची गरज आहे याची निर्मात्यांनी नेमकी दखल घेतली पाहिजे. 'कॅलेंडर गर्ल्स' च्या मी देखील बऱ्याच गोष्ठी मधूर कडून नव्याने समजावून घेतल्या. 
 
यशस्वी उद्योजक महिलांच्या यादीत तुमचे नाव आग्रहाने घेतले जाते तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
आजही मी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकत आहे. त्यामुळे सल्ला देण्या इतपत मी कोणी मोठी नाही. मी पडद्याआड राहून काम करण अधिक पसंत करते. घर, व्यवसाय आम्ही सुरु केलेली संकल्प प्रतिष्ठान संस्था सगळ्यात माझं सम समान लक्ष असतं घरच्या जेवणात कोणती भाजी असावी माझी मुलं शाळा कॉलेज मध्ये व्यवस्थित जात आहेत ना, त्यांची त्यांची आवड निवड सगळ्याकडे माझं बारीक नजर असतं. हे मी आनंदाने करते  त्याचप्रमाणे निर्माती म्हणून देखील संकल्प प्रतिष्ठानने जेव्हा पहिल्यांदा दहीहंडी उभारण्याचा संकल्प केला तेव्हा लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्या गोष्टींची जबाबदारी मी आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने घेतली होती. मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकासाठी काही तरी केलं पाहिजे.  
 
गेली अनेक वर्ष सिनेक्षेत्राशी  निगडीत आहात निर्माती व्यतिरिक्त इतर कोणती जबाबदारी घ्यायला आवडेल का? (दिग्दर्शिका / लेखिका)
सध्या तरी मी स्वतः काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात नाही. निर्माती म्हणूनच अजून चांगला प्रयत्न करेन. 
 
असा एखादा विषय आहे का ज्यावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्याची तुमची प्रबळ इच्छा आहे?
जब्बार पटेल दिग्दर्शित अभिनेत्री स्मिता पाटील यांचा उंबरठा सिनेमा मला खरंच खूप प्रभावित करणारा ठरला. त्यामुळे सिनेमाचा विषय महिलांशी संबंधित असेल यात दुमत नाही. मात्र नक्कीच तो आजच्या जगाशी पिढीशी आणि तरुणाईशी रिलेट करणारा असेल. याची सुरवात मी माझ्या घरापासून केली आहे. माझ्या दोन्ही मुलीना रोल मॉडेल मानते. रोज काहीतरी त्यांच्याकडून शिकायला मिळतं. कॅलेंडर गर्ल पाहताना तुम्हाला नक्की याचा प्रत्यय येईल. 
 
आपल्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे यंदाची नवरात्री कशी साजरी केली जाणार आहे?
नवरात्री शक्यतो आम्ही घरातील मंडळीच एकत्र साजरी करतो. संकल्प पप्रतिष्ठान तर्फे वर्षभर या ना त्या कारणाने बरीच समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. ते म्हणतात ना, स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही तेच खरं. संकल्प प्रतिष्ठानची घडी बसवण्यासाठी जवळ पास ९ वर्ष मी फिल्म मेकिंग मधून ब्रेक घेतला होता. सध्या आम्ही १४ हजार जेष्ठ नागरिक दत्तक घेतले आहेत. त्यांची सर्वोतोपरी काळजी संस्थे तर्फे घेतली जाते. १२ डॉक्टरांची एक टीम आम्ही इथेच ठेवली आहे जी त्याची वेळोवेळी तपासणी करेल. ११ ते १५ च्या  महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या २ हजार पुस्तकांची बँक आम्ही सज्ज ठेवली आहे. गरजू विध्यार्थ्यांना त्यातून मदत केली जाते. नुकतंच आम्ही २०० मोतीबिंदूची ऑपरेशन यशस्वीरित्या करवून आणली. त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही उपक्रम हाती घेतले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi