Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व

दिलीप चिंचाळकर

हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व
पंडित कुमार गंधर्वांच्या गायकीवर आधारीत हंस अकेला या लघुपटाची निर्मिती फिल्म्स डिव्हिजन आणि प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली आहे. जब्बार यांनीच त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा लघुपट आतापर्यंत अमेरिका आणि भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, अलाहाबाद येथे दाखविण्यात आला आहे. या लघुपटाबद्दल........

पंडित कुमार गंधर्व हे शापित गंधर्व होते. ते काही काळासाठी या पृथ्वीतलावर अवतरले आणि आपल्या अद्भुत स्वरांचा पिसारा फुलवून पुन्हा आपल्या देवलोकात निघून गेले.

पंडितजींनी श्रोत्यांच्या मनावर राज्य केले. ते चिंतनशील गायक होते. दार्शनिकही होते. शिवाय कलेचे पारखीही. त्यांचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते, की त्यांचे सगळे पैलू एका लेखात मावणे अशक्य व्हावे. असे असेल तर मग सेल्युलाईडची फिल्म तरी त्यांना कितपत न्याय देऊ शकेल? पण तरीही पंडितजींच्या व्यक्तिमत्वाला पकडण्याचा प्रयत्न प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी एका लघुपटाद्वारे केला आहे. या लघुपटाचे नावही अगदी सार्थ आहे. हंस अकेला.

जब्बार पटेल यांना पंडितजींच्या स्वरांची भूल लहानपणीच पडली. त्यांनी अनेकदा पंडितजींना जवळून पाहिले. ऐकले. या शापित गंधर्वाला कॅमेर्‍यात पकडण्याची त्यांची मनस्वी इच्छा होती. अन्यथा हा गंधर्व देवलोकात गेल्यानंतर आपल्या हातात स्वरांचे फक्त ओले स्पर्श रहातील, असे त्यांना वाटत होते. जब्बार यांच्या मनातील इच्छा साकार होण्याची संधी मिळाली १९८५ मध्ये. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जब्बार यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवर एक लघुपट बनवायला सांगितला. त्यावेळी जब्बार यांच्या मनात होते पंडित भीमसेन जोशी, पं. जसराज, किशोरी आमोणकर आणि पंडित कुमार गंधर्व. बाकी तिघांना चितारणे सोपे होते, पण कुमारजींच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणे कठिण होते. कारण पंडितजींच्या वेगवान गायकीमुळे त्यांचे रेकॉर्डिंग रेडियो स्टेशनवर करणेही कठीण जात असे. शिवाय खुद्द पंडितजींना आपल्यावर चित्रपट वगैरे बनविणे तेवढे काही मान्य नव्हते. पण त्यांचे परमममित्र पु.ल. देशपांडे यांनी आग्रह क रून आणि जब्बार पटेलांनी मनधरणी करून पंडितजींना राजी केले.

कुमारजींची गायकी चित्रित करण्यासाठी खास कार्यक्रम केला. त्याला मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर उपस्थित होते. त्यावेळी मैफलीत कॅमेरा पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. पंडितजींना जब्बारना विचारले कॅमेरात किती मोठा रोल आहे? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे? जब्बार यांनी सांगितले पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. 'हंस अकेला' मध्ये ही चीजही पहायला- ऐकायला मिळेल.

(तुम्हाला आवडलेली पंडितजींची गाणी, नाट्यपदे किंवा चीजा खाली लिहा.)

या अनुभवानंतर जब्बार पटेल यांच्या मनात पंडितजींवर स्वतंत्र लघुपट बनविण्याचा विचार आला. तसा प्रस्तावही त्यांनी राज्य शासनाकडे पाठविला. पंडितजीही त्याला राजी झाले. त्यासाठी जब्बार यांनी वेळ काढून देवासला जाण्याचे ठरविले. पण दैवगती न्यारी असते असे म्हणतात ना. जानेवारी १९९२ मध्ये पंडितजींचे निधन झाले. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी म्हणजे २००५ मध्ये फिल्म्स डिव्हिजनने जब्बार यांच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

पंडितजी असताना त्यांना कॅमेरात पकडणे कठिण होते. आता ते नसताना त्यांचे व्यक्तिमत्व कसे सादर करायचे? शिवाय पु. ल. देशपांडे, राहूल बारपुते, विष्णू चिंचाळकर ही कुमारजींच्या सहवासातील ज्येष्ठ मंडळीही निधन पावली होती. पण पंडितजींच्या पत्नी वसुंधरा आणि मुलगी कलापिनी यांच्या सहकार्याने जब्बार यांनी काम सुरू केले. कुमारांचे शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांच्या संगतीत ही संगीत यात्रा बहरली. मुंबई, दिल्ली, अलाहाबाद, देवासपर्यंत पोहोचली. पंडितजींवर माळव्यातील लोकगीतांचा मोठा प्रभाव आहे. तो टिपण्यासाठी देवासपासून जवळच असलेल्या शाजापूरनजिक धुनसी गावात चित्रीकरण करण्यात आले. या गावातील महिला एका लिंबाच्या झाडाखाली एकत्र आल्या. त्यांनी कुंकू भरे रे हे गीत अगदी मूळ चालीत गायले. कुमारजींनी हे लोकगीत आपल्या वेगळ्या शैलीत गायले. ते या लघुपटात आहे.

अकराव्या वर्षी अचानक कुमारजींना कंठ फुटला आणि त्यांची गायकी प्रसिद्ध झाली. त्या गायकीचे काही प्रसंगही त्यात आहेत. वाडिया मूव्हिटोन त्यावेळी नामांकित कलाकारांना आमंत्रित करून त्यांचे दहा मिनिटांचे गायन रेकॉर्ड करत असे. त्यावेळी त्यांनी कुमारजींचे गायन रेकॉर्ड केले होते. त्याची चित्रफित या लघुपटात पहायला मिळते.

हंस अकेलाची कथा कुमारजींच्या कुटुंबाबरोबरच शिष्य आणि चाहत्यांच्या साथीने पुढे जाते. यात वसुंधरा-कलापिनी कोमकली, भुवन कोमकली, बाबूरावरेळे, शांताराम कशाळकर, अमरेंद्रनाथ-सत्येंद्रनाथ वर्मा, पंढरीनाथ कोल्हापुरे, सत्यशील देशपांडे, मधुप-माधवी, मुद्गुल, लीला सॅम्सन, अशोक वाजपेयी यांच ्या माध्यमातून कुमारजी उलगडत जातात. ते नुसते रियाझ करणारे गायक नव्हते. एखादी चीज सादर करताना ते स्व रांची अशी काही सृष्टी तयार करीत की त्यापूर्वी कुणी ती केली नसावी. एखादा पारंपरिक राग अशा पद्धतीने सादर करीत की जणू नवे काही सादर केले जात आहे. या सार्‍या व्यक्तिमत्वाला हा लघुपट स्पर्श करून जातो. कुमारांना उलगडण्यासाठी लघुपट अपुरा पडणार हे तर निश्चित. पण तरीही हा चांगला प्रयत्न आहे.

(तुम्हाला आवडलेली पंडितजींची गाणी, नाट्यपदे किंवा चीजा खाली लिहा.)

Share this Story:

Follow Webdunia marathi