Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१४० चित्रपटगृहात प्रदर्शित होणार पारध- गजेंद्र अहिरे

- चंद्रकांत शिंदे

१४० चित्रपटगृहात प्रदर्शित होणार पारध- गजेंद्र अहिरे
WD
स... सासुचा एकाच वेळेस ४० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असतानाच गजेंद्र अहिरे आपला नवा चित्रपट पारध जवळ-जवळ १४० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करीत आहे. वेगळ्या वळणावरील चित्रपट निर्मिती करण्यात अग्रेसर असलेला गजेंद्र ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची होणारी परवड पारध द्वारा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव वेगळ्यां भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने गजेंद्र, मकरंद आणि सिद्धाथबरोबर वेबदुनियाने मारलेल्या गप्पांचा सारांश.

पारधबद्दल सांगताना गजेंद्र म्हणाला, या चित्रपटाची कथा गेली तीन वर्षे माझ्या डोक्यात घोळत होती. एक दिवस अनुराधा तलाठी यांच्या रिसॉर्टवर माझ्याच एका चित्रिपटाच्या चित्रिकरणादरम्यान अनुराधा तलाठी यांच्याबरोबर गप्पा मारताना एक नवीन चित्रपट तयार करावा असे ठरले. मी ही कथा अनुराधा तलाठी यांना ऐकवली आणि त्यांनी लगेच या चित्रपटाच्या निमिर्तीला होकार दिला. खरे तर एक चित्रपट हातात असेल तर मी दुसरा चित्रपट सुरु करीत नाही. परंतु ही कथा मला इतकी भावली होती कि निर्माता मिळताच मी या चित्रपटाला सुरुवात केली आणि हा चित्रपट पूर्ण ही केला. २७ ऑगस्टपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील १४० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाची कथा नुकतेच आधुनिकीकरणाचे वारे आलेल्या एका गावाचे आहे. धड आधुनिकही ही नाही आणि धड पूर्णपणे ग्रामीणही राहिलेले नाही अशा गावातील एका राजकीय कार्यकर्त्याची घुसमट दाखवणारा हा चित्रपट आहे. अशाच एका गावातील एका कुटुंबाची ही कथा आहे. शेती करणारा मोठा भाऊ विट्ठल, त्याची सुशिक्षित परंतु त्याला माहित होऊ न देणारी त्याची पत्नी, शिक्षण घेणारा धाकटा भाऊ आनंद आणि काहीच न करणारा परंतु स्थानीय नेत्याचा कार्यकर्ता झालेला मधला भाऊ यशवंत. अंबादास स्थानीय नेता. अंबादास एका वरिष्ठ नेत्याला खाली खेचण्यासाठी यशवंतचा वापर करतो आणि त्यामुळे यशवंतचे घरदार कसे नष्ट होते ते मी यात दाखवले आहे.

परंतु अशा कथेवर यापूर्वीही चित्रपट आलेले आहेत असे म्हणताच गजेंद्र म्हणाला, आले असतील, मी ते नाकारीत नाही. परंतु ही एक सत्यकथा आहे. एक दिवस मला या राजकारणामुळे उद्धस्त झालेल्या कार्यकर्त्यानेच त्याची कथा सांगितली. त्याने जेव्हा सांगितली तेव्हाच मला जाणवले की यातून एक उत्कृष्ट चित्रपट तयार होऊ शकतो. यशवंतच्या भूमिकेसाठी मला सिद्धार्थ जाधव अत्यंत योग्य वाटला तक स्थानिक नेता अंबादासच्या भूमिकेसाठी मकरंद अनासपुरे. मी या दोघांना विचारले आणि हे दोघेही लगेच तयार झाले. संपूर्ण टीम उत्कृष्ट असल्याने आणि सेटवरच रात्री उशिरापर्यंत पटकथेवर आम्ही चर्चा करीत असल्याने एक उत्कृष्ट चित्रपट आम्ही निर्माण करू शकलो आहोत. या चित्रपटात एकही गाणे नाही कारण गाण्यासाठी सिच्युएशनच नव्हती. उगाचच गाणी घुसडणे मला आवडत नाही.

त्या कार्यकर्त्याला हा चित्रपट दाखवला आहे का? त्याची प्रतिक्रिया काय होती? त्या कार्यकर्त्याने मला फक्त त्याची कथा ऐकवली होती. त्याच्या घरच्यांबद्दल मला त्याने काहीही सांगितले नव्हते. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर तो अवाक झाला. तो म्हणाला मी तुम्हारा माझ्या कुटुंबाबद्दल काहीही सांगितले नाही तरीही तुम्ही ते हुबेहुब उभे केले आहे. मला वाटते त्याची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.

webdunia
WD
सिद्धार्थने यशवंतच्या भूमिकेबद्दल सांगितले, मी शिवड़ीमध्ये झोपड़पट्टीत रहात होतो. लहानपणी निवडणुकीच्या वेळेस पोलिंग बूथमध्ये बसण्यासाठी आम्हाला वडा पाव दिले जात. आम्हाला वडा पाव म्हणजे मोठी पर्वणी वाटत असे. एक कार्यकर्ता म्हणून त्या वेळेपासून मी राजकारण पहात आहे. एखादा नेता जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला शेकडों लोकांसमोर माझा वाघ म्हणतो तेव्हा अंगावर मूठभर मांस चढते. याच कार्यकर्त्याचा नेता जेव्हा आपल्या फायद्यासाठी वापर करतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची जी वातावात होते त्याची कथा म्हणजे हा चित्रपट. गजेंद्रने जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारले तेव्हा मी लगेच तयार झालो कारण मी वेगळ्या भूमिकांच्या शोधात आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक जेव्हा या यशवंतला पाहतील तेव्हा त्यांना यशवंतच दिसेल, सिद्धार्थ दिसणार नाही.

मकरंद प्रथमच या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारीत आहे. गजेंद्र जेव्हा जेव्हा मला बोलावतो तेव्हा मी लगेत जातो कारण मला ठाऊक आहे तो मला चांगलीच भूमिका देतो. त्याने जेव्हा मला अंबादासच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा प्रथम मी उत्सुक नव्हतो कारण मला एक टिपिकल ग्रामीण राजकारणी उभा करायचा नव्हता. अशा भूमिका आजवर अनेकांनी साकारलेल्या आहेत. गजेंद्रने मला या भूमिकेचे कंगोरे समजावले तेव्हा मला या भूमिकेची ताकत कळली आणि मी तयार झालो. मी कधी इमेजला घाबरत नाही. मला ठाऊक आहे की चांगली भूमिका मग ती नायकाची असो वा खलनायकाची प्रेक्षक स्वीकारतातच. या चित्रपटातून माझे खलनायकी रंग प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मी या चित्रपटाची अत्यंत उत्कटतेने वाट पहात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi