Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर

मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर

अभिनय कुलकर्णी

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्र (आणि मतभेद) दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. पण बहुतेकवेळा या दोघांतील मैत्रिपेक्षा त्यांच्यातील मतभेदच अधिक प्रकर्षाने पुढे येतात. ते सहाजिकही आहे. पण त्यांच्यातील मतभेद परस्पर प्रेमात आणि स्वतःशी प्रामाणिक रहाण्यातच दडले आहेत हेही मानले पाहिजे.

न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठी सुरू केल्यानंतर काही वर्षांत मुलभूत भूमिकांसंदर्भात दोघांचे मतभेद पुढे येऊ लागले. आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील.

पुढे अनेक कारणावरून मतभेदाची दरी रूंदावत गेली. संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून ती वाढली. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. हे मतभेद पुढे वाढत गेले याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली.

पण त्यानंतर आणि तत्पूर्वीही दोघे अत्यंत चांगले मित्र होते. शिवाय एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे.

त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.

मतभेदांनी दोघांना विभक्त केले ते वर्ष होते. 1887. या वर्षीच्या 25 ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फूट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` अशा शब्दांत दोघांचे संबंध तुटले. पण मने तुटली नाहीत.

आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत. आणि टिळकही त्या छापत.

फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधाचे हे एक उदाहरण.

तीव्र मतभेद असतानाही हे दोघे एकमेकावंर प्रेम करीत. सार्वजनिक वादात शिवीगाळ झाली असतानाही अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहित असता टिळक घळाघळा रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही.

या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``

आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय. यात शंका नाही.``

यानंतर 21 वर्षांनी म्हणजे 1916 मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनु्ष्यासहि दारिद्र्यांत राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखरे गावा लागतो.``


``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्रापत् करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरूषच खरे धीर पुरूष होत``

आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्रीत मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी ही दोन्ही माणसे होती.

(संदर्भः लोकमान्य टिळक चरित्रः लेखक न. चिं. केळकर)

Share this Story:

Follow Webdunia marathi