Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

कु.ऋचा दीपक कर्पे

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)
webdunia

कु.ऋचा दीपक कर्पे

‘प्रदूषण’ फार-फार ‘सामान्य’ म्हटलं तर, ‘कॉमन’ विषय आहे. ‘प्रदूषण’ म्हणताच डोळ्यापुढे धूळ-धूर, ---जमीन, घाण पाणी कच-याचे ढीग येतात. कानात कर्कश ‘हॉर्न’ वाजू लागतात आणिक विचार केला की, ह्याचे प्रकार ‘जल प्रदूषण’, ‘वायू प्रदूषण’, ‘मृदा प्रदूषण’, ‘ध्वनी प्रदूषण’ लक्षात येतात...आणखी खोलवर गेलो की ह्याची कारणे पण आढळतात. वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारी विषारी रसायने. झाडांची-वनांची नासधूस प्लास्टिकचा प्रयोग इतर सर्वांना सर्व माहित आहे. अगदी पाचवी-सहावीची मुले पण ‘प्रदूषणाचे प्रकार, त्याची कारण त्याची निवारणं धडाधडा सांगतील. मोठी समजूतदार मंडळी तर अगदी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून ‘प्रदूषणाचे विकराळ रूप आपल्या समोर मांडतील.
 
थोडक्यात ‘कळतंय पण वळत नाही’ असे झाले आहे. कां? हे सर्व माहिती असून देखील प्रदूषण कमी होत नाही. कारण? आपण आजवर वैज्ञानिक किंवा गौण प्रकार कारणं आणि त्याचे निवारण ह्यावरच विचार केला आहे. मुख्य किंवा मानसिक/आंतरिक प्रकारावर कारणांवर विचारच केला नाही.
 
‘प्रदूषणाचा’ मुख्य प्रकार आहे मन आणि मस्तिष्क प्रदूषण आणि हाच तो प्रकार ज्यावर मुख्य कारणे अवलंबून आहे. आपण ‘वायू प्रदूषणाबद्दल बोलतो, पण वाहतुकीची साधने, त्यातून निघणारा धूर, झाडांना कापून तेथे इमारती बांधणे. पुल, फ्लायओव्हर काढणे ह्या सा-यावर बंदी लावली कां? आपण अंगणाच्या जागेवर एक ‘एक्स्ट्रारूम’ बांधतोच ना? आधी घरात झाडे असायची, जास्त आणि फर्नीचर कमी. पण आज उलट झालं आहे. फ्रीज, ए.सी. ह्यातून निघणारी विषारी गॅस’ क्लोरोफ्लोरो ‘कॉर्बन’ वायूमंडळासाठी नुकसानदायक आहे. पण आज घरोघरी ए.सी.,  फ्रीज आहेतच नं? आधी आपण सायकल किंवा ‘पब्लिक ट्रांसपोर्ट’ जास्त वापरायचो पण आज घरोघरी दुचाकी वाहन आणि कार आहे. ‘बस’ किंवा ‘टैंपो’ मधे बसणे म्हणजे ‘कमीपणा’ वाटतो. वेळ वाया जातो, इ..
 
आपण जल प्रदूषणावर बोलतो. शासनाने अभ्यास पुरतकात धडे लावले आहे. पण नदी किनारी हज्जारो कारखाने विषारी रसायने पाण्यात सोडत आहे. उर्वरक, कीटनाशक, पाण्यात सर्रास वाहवत आहेत. त्यांची मुले (कारखाना मालकांची) पण शाळेत जातच असतील नं? ‘प्रदूषणा’ वर धडे वाचतच असतील नं? पास पण होत असतील चांगल्या मार्कांनी. शासनाद्वारे शाळेत धडे शिकवले जातात पण त्याच उपयोग उद्योगपती किंवा कारखाना मालकांवर नियंत्रण नाही. हा विरोधाभासच नं!
 
आज घरात जेवढे सदस्य तेवढेच मोबाईल. आजपासून १० वर्षा आधी बिना मोबाईलच्या पण आयुष्य सुरू होतंच नं? सर्वांना कळतंय की मोबाईल वेव्ह/तरंगांनी वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतोय, चिमण्या आणि इतर पक्षी नष्ट होत आहेत. प्रवासी पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. आणि हे सर्व आकडे शासना जवळ आहेत. पण ह्या दिशेत काहीच सख्ती नाही. शासन सोडा, साधारण माणसाला पण कळतंय तरी तो ‘मोबाईल’ सोडून राहूच शकत नाही. 
 
जाणून-समजून आपण आपले भविष्य रसातळात नेत आहोत, कारण आपले ‘मन’ आपले ‘विचारच’ प्रदूषित झाले आहे. आणि हेच ते ‘मन आणि मस्तिष्क’ प्रदूषण.
 
आता जर ‘मन आणि मस्तिष्क प्रदूषण’ च्या कारणांवर विचार केला तर पहिलं कारण ‘नैतिक मूल्य’ ढासळणे. आज ‘सादा जीवन उच्च विचार’ ही विचारधाराच राहिली नाही. ‘सत्य’, ‘प्रामाणिकपणा’, ‘आत्मसम्मान’ , ‘दया’, ‘परोपकार’ हे सारे शब्द फक्त आणि फक्त साहित्यात आढळतात. ‘पैसा’ हाच खरा धर्म झाला आहे.
 
दुसरं कारण म्हणजे, ‘स्टैंडर्ड ऑफ लिव्हिंग’ जीवनस्तर वाढले आहे. घरात एसी, फ्रीज, कार हवीच. प्रत्येक खोली ‘वेल फर्निश्ड’ हवीच. कापडी विंâवा कागदी पिशव्या, ‘आऊटडेटेड’. नवी टेक्नोलॉजी येताच जुना मोबाईल बदलायचा. 
 
सायकल चालवायची पण ‘जिम’ मधे. एका व्यक्तिचे किमान दोन फ्लॅट तरी हवे. प्रत्येकाची वेगळी ‘बेडरूम’, ‘स्टडीरूम’ हवी म्हणून झाडे लावायला जागाच नाही. ‘प्रदूषण’ ह्या विषायवर चर्चा पण ‘ए.सी.’ रूम मधे होते.
 
तिसरं कारण म्हंटल तर अप्रायोगिक शिक्षण पद्धती! ‘छात्र’, ‘मुले’ ही राष्ट्राचे भविष्य! लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर साथ देतात. आजची मुलेतर फारच हुषार पण आहे. पण त्यांची अभ्यास पद्धती दोषपूर्ण आहे. ती फक्त वाचतात पाठ करतात, लिहितात आणि नव्वद टक्के मार्क आणतात. पण ती शिक्षा त्यांच्या अंगवळणी पडत नाही. झाडांची उपयोगिता, पर्यावरण, जैव मंडळ, प्रदूषण, कारणे, निवारणे हे सर्व त्यांचा अभ्यास क्रमात आहे पण फक्त ‘थ्योरिटिकल’, ‘प्रेक्टिकल’ काहीच नाही. अभ्यास म्हणजे फक्त चांगले गुण मिळवा आणि चांगली नोकरी मिळवा एवढेच. आपण त्यांचे पण ‘मन आणि मस्तिष्क’ प्रदूषित करत आहोत नं?
 
तर आता जर निष्कर्ष लावायचा आहे आणि प्रदूषणांच्या कारणांचे निवारण हवे आहे, तर सर्वात आधी विचारांची शुद्धी व्हायला हवी. काय चूक काय बरोबर हे कळायला हवं. ‘लोकं काय म्हणतील’ ह्या पेक्षा ‘तुमचं मन काय म्हणतं’ हा विचार करायला हवा. ‘पैसा’ हा ‘देव’ नाही हे समजून घ्यायला हवं. आज मोठमोठाले बिल्डर शासनाला लाच देवून हिरवीगार झाडे कापून, झील/तलाव भरून त्यावर मोठमोठाल्या इमारती बांधत आहे. पैसा एवढा की मोजता मोजता आपले आयुष्य निघून जाईल. तरी हव्यास कमी होत नाही. हे ‘मन आणि मस्तिष्क प्रदूषण’ नं?
 
आज लोकांच्या मनात चांगले विचार, चांगले संस्कार पेरायची गरज आहे. ‘विकास’ आणि ‘विनाश’ फक्त एक अक्षराचा फरक आहे. जास्त ‘विकास’ विनाशाकडे नेणार हे लक्षात असणे गरजेचे आहे.
 
शेवटी गीतेत म्हटलेच आहे, ‘मनुष्य रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, ‘ह्या जगात त्याचे काहीच नाही’ मग कां एवढी पळापळ? जीव घेणी प्रतिस्पर्धा? पैशाचा हव्यास? निसर्गाची नासधूस? ते ही जाणून समजून. हे जग फार सुंदर आहे, ह्याला सुंदरच राहू द्या. ह्याच्या विनाशाचे नाही विकासाचे कारण कां? ‘मन आणि मस्तिष्क’ प्रदूषणाला लढा द्या. अशक्य काहीच नाही. ‘शुभम अस्तु’!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भंडारा सिल्क अर्थात कोसा साडी