Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 14 March 2025
webdunia

पत्रिकेतील योनी व मनुष्यस्वभाव

पत्रिकेतील योनी व मनुष्यस्वभाव
जन्मलेला प्रत्येक जीव हा आपापले भाग्य घेऊनच जन्माला येत असतो आणि ते भाग्य मूल जन्मताना जी अवकाशस्थ ग्रहगोल परिस्थिती असते त्यावर अवलंबून असते. त्या ग्रह-तार्‍यांच्या स्थितीचे दर्शन आपल्याला त्या त्या जातकाच्या पत्रिकेवरून होते. गुरुकृपा, मानवी प्रयत्न, आत्मस्वातंत्र्य यामुळे काही प्रमाणात तरी भाग्य बदलले जाऊ शकते; परंतु असे भाग्य फार थोड्यांचेच असते. बाकीच्या सर्वसामान्य लोकांचा भाग्यलेख मात्र पत्रिकेतल्या १२ स्थानांद्वारे जाणता येतो. परंतु ती ग्रहस्थिती अभ्यासताना फक्त त्या ग्रहस्थितीचाच विचार न करता तदनुषंगाने पत्रिकेतील गण, वर्ण, योनी आदी बाबींचाही विचार करावा लागतो. त्यामुळे अनुमानात अधिकाधिक पक्केपणा येतो. 
 
जन्म-मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होणे कठीण असते. ८४ दशलक्ष कोटी योनीतून फिरत फिरत आपणास मौल्यवान असा मानव जन्म प्राप्त होतो, असे विधान बर्‍याच ठिकाणी आपणास दिसून येते. मानव जन्म घेतल्यावर मात्र त्याच्या जन्मटिपणावरून त्याला कोणती योनी प्राप्त झाली आहे यावरून त्याचा मूळचा स्वभाव दिसून येतो. पत्रिकेतील योनी विचारामुळे त्या त्या व्यक्तीची मनोवृत्ती, जीवनमूल्य, स्वभाव विशेष, आवडीनिवडी, गुणावगुण समजतात. शास्त्रकारांनी ज्योतिषशास्त्रात फक्त १४ योनींचाच उल्लेख केला आहे. अश्‍व, गज, मेष, सर्प, श्‍वान, मार्जार, गौ, महिष, व्याघ्र, मृग, वानर, नकुल आणि सिंह या होत. नक्षत्र आणि योनी यांच्या साहाय्याने माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा आपण घेऊ शकतो. प्रत्येक योनीला जे प्राणिवाचक नाव दिलेले आहे, त्यावरूनच आपल्या लक्षात येते की प्रामुख्याने त्या प्राण्याचा स्वभाव आणि त्या त्या योनिप्रधान व्यक्तीच्या स्वभावात बरेचसे समान गुण असतात. जन्मत: आपल्याला लाभलेली चंद्ररास चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याप्रमाणे आपल्याला योनी प्राप्त झालेली असते. चंद्र म्हणजे मन. आपली मानसिकता त्याप्रमाणे त्या योनीचा प्रभाव आपल्याला स्वभावात जाणवतो याची प्रचिती येते. प्रत्येक प्राण्याची काही मूलभूत स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. त्याची मनुष्य स्वभावाशी सांगड घालण्याचा प्रयत्न शास्त्रकर्त्यांनी केला आहे.
 
अश्‍व : अश्‍विनी, शततारका या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची अश्‍व योनी आहे. अश्‍व म्हणजे घोडा. अतिशय चपळपणा, उत्साह, साहस, प्रभावशाली, ओजस्वीपणा, स्वामिनिष्ठता हे या योनीच्या लोकांचे गुण दिसून येतात. 
 
गज : भरणी, रेवती या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची गज योनी आहे. गज म्हणजे हत्ती. बलवान, शक्तिशाली, उत्साही, डौलदारपणा, संथ व धिमी वृत्ती, बुद्धिमान, उत्तम स्मरणशक्ती, शुद्र व क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष न देण्याची वृत्ती हे हत्तीचे मुख्य गुण आहेत. 
 
मेष : कृत्तिका, पुष्य या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची मेष योनी आहे. मेष म्हणजे मेंढा. टक्कर देण्याची वृत्ती आहे. धाडस आहे, मात्र हे धाडस अनाठायी आहे. पराक्रमी, महान योद्धा, मेहनती, भोगी तसेच दुसर्‍यावर उपकार करणारे, काहीसा उतावळा स्वभाव आहे. 
 
सर्प : रोहिणी, मृगशीर्ष या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची सर्प योनी आहे. अत्यंत क्रोधी स्वभाव, मन अस्थिर आणि चंचल, चपळता, खाण्या-पिण्याचे शौकीन, डुक धरणे हा सर्पाचा गुणधर्म किंवा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे सर्पयोनीची माणसे एखाद्या प्रसंगी कोणी अपमान केल्यास त्याच्यावर डुक धरून राहतात व योग्य वेळ येताच उट्टे काढतात. 
 
श्‍वान : आद्र्रा, मूळ या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची श्‍वान योनी आहे. बहादुर आणि साहसी, उत्साही आणि जोशीला स्वभाव, मेहनती व परिश्रमी, दुसर्‍यांना मदत करणारे, आई-वडिलांचे सेवक, स्वामिनिष्ठता, प्रामाणिकपणा, इमानदार अशी या योनीची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत.
 
मार्जार : पुनर्वसू, आश्लेषा या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची मार्जार योनी आहे. मार्जार म्हणजे मांजर. मांजर म्हटले की चोरटी व लबाड वृत्ती दिसून येते. मांजर हा कुटुंबप्रिय प्राणी आहे. अत्यंत निडर, बहादुर आणि हिंमतवाले, दुसर्‍या प्रति दुष्ट भावना ठेवणारे, काहीसे शौकीन स्वरूपाचे असतात.
 
गौ : उत्तरा फाल्गुनी, उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची गौ योनी आहे. गौ म्हणजे गाय. गरीब, निरुपद्रवी असा स्वभाव असतो. सदा उत्साहित आणि आशावादी, मेहनती , परिश्रमाला प्राधान्य देणारे, बोलण्यात हुशार अशा प्रवृत्तीचे असतात. 
 
महिष : हस्त, स्वाती या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची महिषी योनी आहे. महिषी म्हणजे म्हैस. गलिच्छ घाणेरडी व आळशी असा स्वभाव, यांच्या घरी अस्वछता असते. 
 
व्याघ्र : चित्रा, विशाखा या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची व्याघ्र योनी आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. वाघ म्हणजे शौर्य आणि कौर्य यांचे मूर्तिमंत प्रतीक होय. सर्व प्रकारच्या कामात कुशलता, स्वतंत्रपणे काम करणारे, आपली प्रशंसा स्वत:च करणारे अशा स्वरूपाचे असतात. 
 
मृग : अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची मृग योनी आहे. मृग म्हणजे हरण. भित्रा स्वभाव. कोमल हृदय, नम्र व प्रेमपूर्ण व्यवहार, शांत मन, भांडणापासून काहीसे दूर राहणारे. या योनीची माणसे सहज म्हणून फिरायला निघाली तरी चार चौघांना बरोबर घेऊन निघतील.
 
वानर : पूर्वाषाढा, श्रवण या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची वानर योनी आहे. चंचल स्वभाव, लढाईसाठी नेहमी तत्पर, व्रांत्य व खोडकर स्वभाव, अस्थिर व चंचल वृत्ती, सहसा स्थिर बसणार नाहीत ही यांची वैशिष्ट्ये आहेत.
 
नकुल (मुंगूस) : उत्तराषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची नकुल (मुंगूस) योनी आहे. हाडवैर धरणे हा मुंगूसाचा गुणधर्म दिसून येतो. एकादा एखाद्याशी शत्रुत्व किंवा वैर धरले मग आयुष्यभर त्याचे तोंड पाहणार नाहीत असा त्यांचा स्वभाव असतो. प्रत्येक कामात पारंगत, अत्यंत परोपकारी, आई-वडिलांचे भक्त असतात.
 
सिंह : धनिष्ठा, पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची सिंह योनी आहे. धर्मात्मा, स्वाभिमानी, आपल्या मतावर ठाम, अत्यंत साहसी, रुबाबदार, ऐटदार, कुटुंबाची जबाबदारी घेणारे, शूर आहे मात्र आळशी स्वभाव आहे.
 
उंदीर (मूषक) : मघा, पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींची उंदीर योनी आहे. उंदीर म्हणजे विध्वंसक व नाश करण्याची वृत्ती. स्वत:च्या क्षुल्लक स्वार्थासाठी दुसर्‍याचे मोठे नुकसान करणारे लोक या योनीच्या अमलाखाली येतात. बुद्धिमान व चतूर स्वभावाचे, आपल्या कामात सावध व तत्पर, सहसा कोणावर विश्‍वास ठेवत नाहीत.
 
एकाच घरात राहणारे लोक प्रेमाने वागतात किंवा एकाच घरात राहून भांडणे करतात, कारण प्रत्येक योनीचा स्वभाव त्याला कारणीभूत असतो. त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे आहेत याचा परिचय घ्या.
 
वैरभाव : 
अश्‍व - महिषी
गज - सिंह
मेष - वानर
सर्प - नकुल (मुंगूस)
श्‍वान - मृग
मार्जार - उंदीर
गौ - व्याघ्र
 
विवाह जमवताना वधू व वरांच्या पत्रिकेत योनी मीलनासाठी ४ गुण ठेवलेले आहेत. समान योनी ४ गुण, मित्र योनी ३ गुण, सम योनी २ गुण, शत्रू योनी १ गुण, अति शत्रू योनी 0 गुण आहेत. शक्यतो आपला जोडीदार आपल्या स्वभावाशी जुळणारा असल्यास उत्तम असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सूर्य ग्रहण २०२०: जूनमध्ये होणारे सूर्यग्रहण समाजात भीतीचे वातावरण निर्माण करेल, अनेक दशकांनंतर आला आहे असा संयोग