Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गैरसमजूतीपेक्षा जागरूकता महत्वाची

गैरसमजूतीपेक्षा जागरूकता महत्वाची
दैनंदिन जीवनात आपण आरोग्याविषयी अनेक गैरसमजूती आपल्या मनात घर करून असतात. त्यांतील काही अतिशय शुल्लक असतात पण कालांतराने शरीरास घातक ठरतात. अशाच काही पाठीच्या दुखण्या संदर्भात असलेल्या गैरसमजुतींचा उलगडा की स्पाइन क्लिनिकच्या चीफ स्पाइन स्पेशलिस्ट डॉ. गरिमा अनंदानी यांनी केला आहे.  
  
पहिला गैरसमज: व्यायामामुळे पाठदुखी होते
 
सत्य: व्यायामाच्या अतिरेकामुळे पाठदुखी होऊ शकते, मात्र नियमित, संतुलित व्यायामामुळे पाठीला लाभ होतो. कणा निरोगी राहावा व त्याची लवचिकता आणि कणखरखता वाढावी म्हणून पोहणे, योगाभ्यास व चालणे यासारख्या व्यायामांची पाठीला आवश्यकता असते.
 
दुसरा गैरसमज: शस्त्रक्रियेमुळे पाठदुखी कायमची बरी होऊ शकते 
 
सत्य: जरी काही शस्त्रक्रियांमुळे पाठीला झालेली दुखापत, वेदना बर्‍या होऊ शकत असल्या व पाठीची कार्यक्षमता बर्‍याच अंशी वाढत असली, तरी शस्त्रक्रिया हा पाठीच्या प्रत्येक समस्येवरील उपाय नाही. खरंतर, १ टक्क्याहूनही कमी रूग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. काही रूग्णांनी तर शस्त्रक्रियेनंतर पाठीची समस्या अधिकच गंभीर झाल्याचं सांगितलं आहे. रूग्णावर कोणत्या प्रकारचे औषधोपचार करावेत याचं अचूक निदान करणं क्लिष्ट असतं.
 
तिसरा गैरसमज: झोपून विश्रांती घेणं हा पाठदुखीवरचा सर्वोत्तम उपचार आहे
 
सत्य: वास्तवात, बर्‍याचशा प्रकरणांमध्ये झोपून विश्रांती घेतल्यामुळे पाठदुखी वाढू शकते. तीव्र पाठदुखीसाठी झोपून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. युरोपियन मार्गदर्शक तत्त्वांनुसार २ दिवस झोपून विश्रांती घेतल्यास तिसर्‍या दिवशी चालणं आवश्यक असतं (वैद्यकिय सल्ल्यानंतर). निष्क्रियतेमुळे पाठीची सहनशक्ती कमी होऊन ती कडक व कमजोर बनते. याशिवाय, पूर्ण दिवस झोपून राहिल्यामुळे नैराश्य येऊ शकतं. यामुळे पाठीचं दुखणं दीर्घकाळ टिकून राहातं.
 
चौथा गैरसमज: वय वाढलं की पाठीचं दुखणं सुरू होतंच
 
सत्य: असं असेलच असं नाही. प्रत्यक्षात, तरूणांना पाठदुखीचा त्रास होणं ही सर्वसामान्य बाब झाली आहे. शरीराची योग्य ठेवण व योग्य जीवनशैली ही कुठल्याही वयामध्ये पाठ निरोगी राखण्याची सूत्रं आहेत.
 
पाचवा गैरसमज: जर मी औषधं घेतली, तर मला त्यांचं व्यसन लागेल
 
सत्य: पाठदुखीवर दिल्या गेलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या बहुतांश औषधांचं व्यसन लागू शकत नाही. मात्र, तो एकमेव पर्याय नाही. त्यांच्यामुळे वेदना आटोक्यात येऊ शकतात पण आजार समूळ नष्ट होत नाही. आजाराचं योग्य निदान, सुयोग्य औषधोपचार पद्धती आणि रूग्णावर योग्य ती देखरेख या उपचारासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi