Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपेच्या नियंत्रण केंद्राचा शोध

झोपेच्या नियंत्रण केंद्राचा शोध
, शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (11:41 IST)
अतिउत्साह, अतिदु:ख किंवा अतिआनंदाने झोपेची पर्याप्त उपलब्धी न होणे आता सर्वव्यापी समस्या बनली आहे. मानसिक, शारीरिक कारणांखेरीज मेंदूच्या तळाशी असलेली विशिष्ट प्रकारची जोडणी झोप येण्यास वा न येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे नव्याने उघडकीस आले आहे. यामुळे मानसशास्त्र तसेच शरीर अभ्यासाच्या शाखेला मोठा फायदा होणार आहे. झोपेशी संबंधित मेंदूतील जोडणीचा हा विशिष्ट बिंदू सस्तन प्राण्यांच्या मेंदूत असतो व त्यामुळे त्यांना गाढ झोप लागते. मेंदूतील झोप उत्तेजक अशा क्रियांपैकी निम्म्या क्रिया ‘पॅराफेशियल झोन’ या भागात घडत असतात. मेंदूचे मूळ म्हणून ओळखला जाणारा भाग श्वासोच्छवास, रक्तदाब, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान या इतर महत्त्वाच्या घटकांचेही नियंत्रण करीत असते, असे हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन व बफेलो स्कूल ऑफ मेडिसिन अँण्ड बायोमेडिकल सायन्सेस या संस्थांच्या संशोधकांनी स्पष्ट केले.
 
माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींशी झोपेच्या या केंद्राचा फार महत्त्वाचा संबंध आहे. मेंदूतील गॅमा-अमिनोब्यूटिरिक आम्ल हा न्यूरोट्रान्समीटर तयार करणारे न्यूरॉन पॅराफेशियल झोन या भागात असतात. या न्यूरॉन्सचे नियंत्रण करता येते, असे यूबी स्कूल ऑफ मेडिसिन अँण्ड बायोमेडिकल सायन्सेस या संस्थेच्या प्राध्यापक कॅरोलिन इ बास यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi