Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डबाबंद फळांचे रस, शीतपेय अशा शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होतो का?

डबाबंद फळांचे रस, शीतपेय अशा शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होतो का?
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (08:53 IST)
- जेम्स गॅलगर
डबाबंद फळांचे रस, शीतपेय अशा शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असं फ्रेंच शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
याविषयी एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष 'ब्रिटिश मेडिकल जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या संशोधनात एक लाखांहून जास्त लोकांचा तब्बल पाच वर्षं अभ्यास करण्यात आला.
 
Université Sorbonne Paris Cité या विद्यापीठातल्या काही जणांनी मिळून हे संशोधन केलं आहे. त्यांच्या मते रक्तातल्या शर्करेची पातळी यासाठी कारणीभूत असू शकते.
 
असं असलं तरी या संशोधनातून ठोस पुरावे हाती आलेले नाही आणि यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 
शर्करायुक्त पेय कशाला म्हणावे?
संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पेयामध्ये 5 टक्क्यांहून जास्त साखर असल्यास त्या पेयाला शर्करायुक्त पेय म्हणतात.
 
बाजारात मिळणारा डबाबंद फळांचा रस (त्यात नंतर साखर टाकलेली नसली तरी ), शीतपेय, गोड मिल्क शेक, एनर्जी ड्रिंक आणि साखर घातलेला चहा किंवा कॉफी, या सगळ्यांचा शर्करायुक्त पेयांमध्ये समावेश होतो.
 
संशोधकांनी डायट ड्रिंकवरही संशोधन केलं. साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर टाकून तयार करण्यात आलेल्या 'झिरो-कॅलरी' पेयांना डायट ड्रिंक म्हणतात. मात्र, संशोधकांना डायट ड्रिंकचा कॅन्सरशी काडीचाही संबंध आढळला नाही.
 
कॅन्सरचा धोका किती मोठा आहे?
या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की दररोज 100 मिलीलीटर अधिकचं (एक्स्ट्रा) शर्करायुक्त पेय (शुगरी ड्रिंक) घेतल्यास कॅन्सर होण्याचा धोका 18 टक्क्यांनी वाढतो.
 
संशोधनात अभ्यास करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी दर 1000 व्यक्तींमध्ये 22 जणांना कॅन्सर होता.
 
संशोधकांच्या मते यातल्या प्रत्येकाने दररोज 100 मिलीलीटर अधिक शुगरी ड्रिंक घेतल्यास यातल्या आणखी चार जणांना कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. म्हणजेच 1000 जणांपैकी दर पाच वर्षांत 26 जणांना कॅन्सरचा धोका आहे.
 
लंडनमधल्या statistician University महाविद्यालयातले डॉ. ग्राहम व्हिलर म्हणतात, "या संशोधनात असं गृहीत धरण्यात आलं आहे की शर्करायुक्त पेय पिणं आणि कॅन्सर होणं, यात खरंच संबंध आहे. मात्र, यावर अजून अधिक संशोधन होण्याची गरज आहे."
 
या अभ्यासात 2,193 जणांना कॅन्सर असल्याचं आढळलं. यापैकी 693 स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर, 291 पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर तर 166 जणांना कोलोरेक्टर कॅन्सर होता.
 
ठोस पुरावा मानायचं का?
नाही. ज्या पद्धतीने हा अभ्यास आखण्यात आला होता त्यावरून संशोधनाच्या माहितीत विशिष्ट पॅटर्न आढळले. मात्र, त्याचा अर्थ लावता आला नाही.
 
यात असं आढळून आलं की जे लोक जास्त शर्करायुक्त पेय पितात (जवळपास 185मिली प्रती दिन) त्यांच्यामध्ये कमी पेय पिणाऱ्यांपेक्षा (जवळपास 30 मिली प्रति दिन) कॅन्सर असणाऱ्यांची संख्या अधिक होती.
 
यातून एक अर्थ असा काढता येतो की शर्करायुक्त पेय अधिक घेणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
 
मात्र, त्यासोबतच अधिक शर्करायुक्त पेय पिणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्याला हानीकारक अशा इतर सवयी असू शकतात. (उदा. जास्त मीठ खाणं) कदाचित अशा कुठल्यातरी सवयीमुळे त्यांना कॅन्सर झालेला असू शकतो आणि त्याचा शर्करायुक्त पेयाशी काहीही संबंध नसेलही.
 
त्यामुळे या संशोधनातून शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होतोच, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही.
 
टेससाईड विद्यापीठातल्या डॉ. अॅमिलिया लेक म्हणतात, "या अभ्यासातून साखर आणि कॅन्सर यांचा थेट संबंध सिद्ध होत नसला तरी आपण रोजच्या आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करायला हवं हेच या संशोधनातून अधोरेखित होतं."
 
त्या पुढे म्हणतात, "आपल्या आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे."
 
याचा संबंध केवळ लठ्ठपणाशी आहे का?
लठ्ठपणा हा अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठीचं महत्त्वाचं कारण आहे आणि जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.
 
मात्र, या अभ्यासात केवळ एवढंच कारण दिलेलं नाही.
 
या संशोधकांपैकी एक असलेले डॉ. मॅथिल्ड टोवायर यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "शर्करायुक्त पेयांचं अतिप्रमाणात केलेल्या सेवनामुळे वाढलेलं वजन आणि लठ्ठपणाच्या (साखर आणि कॅन्सर यांच्या) संबंधात नक्कीच भूमिका बजावतात. मात्र, यातून संपूर्ण स्पष्टीकरण मिळत नाही."
 
लठ्ठपणाशी संबंधित कॅन्सर
मेंदू आणि पाठीच्या कण्याचं अस्तर (lining of brain and spinal cord)
रक्तातील मल्टिपल मायलोमा (multiplr myeloma (blood))
यकृत (liver)
पोट आणि पित्ताशय (stomach and gallblader)
गर्भाशयाचं अस्तर (lining of uterus)
अंडाशय (ovary)
थायरॉईड (thyroid)
अन्ननलिका (oesophagus)
स्तन (breast)
मूत्रपिंड (kidney)
स्वादुपिंड (pancreas)
मोठे आतडे आणि गुदाशय (colon and rectum)
नेमकं काय घडत असावं?
फ्रेंच संशोधकांच्या मते कॅन्सरशी संबंध "असण्यामध्ये साखरेचा महत्त्वाचा वाटा आहे," आणि यासाठी ते रक्तातल्या शर्करेच्या पातळीला कारणीभूत ठरवतात.
 
यापुढे ते असंही सुचवतात की पेयांना आकर्षक रंग देण्यासाठी वापरण्यात येणारी रसायनंदेखील यासाठी कारणीभूत असू शकतात.
 
मात्र, या प्रश्नाच्या उत्तरासाठी संशोधन करण्यात आलं नाही.
 
संशोधकांचं काय म्हणणं आहे?
Université Sorbonne Paris Cité विद्यापीठातला संशोधन करणाऱ्या पथकातले संशोधक सांगतात अभ्यासाच्या निष्कर्षाची पुष्टी करण्यासाठी अधिक मोठ्या पातळीवर संशोधन करण्याची गरज आहे.
 
डॉ टोवायर म्हणतात, "शर्करायुक्त पेय हृदयाचे आजार, लठ्ठपणा, मधुमेह यांच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहेत."
 
"मात्र, ही पेयं कॅन्सरशीसुद्धा संबंधित असू शकतात, असं सांगण्यात आलंय."
 
या संशोधनामुळे शर्करायुक्त पेयांवर अधिक कर लावणं चांगली कल्पना असल्याचं हे संशोधन पुन्हा एकदा सिद्ध करतो.
 
या संशोधनाचा अहवाल सांगतो, "आहारात शर्करायुक्त पेयांचं प्रमाण कमी करण्याच्या आहारतज्ज्ञांकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्याला या संशोधनामुळे बळ मिळतं. यात 100% फळांचा रस असल्याचा दावा करणाऱ्या पेयांचाही समावेश होतो. शिवाय शर्करायुक्त पेयांवर अधिक कर लावणे आणि त्यांच्या मार्केटिंगवर निर्बंध घालण्यासारखी धोरणं आखली गेली पाहिजे, यालादेखील या संशोधनातून बळ मिळतं."
 
पेय बनविणाऱ्या कंपन्यांचं काय आहे म्हणणं?
ब्रिटिश सॉफ्ट ड्रिंक्स असोसिएशनने म्हटलं आहे की या अभ्यासातून "साखर आणि कॅन्सर यांचा थेट संबंध असल्याचं सिद्ध होत नाही आणि संशोधकही ते मान्य करतात."
 
या संघटनेचे महासंचालक गॅव्हिन पार्टिंग्टन म्हणतात, "संतुलित आहार म्हणून शीतपेयांचं सेवन पूर्णपणे सुरक्षित आहे."
 
ते पुढे सांगतात, "लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करण्याच्या प्रक्रियेत आपलीही भूमिका असल्याचं शीत पेय इंडस्ट्री मान्य करते आणि त्याचाच एक भाग म्हणून शीतपेयांमध्ये कॅलरी आणि साखर यांचं प्रमाण आम्ही कमी केलं आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेस्ट कॅन्सर : स्तनांची घरच्या घरी कशी तपासणी कशी करायची?