Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का?

लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का?
, रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (10:44 IST)
लसीकरण हा आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. जगभरात विविध प्रकारचे आजार आणि साथी सतत येत असतात. या जगात नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पुढील आयुष्यभर आजारांचा, साथींचा सामना करण्यासाठी काही लशी सुचवलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना, तसेच विविध देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी याबाबत आपापल्या देशात नियम केले आहेत.
 
आपण येथे जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार या लशींबद्दल माहिती घेणार आहोत. 
 
मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वयाच्या 16 व्या वर्षांपर्यंत लसीकरणाचे वेळापत्रक असते.
 
त्या कोणत्या लशी असतात, त्यांची नावं काय, त्या कधी देतात, त्या कितीवेळा द्याव्या लागतात, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते, संसर्ग-प्रतिकारशक्ती, लस म्हणजे काय याची सविस्तर माहिती येथे घेऊ. 

संसर्ग म्हणजे काय?
आपल्या रक्तात दोन प्रकारच्या सेल/ पेशी असतात. लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी. यातल्या पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराची संरक्षक सेना.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सर्व गनिमी कावे आत्मसात केलेली अत्यंत हुशार संघटना! या सेनेतले काही मावळे शरीराच्या सर्व भागांमध्ये दबा धरून बसलेले असतात त्यांना "अॅंटिजेन प्रेझेंटिंग सेल्स" (अॅंटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारं द्रव्य असणाऱ्या पेशी) म्हणतात.
 
संपूर्ण शरीराला स्किन/ त्वचेची तटबंदी असते. जंतू (बॅक्टेरिया/ व्हायरस/ आणखी कोणताही) चुकून जर या भिंतीला भेदून आत गेलाच तर या मावळ्यांच्या नजरेतून तो सुटू शकत नाही. यांचा पहिला हेतू त्याला पकडणं हाच आहे. पेशी जंतुला पकडून मारून टाकतात आणि थेट सेनापतीकडे घेऊन जातात.
 
प्रत्येक भागातून येणाऱ्या या शिपायांसाठी निरनिराळी ठाणी/ छावण्या लावलेल्या असतात या म्हणजे आपल्या "lymph nodes" यांना लसिका गाठी असं म्हटलं जातं.(ताप, घसादुखी असताना गळ्याकडे गाठी येतात त्याच!) इथे जंतू घेऊन आलेल्या शिपायांना "टी सेल" नावाचे सेनापती भेटतात.

आणलेल्या कैद्याची या तपासणी करतात.तो धोकादायक आहे का? त्याच्याकडे कोणत्या प्रकारची शक्ती आहे?काय शस्त्र आहेत? अशी त्याची कसून झडती घेतली जाते. आणि या सगळ्याची इथंभूत माहिती सेनेला दिली जाते. "टी सेल" च्या सेनेमध्ये "बी सेल" नावाचा विशिष्ट शिपाई असतो त्याच्याकडे निरनिराळी शस्त्र तीही प्रत्येक शत्रूला अनुरूप अगदी "कस्टमाइज्ड" बनवून द्यायचं कसब असतं.
 
त्याच्या या शक्तीचा उपयोग करून ही शस्त्र म्हणजेच " IgM, IgG, IgA, IgE आणि IgD" या पाच प्रकारच्या "अॅंटिबॉडिज" (ज्या टेस्ट करून लॅब मध्ये मोजल्या जातात त्याच!).या पाच प्रकारच्या शस्त्रांची अगदी विशिष्ट कामं आहेत.
 
समोरच्या शत्रूच्या हातात जर तलवार असेल तर आपल्या हातात, ढाल असावी लागते, तिथं वाघनखं कामाची नाहीत !! बी सेल ही शस्त्र मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवते. तिचं अजून एक महत्वाचं काम म्हणजे आलेल्या शत्रूला चांगलं आठवणीत साठवून ठेवणं.
 
सगळ्या शिपायांना सतत जागरूक ठेवायला शत्रूचे फोटो काढून गावभर "वॉन्टेड" ची पोस्टर लावल्यासारखंच! पुढच्या वेळी जर तोच शत्रू पुन्हा आला तर त्याची धडगत नाही!
 
या 'टी सेल' आणि 'बी सेल' मिळून बाकीच्या अगदी पुढच्या आघाडीवर लढणाऱ्या सैन्याला म्हणजेच "phagocyte" (शरीरात प्रवेश करणार्‍या सूक्ष्मजंतूंचा नाश करणारी रक्तातील एक प्रकारची पांढरी पेशी) या जंतूला अगदी अक्षरशः खाऊन टाकणाऱ्या पेशींनाही नियुक्त करतात.
 
कोणत्याही प्रकारच्या जंतूंच्या अशा प्रकारच्या भेटीला इन्फेक्शन-संसर्ग म्हणतात.
 
प्रतिकारशक्ती म्हणजे काय?
वर सांगितलेली सर्व प्रक्रिया आपल्या शरीरात सतत चालू असते कारण सतत आपण कोणत्या ना कोणत्या जंतूला एक्सपोज (जंतूच्या संपर्कात येतो) होतच असतो.
 
ही शक्ती आपल्याला जन्मजात आपल्या आई वडिलांकडून देणगी मिळालेली असते. पण ती जन्मतः अगदी "naive" म्हणजे बाळबोध असते.जसजसे आपण मोठे होत जातो आणि जास्तीत जास्त जंतूंना एक्सपोज होत जातो तसतशा या पेशी तयार होत जातात.

ही लढवय्यी सेना मोठी आणि बलाढ्य होत राहते.आईच्या शरीरात तिच्या जन्मापासून तयार झालेली ही सेना, काही शस्त्र नुक्त्या जन्म झालेल्या बाळाला उधार देते. थोडी जन्म होण्याच्या प्रक्रियेत आणि थोडी दुधातून. आईच्या दुधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.
 
जेव्हा ही सेना तयार असते तेव्हा जर एखादा शत्रू तट भेदून आत आलाच तर अॅंटिबॉडिज त्याला पकडून ठेवतात आणि phagocytes खाऊन टाकतात. आणि जरी इन्फेक्शन झालं असलं तरी त्याची लक्षणं दिसत नाहीत, किंवा आपल्याला त्रास होत नाही.
 
लस म्हणजे काय?
अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगायचं तर लस म्हणजे मेलेला जंतू! मेलेला/ शस्त्र काढून घेतलेला/ शक्ती संपवलेला जन्तू शरीरात टोचला जातो आणि खरंच शत्रू आलाय ही समजूत होऊन आपली संरक्षक सेना सुसज्ज, सशस्त्र तयार राहते. म्हणजे जेव्हा खरा शत्रू येईल तेव्हा त्याने शरीराला इजा करायच्या आधीच त्याला संपवून टाकलं जातं.
 
एडवर्ड जेन्नर नावाच्या हुशार शास्त्रज्ञाची आपल्याला देणगी आहे.
लस बऱ्याच प्रकारची असतात, किल्ड (मारलेले जंतू), इनअॅक्टिवेटेड( निष्क्रिय केलेले जंतू), live attenuated( शक्ती काढून घेतलेले जिवंत जंतू) subunit( नुसतेच जंतूचे अवशेष)
 
1. बीसीजी लस- बाळ जन्मतःच किंवा 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत 
बीसीजी ही लस ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय होऊ नये म्हणून दिली जाते. मानवी मृत्यूमध्ये क्षय़ाचा फार मोठा वाटा आहे.
 
भारतासारख्या तसेच अफ्रिका, दक्षिण अमेरिका, आशियातील अनेक विकसनशील देशांमध्ये क्षयामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो.
 
बीसीजीचे पूर्ण नाव bacille Calmette-Guérin असे आहे. ही लस अल्बर्ट काल्मेट आणि कॅमिल ग्युरिन यांनी शोधून काढली.  
 
80 वर्षांपासून जगभरात भारतासह सर्वच देशांमध्ये ही लस मोठ्याप्रमाणावर वापरली जाते.
 
बाळ जन्मल्यावर किंवा ते वर्षाचे होईपर्यंत ही लस द्यावी असं जागतिक आरोग्य संघटना सांगते.
 
जन्मतःच तिचा 0.05 मिली इतका डोस देतात, 1 महिन्यानंतरच्या बाळासाठी तिचा डोस 0.10 मिली इतका डोस असतो.  
 
 2. हेपेटायटिस बी- बाळ जन्मतःच 
हेपेटायटिस बी लस ही हेपेटायटिस बी या विषाणूमुळे यकृताला होणारा संसर्ग रोखण्यासाठी दिली जाते.
 
या विषाणूमुळे यकृताला तीव्र संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे यकृताचा सिर्होसिस, कर्करोग होऊ शकतो तसेच मृत्यूही ओढावू शकतो.  
 
बाळाचा जन्म झाल्यावर ही लस जितक्या शक्य तितक्या लवकर, 24 तासांच्या आत 0.5 मिली इतकी द्यावी असं जागतिक आरोग्य संघटना सांगते.
 
या लशीचे नंतर दोन ते तीन डोस दिले जातात. या लशीमुळे 20 वर्षे संरक्षण मिळते आणि बहुतेक आयुष्यभर तिचा उपयोग होतो. 
 
 3. पोलिओची तोंडावाटे लस- जन्मतःच, त्यानंतर 6,10,14 आठवड्यांनी 
पोलिओमायलेटिस हा पी1, पी2, पी3 या तीन प्रकारच्या पोलिओव्हायरसमुळे होतो.
 
त्याला रोखण्यासाठी ही लस तोंडावाटे दिली जाते.
 
जन्मतः दिल्यानंतर 6, 10, 14 आठवड्यांनी ती लस पुन्हा देतात तसेच तिचा बुस्टर डोस 16 ते 24 महिन्यांत दिली जाते.
 
या लशीचे दोन थेंब बाळाला दिले जातात. 
 
4. पेंटावॅलेंट लस- 6, 10 आणि 14 व्या आठवड्यात 
 
पेंटावॅलेंट ही लस 5 आजारांपासून बाळाचं रक्षण करते.
 
यामध्ये डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, पेर्टुसिस म्हणजे डांग्या खोकला, टेटनस म्हणजे धनुर्वात, हेपेटायटिस बी, तसेच हिमोफिलस इन्फ्लुएन्झा-बी म्हणजे मेंदूज्वराचा समावेश असतो.  
 
ही लस 6, 10, 14 व्या आठवड्यात देतात.
 
ही लस 0.5 मिली इतकी देतात. 
 
5. रोटाव्हायरस लस- 6,10, 14 व्या आठवड्यात
रोटाव्हायरस हा बहुतांश विकसनशील देशांमध्ये लहान मुलांना होणारा आजार आहे, त्यामुळे गंभीर डायरिया होऊ शकतो.
 
बाळ एक वर्षाचे होईपर्यंत या विषाणूमुळे ते आजारी पडण्याची शक्यता असते.
 
त्यामुळे त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी ही लस 6,10,14 व्या आठवड्यात देतात.
 
बाळाला याचे 5 थेंब लस दिली जाते. 
 
6. एफआयपीव्ही- 6 व्या आणि 14 व्या आठवड्यात 
एफआयपीव्ही याचा अर्थ फ्रॅक्शनल डोस ऑफ इनअॅक्टिव्हेटेड पोलिओव्हायरस व्हॅक्सिन असा होतो.
 
6 व्या आणि 14 व्या आठवड्यात पोलिओ रोखण्यासाठी ही लस 0.1 मिली इतकी दिली जाते.  
 
7. मिझल्स रुबेला लस- 9 ते 12 महिने, 16 ते 24 महिने 
मिझल्स म्हणजे गोवर. यामुळे बाळाला ताप, पुरळ, खोकला, डोळे येणे अशी लक्षणं दिसतात.
 
2 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही यातून गुंतागुंतीचे आजार तयार होऊ शकतात.
 
गोवर हा साथीचा आजार आहे, जो पॅरामिक्सोव्हायरस मुळे पसरतो.
 
 गोवर झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर हवेतून हे विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात आणि साधारणपणे दुसर्‍या आठवड्यात गोवरची लक्षणं दिसू लागतात. 
गोवरग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कानेही गोवरची लागण होऊ शकते.
 
ही लस दोन टप्प्यांमध्ये दिली जाते - पहिला डोस बाळ साधारण 9 ते 12 महिन्यांचं असताना तर दुसरा डोस 16-24 महिन्यांचं असताना.
 
0.5 मिली इतकं या लशीचं प्रमाण आहे.  
 
8. डीपीटी लस - 16 ते 24 महिने आणि 5-6 वर्षे
डीपीटी लशीला डीटीपी असंही म्हणतात.
 
यात डिप्थेरिया, पर्टुसिस, टेटनस या आजारांपासून संरक्षण मिळलतं. पेंटाव्हॅलेंटमध्येही याचा डोस दिलेला असतो.
 
त्याचे दोन बुस्टर डोस 16 ते 14 महिने आणि 5 ते 6 वर्षे वयाच्या काळात देतात.
 
0.5 मिली इतका याचा डोस असतो. 
 
9. टीडी लस- पहिला डोस 10 वर्षे आणि दुसरा डोस 16 वर्षे 
टीडी म्हणजे टेटनस- धनुर्वात आणि डिप्थेरिया- घटसर्प यांच्यासाठी दिली जाते.
 
पहिला डोस 10 वर्षे वयाचे बालक आणि दुसरा डोस 16 वर्षे असलेल्या मुलाला देतात.
 
हा डोस गरोदर महिलांना गर्भ राहिल्यावर सुरुवातीच्या काळात देतात तसेच त्यानंतर पुढचा डोस 4 आठवड्यांनी देतात. जर त्याआधी 3 वर्षांच्या काळात दिलेला असेल तर 1 डोस देतात.
 
0.5 मिली इतका याचा डोस आहे. 
 
10. पीसीव्ही लस - पहिला डोस- 6 आठवडे, दुसरा डोस- 14 आठवडे
पीसीव्ही म्हणजे न्युमोकोकल व्हॅक्सिनेशन. ही लस न्यूमोकोकल न्युमोनिया या आजारावर दिली जाते.
 
न्यूमोकोकस जीवाणूमुळे हा आजार होतो.
 
हा आजार श्वसनासंदर्भात आहे.
या लशीचे डोस 6 आणि 14 व्या आठवड्यात देतात. त्याचप्रमाणे त्याचा बूस्टर डोस 9 महिने पूर्ण केल्यावर देतात.
 
0.5 मिली इतका याचा डोस आहे. 
 
11. जेई लस- पहिला डोस-9ते 12 महिने, दुसरा डोस 16-24 महिने 
जेई याचा अर्थ जॅपनिज एन्सिफालिटीस. हा ज्या विषाणूमुळे होतो तो डेंग्यू, पिवळा ताप, वेस्ट नाईल विषाणू आणि जे डासांद्वारे पसरवले जातात त्यांच्याशी संबंधित आहे.
 
आशियातील देशांमध्ये हा आजार दिसून येतो. दरवर्षी आशियात 68 हजार मुलांना होताना तो दिसतो.
त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ही लस घ्यावी असं सुचवलं आहे.
 
याचे दोन डोस असतात. पहिला डोस बाळाच्या वयाच्या 9 ते 12 महिने या कालावधीत आणि 16 ते 24 महिने या कालावधीत दिला जातो. 
 
0.5 मिली इतका याचा डोस आहे. 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Benefits of Eating Bathua बथुआच्या भाजीचे 10 फायदे जाणून घ्या