Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्तदान दिनाचा इतिहास 14 जून जागतिक रक्तदातादिनानिमित्त विशेष लेख..

blood
, बुधवार, 14 जून 2023 (15:42 IST)
R S
हँलो, मी “रक्तदाता” बोलतोय, मला समजले की, आपल्या रुग्णास रक्ताची गरज आहे…मी रक्तदान करण्यास तयार आहे….!  असा “रक्तदाता” नेहमीच रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे.
 
आजच्या युवापिढीत समज गैरसमज दूर करणे काळाची गरज आहे. आजच्या काळात सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास सहज शक्य होऊ शकते.?
 
“स्वैच्छिक रक्तदाता” म्हणून आपण जेवढे समाजातील लोकांना जागृत कराल तेवढी माहिती जनमानसात रुजेल. आजकाल सोशल मिडिया, डिजिटल मिडिया प्रिंट मिडिया आदी माध्यमातून समाजात जनजागृती करतांना पाहायला मिळते. आजकाल रक्ताची गरज कुणालाही असो, व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यत मेसेज पोहचिला जातो. यात सामाजिक बांधिलकी जोपासणारे रक्तदात्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज पावतो आपल्या देशात अनेक प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या पण मानवी रक्तासाठी कोणत्याही पर्याय आजपावतो मिळाला नाही. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तथा कारखान्यात तयार होत नसते, हे आजही सर्व सामान्य माणसाला माहीत आहे. पण ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात….! याबाबतीत समाजात  रक्तदानाविषयी सामाजिक बांधिलकी आपल्या जनमानसात रुजणे आवश्यक आहे.
 
एकेकाळी रक्त मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भरपूर ठिकाणी संपर्क साधवा लागत होता. पण शासनाच्या मार्गदर्शक ध्येय धोरण तसेच शासकीय पातळीवर जनमानसात पोहोचल्यामुळे अनेक युवक रक्तदान करण्यासाठी पुढे येतात, याचे कारण ही तसेच आहे ..?आपल्या रुग्णांना रक्त मिळणार तरी कोठून?आपणच रक्तदान नाही केले तर रुग्णांना जीवदान मिळणार कसे? ही भावना आतापर्यंत सर्व जनमानसापर्यंत पोहचणे आपली सामाजिक बांधिलकी आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रभातफेरी, स्वैच्छिक रक्तदान शिबिरे, पोस्टर्स स्पर्धा,इ.रक्तदात्यांमध्ये जनजागृतीपर प्रयत्न केला जातो.
 
ज्यांच्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होऊन जीव वाचलेला असतो याची जाणीव असलेल्या रुग्णांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आदी यांना स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व पटलेले असते. त्यांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले पाहिजे. रक्तदानाचे फायदे कँन्सर, हार्टअटॅक इत्यादीचा धोका कमी असतो. तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.    रस्त्यावर झालेला अपघातात अतिरक्तस्राव झालेला व्यक्ती, प्रसूती वेळी अथवा  प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झालेल्या महिलेला वेळीच रक्त मिळाले तर नक्कीच त्यांचे प्राण वाचविल्याचे “रक्तदाता” म्हणून समाधान मिळते. या व्यतिरिक्त ॲनेमिया, शस्त्रक्रिया, कर्करोग आदी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी स्वैच्छिक रक्तदाता म्हणून रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.  याच बरोबर थँलेसेमिया, सिकलसेल यासारख्या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या काही बालकांमध्ये जन्मजात रक्त तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प कमी असते. त्यामुळे त्यांचे योग्य निदान करून वैद्यकीय सल्लानुसार रक्तपुरवठा केला जातो. अशा रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहे. त्यांना महिन्यातून किमान दोन वेळेस तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्तपुरवठा केला जातो. अशा रुग्णांना वेळो वेळी रक्त द्यावे लागते, यासाठी आपली सर्वाची सामाजिक बांधिलकी नात्याने नैतिक जबाबदारी आहे. यासाठी आपण रक्तदान शिबिर अथवा रक्तकेंद्रात जावून शासन मान्यता प्राप्त रक्तपेढी/रक्तकेंद्रात आपले “रक्तदाता” म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. यासाठी आपण कोणत्याही शासन मान्यताप्राप्त रक्तपेढी/रक्तकेंद्र येथून रक्त घेणे कधीही फायदेशीर आहे.
 
रक्तदाता म्हणून आपले वय  18-60 वर्षेपर्यंत व वजन 48 किलो पेक्षा जास्त तसेच शरीरातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाण(12.5% वर) असलेल्या  निरोगी व्यक्ती  रक्तदान करु शकता. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रक्तकेंद्रात अथवा रक्तदान शिबिरात विविध तपासणी करून रक्तसंकलन केले जाते.  रक्ताच्या दिशानिर्देश नुसार सर्व चाचणी(एड्स, कावीळ अ,ब आणि गुप्तरोग, मलेरिया, रक्तगट, क्रासमँच इ.) केल्यानंतरच रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा केला जातो.  आपण केलेले स्वैच्छिक रक्तदान यासाठी शासन नियमानुसार दोन वर्षातून एकदा मोफत रक्त मिळते. याचा लाभ आपण घेऊ शकता. रक्त हे जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही (रक्तदान केल्यापासून फक्त 35 दिवस) यासाठी रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते.
 
14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एवढेच आपल्याला आवाहन करण्यात येते की, स्वैच्छिक रक्तदान ही काळाची गरज ओळखून आपल्या जवळच्या शासन मान्यता प्राप्त रक्तपेढीत आपण जबाबदार भारतीय नागरिक “रक्तदाता” म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासून निश्वासर्थपणे स्वैच्छिक रक्तदान करावे.   रक्तदानानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचना नूसार रक्त व रक्ताचे विघटन करून प्लाझ्मा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स ,क्रायोप्रेसिपिटेड आदी विघटन तयार करुन वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना पुरवठा केला जातो.  यासाठी आपले स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते.
 
शासनाचे घोषवाक्य
 
“Give Blood, give plasma, share life, share often”.
 
” रक्त द्या, प्लाझमा द्या, वारंवार द्या, एखाद्याच्या जीवनाचा हिस्सा बना !
 
रक्तदान दिनाचा इतिहास
 
पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरुपात 2004 मध्ये साजरा करण्यात आला. पुढे 2005 मध्ये, 58 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 14 जून हा दिवस ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचं ‘जनक’ मानलं जातं. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगट प्रणालीची ओळख जगाला करून दिली. त्यांना रक्तगटांच्या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. लँडस्टेनर हे मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या या कार्यामुळे समान रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची प्रथा सुरू झाली. रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी समजून घेऊया.
हे करू शकतात रक्तदान
 
रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात. नॅशनल ब्लड ट्रान्सफुजन काऊन्सिलच्या मार्गदर्शक तत्वानुसार, भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं. भारतात पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
पण, काही देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय कायद्यानुसार 16 ते 17 वयोगटातील मुलांना रक्तदान करण्यास परवानगी आहे. पण, त्यासाठी त्यांना आवश्यक शारीरिक आणि रक्तविज्ञानविषयक निकषांची पूर्तता करणं गरजेचं असतं.
तर काही देशांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नियमित रक्तदाते डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तदान करू शकतात. काही देशांमध्ये रक्तदानाची वयोमर्यादा 60 वर्षांपर्यंत आहे. रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन 45 किलोपेक्षा कमी नसावं. आणि रक्तदात्याच्या शरिरातील हेमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा कमी नसावं.
हे करू शकत नाही रक्तदान
 
गेल्या वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही.
एखाद्याची एचआयव्हीची चाचणी सकारात्मक आली असेल, तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
रक्तदात्यानं रक्तदान करण्याच्या 15 दिवस आधी कॉलरा, टायफाईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसंच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही. रक्तदात्यानं शरिरावर टॅटू काढला असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही
हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
जर तुम्ही दातांवरील उपचारासाठी डेंटिस्टकडे गेला असाल, तर रक्तदान करण्यासाठी तुम्हाला 24 तास थांबावं लागतं. दाताशी संबंधित मोठे उपचार सुरू असेल तर तुम्ही महिनाभर रक्तदान करू शकत नाही. गर्भवती महिलांसंदर्भातही रक्तदान करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बाळाच्या जन्मानंतर कमीतकमी 9 महिने आणि बाळाने दूध सोडल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत महिलेला पुरेसा आहार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे या कालावधीत रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनुसार (NACO), महिलेनं डिलिव्हरीनंतर 12 महिने रक्तदान करण्यास टाळावं.
रक्तदान करण्यापूर्वीचा आहार
 
रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा. रक्तदानापूर्वी कमीतकमी 4 तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं. तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी, असं NACO च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे. रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता. रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
रक्तदान केल्यानंतरचे समज गैरसमज
 
रक्तदान केल्याने शरीरातील रक्त संपतं, हा गैरसमज आहे. प्रौढ शरीरात सरासरी 5 लिटर रक्त असतं. रक्तदान करताना 450 मिली रक्त आपल्या शरीरातून बाहेर काढलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरिरात तेवढं रक्त 24 ते 48 तासांत पुन्हा तयार होतं. रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं, असंही अनेकांना वाटतं. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीनं होते. रक्तदानामुळे झालेली रक्ताची हानी शरीर काही दिवसांत भरुन काढतं. रक्तदान केल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे का? तर रक्तदानासाठी रक्त घेताना डिस्पोजेबल निडल्स वापरल्या जातात. तसेच घेतलेल्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करुन रक्त सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. त्यामुळे रक्तदान केल्यानं आजारांचा संसर्ग होत नाही. रक्तदान करताना एकदा वापरलेलं इंजेक्शन पुन्हा वापरलं जाणार नाही, ही गोष्ट कटाक्षानं पाळावी लागते.
रक्तदानाचे फायदे
 
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दाव्यानुसार, रक्तदानाचा उद्देश केवळ गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं हा नाही. तर याचे इतरही अनेक फायदे आहेत. रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.
याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.
कोरोना रुग्णांचे रक्तदान
 
नॅको ने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोरोनाचे रुग्ण त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर रक्तदान करू शकतात. तर कोरोनाची लस घेतलेली व्यक्ती लस घेतल्याच्या तारखेपासून 28 दिवसांनंतर रक्तदान करू शकते.
 
लक्षात ठेवा. रक्तदान हे कर्तव्य आहे, महान राष्ट्राचे ते भवितव्य आहे.
 
14 जून 1868 रोजी जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीनिमित्त “जागतिक रक्तदाता दिन” म्हणून जगभरात साजरा केला जातो. एबीओ रक्तगट प्रणालीचा शोध घेऊन आरोग्य विज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. सोशल माडिया, व्हाट्सएपग्रुप च्या माध्यमातून  “रक्तदाता व्हाट्सएप ग्रुप” तयार करून स्वैच्छिक रक्तदान चळवळ यशस्वीपणे  रुजविता येऊ शकते.
 
जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने 2005 मध्ये पहिल्यांदा “रक्तदाता दिन” आयोजित करण्यात आला होता.  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वैच्छिक रक्तदान चळवळ जनजागृतीसाठी युवाशक्तींनी  पुढे येणे काळाची गरज आहे. देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान कमी प्रमाणात आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वैच्छिक रक्तदान मोहिम राबवून आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवून देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात हातभार लावू शकता.  मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी.  14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने समाजात/ रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती  व्हावी एवढाच उद्देश !
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन झपट्याने कमी करायचं असेल तर ट्राय करा Iced tea