Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँटिबायोटिक्स घेणं फायद्याचं की हानीकारक? त्याचा आतड्यांवर काय परिणाम होतो?

paracetamol
, मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (15:30 IST)
सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजीव म्हणजेच जीवाणू, विषाणू इत्यादी मानवी शरीरात वाढत असतात.
 
त्यातून काही असे असतात जे माणसांना मदत करतात. उदाहरणार्थ- दूधापासून दही तयार करण्यात मदत करतात, त्याचप्रमाणे काही जीवाणू माणसांना फायदेशीर असतात.
 
आपल्या शरीरात असे कोट्यवधी जीवाणू असतात. त्यांच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. आपल्या आतड्यांमध्ये ते सर्वांत मोठ्या संख्येने असतात.
 
आतड्यात असणाऱ्या जीवाणू किंवा बॅक्टेरियांचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो.
 
ते पचनक्षमता आणि प्रतिकारकशक्ती योग्य ठेवण्यासाठी तसंच एकूणच पचनसंस्थेचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी मदत करतात.
आपल्याला हेही माहिती आहे की तब्येत बिघडल्यावर अनेकदा अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
गेल्या 80 वर्षांपासून अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकं साथीच्या रोगांशी प्रभावीपणे लढत आहेत.
 
त्यामुळे जगभरात लोकांचं आजारी पडण्याचं आणि आजारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे.
 
हे एक असं औषध आहे जे मनुष्यप्राणी आणि प्राण्यांचा जीवाणू आणि विषाणूंपासून बचाव करतं. म्हणूनच अँटिबायोटिक्सला अँटिमायक्रोबियल एजंट्स म्हटलं जातं.
 
तज्ज्ञांचं काय मत आहे?
तज्ज्ञांच्या मते शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या जीवाणूंसाठी अँटिबायोटिक्सचा धोका सर्वांत जास्त आहे.
 
अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी च्या एमबायो या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार ‘जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते आणि डॉक्टर त्याला अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला देतात तेव्हा अँटिबायोटिक्स प्रतिरोधामुळे त्या एका गोळीने शरीरात असलेल्या जीवाणूंवर मोठा परिणाम होतो आणि ते वर्षभरासाठी अस्ताव्यस्त होऊन जातात.’
 
वैज्ञानिक जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकेडमिक्स ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरानुसार 2000 ते 2015 मध्ये अँटिबायोटिक्स देण्याच्या प्रमाणात 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
अँटिबायोटिक्सवर वाढलेल्या अवलंबित्वामुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत.
 
अँटिबायोटिक्स दिल्या जाण्याच्या समस्येत दोन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे आपल्या आतड्यांचं नुकसान होत आहे. अँटिबायोटिक्सला बॅक्टेरियाचा प्रतिरोध वाढत आहे.
 
'मेडिकल न्यूज टुडे'च्या एका अहवालात सांगितलं आहे की अँटिबायोटिक्स प्रतिरोध क्षमता वाढल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये बाधा निर्माण होत आहे.
 
सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने अमेरिकेने या औषधांमुळे होणाऱ्या धोक्याची पातळी अत्यावश्यक, गंभीर आणि चिंताजनक या तीन वर्गवारीत ठेवली आहे.
 
त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अँटिबायोटिक्सचा वापर मर्यादित करण्यास सांगितलं आहे.
 
अँटिबायोटिक्स घेतल्यावर शरीरावर गंभीर परिणाम होतो असं अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे.
 
‘पोटात असह्य वेदना’
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहणाऱ्या जान्हवी शुक्ला यांच्यावर अँटिबायोटिक्सचा असाच परिणाम झाला. त्यांना बराच काळ अँटिबायोटिक्स दिले गेले होते.
 
त्या सांगतात, “यावर्षी फेब्रुवारी महिन्यात माझ्या दोन्ही पायांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे बराच काळ मला औषधं घ्यावी लागली. अँटिबायोटिक्सही सुरू होते. आठ-दहा दिवस सगळं ठीक होतं. त्यानंतर माझ्या पोटात त्रास सुरू झाला आणि इतक्या असह्य वेदना झाल्या की ऑपरेशनच्या वेदना पूर्णपणे विसरली होती.
“पोटदुखीमुळे मला फार त्रास झाला. सुरुवातीला समजतच नव्हतं की पोटात वेदना का होत आहे. पोटात असह्य वेदना व्हायच्या.”
 
जान्हवी शुक्ला यांनी सांगितलं की या वेदनांबाबत जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा अँटिबायोटिक्सचा डोस कमी केला गेला आणि त्यामुळे त्यांची समस्या कमी झाली.
 
त्या सांगतात, “डोस कमी झाल्यावर पोटात दुखणं कमी झालं मात्र त्या दरम्यान एक महिना हे चालूच होतं.”
 
अँटिबायोटिक्सचा आतड्यांवर परिणाम
निवृत्त गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. पी. घोष म्हणतात, “अँटिबायोटिक्सशिवाय अगदीच अडत असेल तेव्हाच घ्यायला हवे.”
 
ते सांगतात, “अँटिबायोटिक्सशिवाय उपचार होऊ शकत नाही याबद्दल कोणतंही दुमत नाही. मात्र अशी अनेकदा परिस्थिती येते जेव्हा त्याचा वापर करायला नको.”
 
आतड्यात जितके जीवाणू जास्त राहतील तितका शरीराला फायदा होतो असंही ते पुढे म्हणतात.
 
डॉ. घोष म्हणतात, “अँटिबायोटिक्सच्या एका कोर्सनेच अँटिबायोटिक्स प्रतिरोध होण्याचा धोका वाढतो आणि त्याचा परिणाम शरीरात असलेल्या जीवाणूंवर होतो. इतकंच नाही तर अँटिबायोटिक्सचा वापर आजार पसरवणाऱ्या जीवाणूंना हटवण्यासाठी केला जातो त्याशिवाय अन्य जीवाणू किंवा बॅक्टेरियावरसुद्धा हल्ला करतात.
 
ते म्हणतात, “खरंतर अँटिबायोटिक्स आतड्याच्या सगळ्या जीवाणूंवर परिणाम होतो.”
 
अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये असलेल्या वॉशिंग्टन विद्यापीठातले प्राध्यापक गौतम डांतास जंगलाचं उदाहरण देऊन सांगतात, “हे म्हणजे जंगलातून गवताचा तुकडा काढण्यासाठी कारपेट बॉम्बचा वापर करण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी नष्ट होतात. अँटिबायोटिक्स असंच काम करतात.”
 
आतड्यांचं मेंदूशी नातं
आतडं म्हणजे एक मोठी ट्यूब आहे जी तोंडापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत जाते. तिथे कोट्यवधी जीवाणू असतात. त्यांना मायक्रोबायोम असं म्हणतात.
 
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आतडे आणि मेंदू एकमेकांशी निगडीत आहेत. आपला मेंदू संपूर्ण शरीराला संदेश पाठवतो हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे मेंदूबरोबरसुद्धा संवाद होतो.
 
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या एका अभ्यासानुसार जर आतड्यांमध्ये काही अडचण निर्माण झाली तर त्याचा सिग्नल थेट डोक्यात जातो आणि जेव्हा मेंदूत काही बिघाड झाला तर तो आतड्यांना सिग्नल पाठवतो. कारण मेंदू आणि आतडे एकमेकांशी निगडीत आहेत.
 
आतड्यांमध्ये काही समस्या असली तर त्याची अनेक लक्षणं आहेत
एखाद्या गोष्टीपासून वारंवार लक्ष भरकटणं
स्मरणशक्तीवर परिणाम
तणाव
चिंता इत्यादी.
आतड्यांमुळे त्वचा प्रतिकारक शक्ती, अनियमित शुगर, चयापचय अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
 
इम्पिरिअल कॉलेज लंडनचे सर्जन जेम्स किनरॉस म्हणतात, “अँटिबायोटिक्सवर अवलंबून न राहणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. आपल्या शरीरातच आजार ठीक करण्याची क्षमता आहे. आपल्या शरीरातली अंतर्गत स्थिती आपण योग्य आहार घेऊन सुधारू शकतो. म्हणूनच अगदी तरुण वयापासूनच खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला हवं.”
 









Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Foods to Avoid with Milk दुधासोबत चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, आरोग्य धोक्यात येईल