Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगभरात 1 अब्जाहून अधिक लोक लठ्ठ, लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक माहिती

Webdunia
शुक्रवार, 1 मार्च 2024 (19:30 IST)
द लॅन्सेटच्या अहवालात प्रकाशित झालेल्या जागतिक अंदाजानुसार, जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत. 2022 च्या आकडेवारीनुसार यामध्ये सुमारे 88 कोटी प्रौढ आणि 15.9 कोटी मुलांचा समावेश आहे. पॉलिनेशिया भागातील टोंगा या छोट्या द्वीपसमूहावरील महिला आणि याच भागातील सामोआ देशातील पुरुष लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. इथले जवळपास 70-80% प्रौढ लोक लठ्ठ आहेत. सुमारे 190 देशांच्या या यादीत ब्रिटन पुरुषांसाठी 55 व्या आणि महिलांसाठी 87 व्या स्थानावर आहे. शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकान म्हटल्याप्रमाणे, लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी त्यात मोठ्या बदलांची नितांत गरज आहे. लठ्ठपणामुळे हृदयरोग, टाईप 2 मधुमेह आणि कर्करोगांसह अनेक गंभीर आजार विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. जागतिक लठ्ठपणाचा दर (वयातील फरक लक्षात घेतल्यानंतर लठ्ठ म्हणून वर्गीकृत केलेल्या लोकसंख्येची टक्केवारी) पाहताना संशोधकांना आढळले: अमेरिकन पुरुष या यादीत 10 व्या आणि महिला या यादीत वरुन 36 व्या स्थानावर आहेत. तर भारतीय महिला 190 देशांच्या यादीत 171 व्या आणि पुरुष 169 व्या स्थानावर आहेत.
चिनी महिला 179 व्या आणि पुरुष 138 व्या स्थानावर आहेत. इम्पीरियल कॉलेज लंडनचे वरिष्ठ संशोधक प्राध्यापक माजिद इज्जती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "यापैकी अनेक राष्ट्र ही अनेक द्वीपसमूह मिळून तयार झालेली आहेत. इथल्या लोकांचे आरोग्य तिथे असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे."
"काही प्रकरणांमध्ये आरोग्यासाठी अहितकारक खाद्यपदार्थांची विक्री वाढवण्यासाठी आक्रमक जाहिरात मोहिमा राबविल्या जातात. त्यामुळे आरोग्यदायी अन्नाची किंमत आणि उपलब्ध होणं ही एक समस्याच बनते." प्राध्यापक इज्जती अनेक वर्षांपासून जागतिक डेटाचं विश्लेषण करत आहेत. ते म्हणतात की, चित्र ज्या वेगाने बदललं आहे त्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटतं. आज अनेक देश लठ्ठपणाच्या संकटाचा सामना करत आहेत, तर काही देश असेही आहेत जिथे लोकांचं कमी वजन ही सर्वात मोठी चिंता मानली जाते." 1990 ते 2022 पर्यंतच्या या अहवालात मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपटीने वाढल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, प्रौढ लोकांमध्ये स्त्रियांच्या लठ्ठपणाचा दर दुप्पट आणि पुरुषांमध्ये जवळजवळ तिप्पट आहे. त्याचवेळी, कमी वजनाच्या लोकांच्या टक्केवारीत 50टक्क्यांची घट झाल्याचं अहवालात जरी म्हटलं असलं तरी ती अजूनही एक गंभीर समस्या आहे, विशेषतः गरीब समुदायांमध्ये. जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) महासंचालक डॉ. टेड्रोस एडनोम घेबियस म्हणाले, "या नवीन अभ्यासात असं सांगितलं आहे की, आहार, शारीरिक हालचाल आणि पुरेशी काळजी याद्वारे लठ्ठपणाला सुरुवातीपासूनच प्रतिबंध करता येईल. सोबतच याचे व्यवस्थापन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे." ते म्हणाले की, हे सरकार आणि समुदायांचे काम आहे. शिवाय यात खाजगी क्षेत्राचे सहकार्य आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या उत्पादनाला आरोग्यावरील परिणामांसाठी जबाबदार धरलं पाहिजे." मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशनच्या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. गुहा प्रदीपा म्हणतात की, जगातील प्रमुख समस्यांमुळे लठ्ठपणा आणि कमी वजनामुळे कुपोषणाचा धोका वाढतो. ते म्हणाले, "हवामानातील बदल, कोरोना साथीच्या रोगामुळे येणारे व्यत्यय आणि युक्रेनमधील युद्ध यासारख्या घटनांमुळे याचा प्रभाव वाढतो. कारण यातून गरिबी वाढते आणि पोषक अन्नपदार्थांची किंमत वाढते आहे." "याचा परिणाम असा होतो की, काही घरांमध्ये अपुरं अन्न असतं. परिणामी ते कमी अनारोग्यकारक अन्नाकडे वळतात." 1,500 हून अधिक संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने पाच आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 22 कोटी लोकांच्या उंची आणि वजनाचे विश्लेषण केले. यासाठी त्यांनी बॉडी मास इंडेक्स मापन प्रणाली वापरली. संशोधकांनी हे मान्य केलंय की, ही मापन पद्धती अपूर्ण असून काही देशांकडे इतरांपेक्षा चांगली माहिती आहे. मात्र त्यांनी तर्क देताना असंही म्हटलंय की, ही मापन पद्धती सगळीकडे प्रचलित असून यामुळेच जागतिक विश्लेषण शक्य झालं आहे.
 
Published By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

पुढील लेख
Show comments