धूम्रपानाचे एकदा जडलेले व्यसन अनेकांच्या बाबतीत सुटता सुटत नाही. काही दिवस ते त्यापासून दूर राहतातही, पण पुन्हा त्याकडे आकर्षित होतात. अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी आता एक ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टिम विकसित केली आहे. प्रेरणादायी टेक्स्ट आणि व्हिडिओ संदेश पाठवून ते धूम्रपानापासून सुटका करून घेण्यास मदत करते.
अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही सिस्टिम विकसित केली असून त्यांच्या माहितीनुसार, एका स्मार्टफोन सोबतही ही सिस्टिम जोडण्यात आली आहे.
अंगावर परिधान करण्यायोग्य सेन्सरच्या मदतीने ही सिस्टिम धूम्रपानासंबंधी हालचालींची ओळख झाल्यास लोकांना 20 ते 120 सेकंदांचा व्हिडिओ संदेश पाठवते. धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी निकोटिन गमपासून विविध प्रकारची उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आजच्या काळात या सवयीपासून सुटका करून घेण्यासाठी शरीरावर परिधान केल्या जाणार्या तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढत आहे. या दिशेने ही नवी अलर्ट सिस्टिम पहिलेच पाऊल असू शकते. या सिस्टिममध्ये दोन आर्मबँड सेन्सरही असून ते धूम्रपान हालचाली ओळखतात. चाचणीमध्ये ही सिस्टिम 98 टक्के खरी उतरली.