rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात थंड पाण्यात पोहोण्याचे हे आहेत फायदे आणि तोटे

pros and cons of swimming in cold water in winter
, शनिवार, 23 डिसेंबर 2023 (16:22 IST)
सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हीडिओ पाहायला मिळतील, ज्यात कुणी आपल्या मुलांना थंड पाण्यात पोहोण्याच्या युक्त्या शिकवत आहे, तर कुठे महिलांचा समूह कडाक्याच्या थंडीत शून्याच्या जवळपास तापमान असलेल्या समुद्राच्या पाण्यात पोहोण्याचा आनंद घेत आहे.
 
त्याच वेळी, एक मुलगी आहे जी तिच्या व्हीडिओमध्ये सांगते की ती 'स्नोमॅन विम हाफ' पासून प्रेरित होऊन बर्फाळ पाण्यात डुबकी मारायला कशी शिकली आणि त्यामुळे तिचं आयुष्य कसं बदललं.
 
या थंडीच्या मोसमात जेव्हा थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचारही मनाला थरकाप होतो, तेव्हा बर्फाळ पाण्यात फक्त काही मिनिटे नाहीत, तर तासन् तास पोहोण्याचं धाडस हे लोक कसे करतात?
 
त्यांनी त्यांच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे की ते महामानव आहेत? अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसीच्या प्रतिनिधी अन्या डोरोडेको या डॉ. हीथर मॅसी यांच्या संशोधन केंद्राकडे वळल्या.
 
ब्रिटनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्ट्समाउथ येथील एका विशेष संशोधन केंद्राच्या एक्स्ट्रीम एनवायरमेंट लॅबोरेटरीमधील संशोधक डॉ. हीदर मॅसी या महिलांच्या अशा गटाचा एक भाग होत्या, ज्यांना ब्रिटनमधील समुद्रकिनाऱ्यावर 'कोल्ड वॉटर स्विमिंग' म्हणजेच थंड पाण्यात पोहोण्याचा आनंद लुटताना पाहिलं होत. तापमान 10 अंशांच्या खाली असताना महिलांचा हा गट थंड पाण्यात पोहत होता.
 
कोल्ड वॉटर स्विमिंग
थंड किंवा बर्फाळ पाण्याच्या संपर्कात येण्याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम काय होतो?
 
यावर डॉक्टर हीथर मॅसी यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला सांगितलं की, "सर्वप्रथम त्वचेला थंड वाटत. याला कोल्ड शॉक म्हटलं जात. या कोल्ड शॉकने तुमचे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतो. याव्यतिरिक्त शरीरात एड्रिनालालिन आणि नोराएड्रिनालिनसारखे स्ट्रेस हार्मोन तयार होतात.
 
शरीरात या दोन हार्मोनची पातळी वाढल्यानं काहीतरी वेगळं साध्य केल्याची भावना निर्माण होते.
 
डॉ. मॅसी म्हणतात की, याच कारणामुळे बहुतेक लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की थंड पाण्याच्या पोहण्याने त्यांना आनंददायी अनुभव आला आणि त्यांची मन:स्थिती सुधारली.
 
त्यांच्या मते, काही संशोधनात असं दिसून आलं आहे की हे मायग्रेन, बीपी आणि रजोनिवृत्ती दरम्यान मूड स्विंगसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
 
जर भारताबद्दल बोलायचं झालं तर, ब्रिटन आणि युरोपप्रमाणे इथलं तापमान वर्षभर थंड नसत, त्यामुळे थंड पाण्यात पोहणं इथं प्रचलित नाही.
 
ऑल वेदर स्विमिंग
पण ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षांत कोल्ड वॉटर स्विमिंगची लोकांची क्रेझ वाढली असताना, भारतात ऑल वेदर स्विमिंग ट्रेंड वाढला आहे.
 
म्हणजे हिवाळ्याच्या मोसमात बिनधास्त पोहण्याचा आनंद लोक घेऊ शकतात.
 
भारतात प्रत्येक हंगामात पोहण्यासाठी पाण्याचे तापमान 25-26 अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवलं जातं.
 
पण भारतीय हवामान लक्षात घेता हिवाळ्यात पोहायला जाणं सुरक्षित आहे का?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना फोर्टिस हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिनच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर प्रमिला रामनिस बैठा यांनी बीबीसी प्रतिनिधी आर. द्विवेदी यांना सांगितलं, काही खबरदारी घेतल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.
 
डॉ. प्रमिला रामनीस बैठा सांगतात की, थंड पाण्याने पोहल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, तणाव कमी करण्यास, कॅलरीज बर्न करण्यास आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत होते.
 
डॉ. मॅसी अगदी म्हणतात की, डिप्रेशन और स्ट्रेस दूर करण्याव्यतिरिक्त डिमेंशियाच्या उपचारांमध्ये देखील ते फायदेशीर ठरू शकतं. संशोधन असं दर्शवितं की यामुळे एकाग्रता वाढते आणि लोक त्यांच्या कामावर अधिक चांगलं लक्ष केंद्रित करू शकतात.
 
थेरेपी म्हणून वापरलं जाऊ शकतं?
डॉक्टर हीथर मॅसी म्हणतात, "थंड पाण्यात पोहोल्यानंतरचा लोकांचा अनुभव सामान्यतः चांगला असला तरी, जोपर्यंत अत्यंत कठोर वैद्यकीय चाचण्यांकरुन त्याचे फायदे आणि तोटे योग्यरित्या समोर येत नाहीत तोपर्यंत ते थेरपी म्हणून वापरलं जाऊ शकत नाही."
 
हीथर मॅसी आणि त्यांचे सहकारी संशोधनात हीच माहिती मिळवत आहेत की, थेरेपी म्हणून याचा वापर शक्य आहे का.
 
त्या याच्या धोक्यांपासून सावध करताना सांगतात की, थंड पाण्याच्या अचानक संपर्कामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं, जे काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकतं.
 
डॉ. प्रमिला रामनीस बैठा देखील थंड पाण्यात अंघोळ करण्यापूर्वी किंवा पोहण्याआधी सावधगिरी बाळगण्यास सांगतात.
 
निष्काळजीपणामुळे कोल्ड शॉक महागात पडू शकतो
भारताबद्दल बोलायचं झालं तर शिलाँग येथील क्लबमध्ये गेल्या 25 वर्षांपासून नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी 31 डिसेंबर रोजी स्नो वॉटर पूलमध्ये पोहोण्याचं आयोजन केलं जातं.
 
यावेळी पूलमध्ये कित्येक टन बर्फ ओतला जातो आणि लोक त्यामध्ये पोहण्याचा थरारक अनुभव घेतात.
 
त्याचा शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाही का?
 
यावर डॉ. प्रमिला रामनिस बैठा सांगतात की, हे अत्यंत सावधगिरीनं आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलं पाहिजे.
 
शरीर आणि मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची कला
जर आपण बर्फाळ पाण्यात डुबकी मारण्याबद्दल बोललायच झालं, तर डच एक्स्ट्रीम वेदर अॅथलीट विम हॉफ यांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही.
 
शॉर्ट्स परिधान करून माऊंट किलमंजारोवर चढाई करणं, आर्क्टिक सर्कलमध्ये अर्ध मॅरेथॉन अनवाणी धावणं, बर्फाने भरलेल्या कंटेनरमध्ये 112 मिनिटांपेक्षा जास्त काळ उभं राहणे यासारख्या विक्रमांमुळे त्यांनी 'आइसमन' ही पदवी मिळवली आहे.
 
अशा तीव्र हवामानाच्या अनुभव म्हणजे आनंदी, निरोगी आणि बलवान होण्याचा मंत्र आहे, असं विम म्हणतात. आणि जगभरातील लोकांना त्याद्वारे असामान्य उद्दिष्टे साध्य करण्यास शिकवतात.
 
त्यांच्या मते शरीर आणि मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची ही एक विलक्षण कला आहे, जी तुमच्यातील प्रत्येक प्रकारची भीती काढून टाकते.
 
अंटार्क्टिकामध्ये अवघ्या 1 डिग्री सेल्सिअस तापमानात पाण्यात पोहोण्याचा विक्रम करणाऱ्या भक्ती शर्मा यांना भारताच्या आईसवुमन म्हटलं जातं.
 
त्या मोटिवेशनल स्पीकर आहे आणि एका टेड टॉक व्हीडिओमध्ये त्या सांगतात की, बर्फाळ पाण्याने त्यांना याची जाणीव करुन दिली की भीतीवर खरोखरच तुम्ही विजय प्राप्त करु शकता.
 
बर्फाचं पाणी किंवा थंड पाण्यात पोहणं हा तुमच्या मनावर पूर्ण ताबा मिळवण्याचा, तणावावर मात करण्याचा आणि चांगल्या आरोग्यासाठीचा उत्तम मार्ग आहे. पण तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे ते आजमावताना खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Soft Lips हिवाळ्यात मुलायम ओठांसाठी नैसर्गिक उपाय