पॉप स्टार जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्याने या आठवड्यात होणारे त्याचे सर्व शो रद्द केले आहेत. त्याने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
28 वर्षांच्या या पॉप सिंगरने इंस्टाग्राम व्हीडिओमध्ये सांगितलं की, "त्याच्या चेहऱ्याची ही अवस्था 'रॅमसे हंट सिंड्रोम' मुळे झाली आहे."
या व्हिडिओमध्ये तो सांगतोय की, "तुम्हाला दिसत असेल की माझ्या एका डोळ्याची पापणी उघडझाप करत नाहीये. माझ्या चेहऱ्याची एक बाजू पूर्णपणे पॅरलाईज झाली असल्यामुळे मी एका बाजूने हसू ही शकत नाही."
तज्ज्ञांच्या मते, शिंगल्सचा (एक प्रकारचा त्वचारोग) एखाद्याच्या कानाजवळील चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम झाल्यावर , 'रॅमसे हंट सिंड्रोम' होतो.
या आठवड्याच्या सुरुवातीलाचं जस्टिन बीबरच्या जस्टिस वर्ल्ड टूरचे तीन शो पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली होती.
जस्टिन बीबर व्हीडिओमध्ये काय म्हणाला?
जस्टिन बीबरने त्याच्या तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्याचा उजवा भाग दाखवला. तो म्हणाला, "या व्हायरसने माझ्या कानांवर आणि माझ्या चेहऱ्याच्या नसांवर हल्ला केलाय. ज्याचा परिणाम माझ्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला."
एवढंच नाही तर त्याने चाहत्यांना धीर ही धरायला सांगितलाय. त्याच्या आगामी शोबद्दल तो म्हणाला की, "हा शो करायला तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीये."
तो पुढे सांगतो की, "तुम्हाला हे दिसत असेल तर समजेल की ही परिस्थिती खूप गंभीर आहे. कदाचित असं नसतं झालं, पण मला वाटतं की माझ्या शरीराला विश्रांतीची गरज आहे. मला आशा आहे की तुम्ही लोक समजून घ्याल. मी या वेळेचा उपयोग फक्त विश्रांतीसाठी करेन आणि 100% एनर्जीने कमबॅक करेन. कारण मी तेच करण्यासाठी जन्माला आलोय."
जस्टिनचे या आठवड्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टन आणि टोरंटोमध्ये शो होणार होते. त्याचप्रमाणे लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कमध्येही त्याचे शो होणार होते.
हा आजार नेमका काय असतो?
अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या मते, 'रॅमसे हंट सिंड्रोम'मुळे चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका येतो. बऱ्याचदा याचा कानांवर, तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. काहीवेळा असं होतं की, बहुतेक लोकांमध्ये या रॅमसे हंट सिंड्रोमची लक्षणं तात्पुरत्या स्वरूपात असतात, पण काहींमध्ये ही लक्षणं कायमस्वरूपी राहू शकतात.
हा सिंड्रोम ज्या लोकांना झालाय त्यांना त्यांच्या पापण्यांची उघडझाप करता येत नाही. बऱ्याचदा नजर अंधुक होते. कधीकधी डोळे दुखण्याच्या तक्रारीही होऊ शकतात. साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा सिंड्रोम आढळण्याची शक्यता जास्त असते, असं मेयो क्लिनिकच्या हवाल्याने सांगण्यात आलंय.
याआधी म्हणजे मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिला पक्षाघाताचा झटका आला होता आणि तिच्या हृदयात छिद्र होतं त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असं नंतर सांगण्यात आलं.
मेयो क्लिनिकच्या मते, ज्यामुळे चिकनपॉक्स होतो त्याच विषाणूमुळे रॅमसे हंट सिंड्रोम होतो. चिकनपॉक्स बरा झाल्यानंतरही त्याचे विषाणू तुमच्या शरीरात दीर्घकाळ असतात. पुढं काही वर्षांनंतरही ते सक्रिय होऊ शकतात. जर ते सक्रिय झाले तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर ही होऊ शकतो.
लक्षणं
रामसे हंट सिंड्रोमची दोन मुख्य लक्षणं आहेत.
* कानात आणि आजूबाजूला पस भरलेल्या फोडासारखे पुरळ येतात. हे पुरळ वेदनादायी असतात.
* चेहऱ्याच्या स्नायूमध्ये अशक्तपणा किंवा पक्षाघात.
* कधीकधी एकाच वेळी अर्धांगवायू होण्याची आणि पुरळ उठण्याची शक्यता असते.
इतरही लक्षणं
* कानात वेदना
* ऐकू न येणे
* कानात वाजणे
* एका डोळ्याच्या पापणीची उघडझाप करण्यात अडचण
* गरगरल्यासारखं होणं
* तोंडाची चव जाणं
* तोंड आणि डोळे कोरडे पडणं
डॉक्टरांकडे कधी जावं
चेहऱ्यावर अर्धांगवायू झाल्यासारखं वाटलं किंवा पुरळ उठलेले दिसले की लगेचचं डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिल्या तीन दिवसांत उपचार घेतल्यास दीर्घकाळासाठी होणारे परिणाम थांबवता येतात.