Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? लस डेल्टा प्लसवर परिणामकारक आहे का?

डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? लस डेल्टा प्लसवर परिणामकारक आहे का?
, शनिवार, 10 जुलै 2021 (13:08 IST)
कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट भारतात आढळून आलाय. हा 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न' म्हणजे काळजी करण्याजोगा व्हेरियंट असल्याचं भारत सरकारने आणि WHOने म्हटलंय.
 
कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. देशात कोव्हिड-19 ची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत असतानाच 'डेल्टा प्लस' व्हेरियंट किती धोकादायक ठरू शकतो, याबद्दलचा अभ्यास सध्या करण्यात येतोय.
 
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोव्हिडच्या विविध प्रकारांना (व्हेरियंट) नावं दिली आहेत. ही नावं ग्रीक भाषेतील आहेत.
 
भारत, युके आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोव्हिडच्या विविध व्हेरियंटना ही नावं देण्यात आली आहेत आणि याच नावांनी यापुढे जागतिक आरोग्य संघटना संबंधित व्हेरियंटला संबोधले आहे.
 
कोरोनाचे मुख्य व्हेरियंट्स कोणते?
Sars - CoV -2 च्या चार मुख्य व्हेरियंट्सबद्दल काळजी व्यक्त केली जातेय.
 
अल्फा - युकेत पहिल्यांदा आढळलेला व्हेरियंट
बीटा - दक्षिण आफ्रिका
गामा - ब्राझील
डेल्टा - भारत
भारतातील व्हेरियंटला 'डेल्टा' आणि 'कपा' , युकेतील व्हेरियंटला 'अल्फा', तर दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटला 'बीटा' असं संबोधलं जातंय.
 
या सगळ्या व्हेरियंट्सना WHO ने Varaiants of Concern म्हणजे सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचवू शकतील असे,काळजी करण्याजोगे व्हेरियंट म्हटलं आहे. या म्युटेशन्समुळे व्हायरस अधिक संसर्गजन्य झालाय, त्याने आजार अधिक गंभीर होतो किंवा या व्हेरियंटवर लशीही पुरेशा परिणामकारक ठरू शकणार नाहीत.
 
यानंतरच्या काही व्हेरियंटना - Variant of Interest ठरवण्यात आलंय. म्हणजे या व्हेरियंटचा संसर्ग काही भागांमध्ये किंवा विविध देशांमध्ये आढळलेला आहे, आणि यावर लक्ष ठेवायला हवं.
 
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, व्हेरियंटबद्दल चर्चा अधिक सहज व्हावी म्हणून ही नावं दिली आहेत. तसंच, नावाभोवती एक प्रकारचा डाग होता, तोही दूर करण्यासाटी ही नवीन नावं दिली आहेत.
 
डेल्टा व्हेरियंट काय आहे?
एप्रिल आणि मे महिन्यात भारतात आलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट हे डेल्टा व्हेरियंटमुळे आलेली होती. युकेसह जगभरातल्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळा आहे. अमेरिका, चीन, आफ्रिका, स्कँडेनेव्हिया आणि पॅसिफिक भागामध्येही या डेल्हा व्हेरियंटमुळे संसर्गाचा उद्रेक झाला होता.
 
या डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाचं प्रमाण अल्फा व्हेरियंटपेक्षा 60% जास्त आहे.
 
लस न घेतलेल्या ज्या लोकांना डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाला त्यांच्यामध्ये अल्फा व्हेरियंटच्या संसर्गापेक्षा हॉस्पिटलमध्ये जावं लागण्याची शक्यता दुप्पट असल्याचं युकेमधल्या आकडेवारीवरुन आढळून आलंय. आधीच्या कोरोनाव्हायरसपेक्षा या डेल्टा व्हेरियंटशी निगडीत काही वेगळी लक्षणंही आढळली आहेत.
 
सततचा खोकला, ताप आणि वास आणि चव जाणं ही कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सामान्य लक्षणं आहेत.
 
डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये ताप आढळून आला असला तर सामान्यपणे आढळलेल्या 10 लक्षणांमध्ये वास-चव जाण्याचा समावेश नसल्याचं झोई कोव्हिड सिम्प्टम स्टडी करणारे प्रा. टिम स्पेक्टर सांगतात.
 
डोकेदुखी, घसा खवखवणं, नाक गळणं ही लक्षणं डेल्टा व्हेरियंटसंदर्भात आढळलून आली.
 
डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे?
डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी बदल म्हणजेच म्युटेशन्स होऊन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झालाय. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
 
भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या 'डेल्टा व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. 'डेल्टा प्लस' व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे.
 
डेल्टा प्लस' व्हेरियंट' कसा तयार झाला याची माहिती देताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, "कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी 'डेल्टा व्हेरियंट' कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन (बदल) झाल्याचं आढळून आलं. याला 'डेल्टा प्लस' किंवा 'AY.1' असं नाव देण्यात आलं."
 
युकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरातील 10 देशांमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यात भारत, अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनी, रशिया, जपानसारख्या देशांचा समावेश आहे.
 
लांब्दा (Lambda) व्हेरियंट
व्हेरियंट ऑफ इंटरेस्टच्या यादीत नुकताच समावेश करण्यात आलेला हा व्हेरियंट. दक्षिण अमेरिकेतल्या आणि अँडीज पर्वतरांग असणाऱ्या - पेरु, चिली, अर्जेंटिना आणि इक्वेडोर देशांमध्ये हा व्हेरियंट मोठ्या प्रमाणात आढळला आहे. एकूण 29 देशांमध्ये या व्हेरियंटचा संसर्ग आढळलाय.
 
या व्हेरियंटच्या संसर्गामुळे आतड्यांशी संबंधित लक्षणं दिसू शकण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय आणि याविषयी संशोधन करण्यात येतंय.
 
डेल्टा प्लस व्हेरियंट किती धोकादायक आहे?
दुसरी लाट ही प्रामुख्यानं डेल्टा व्हेरिएंटमुळं आली होती. जर लोकांमध्ये अशाच प्रकारे विषाणूचा प्रसार होत राहिला तर, भविष्यात अशाप्रकारचे आणखी व्हेरिएंट्स येऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
 
डेल्टा प्लस असं नाव असलेला हा नवा व्हेरिएंट अधिक चिंतेचं कारण - 'variant of concern' असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे. पण तो तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरू शकतो, हे ठरवण्यासाठी पुरेशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र ''काही आठवड्यांमध्ये परिस्थिती बदलू शकते'', असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
 
"आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या आकडेवारीला आधीच कोरोनाची लागण होऊन गेलेली असली तरी, 20-30% अजूनही शिल्लक आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळं आपण बारकाईनं लक्ष ठेवून, कोरोनाच्या संख्येत कुठं वेगाने वाढ होत आहे का, हे पाहिलं पाहिजे," असं गणितीय मॉडेल मांडणारे अभ्यासक गौतम मेनन म्हणतात.
 
भारतात अजूनही मोठ्या लोकसंख्येला कोव्हिड आणि त्याच्या नव्या आणि अधिक घातक व्हेरिएंट्सपासून धोका आहे. त्यामुळं याकडं दुर्लक्ष करता येणार नाही, यावर सर्वच तज्ज्ञांचं एकमत आहे.
 
अधिक माहितीसाठी वाचा - डेल्टा प्लस : तिसऱ्या लाटेपासून भारताचं संरक्षण होईल?
 
लस डेल्टा प्लसवर परिणामकारक आहे का?
तज्ज्ञांच्या मते सध्याच्या लशी कोरोनाच्या माहिती असलेल्या व्हेरिएंटवर परिणामकारक आहेत. पण नव्या व्हेरिएंटवरही त्या परिणामकारक ठरतील याची खात्री नाही.
 
फायर किंवा अॅस्ट्राझेनका लशीचा एक डोस डेल्टा व्हेरियंटवर 33 टक्के परिणाम कारक आढळलाय. अल्फा व्हेरियंटवर याच लशीचा एक डोस 50% परिणामकारक होता.
 
दुसऱ्या डोसनंतर फायझरची लस डेल्टा व्हेरियंटवर 88% तर अॅस्ट्राझेनकाची लस 60% परिणामकारक आढळली.
 
आपली कोव्हॅक्सिन लस डेल्टा व्हेरियंटवर 65.2% परिणामकारक असल्याचं भारत बायोटेकनेही तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायलचे निष्कर्ष जाहीर करताना म्हटलंय.
 
डेल्टा प्लस हा डेल्टा व्हेरियंटमधून तयार झालाय. मग, कोव्हिडविरोधी लस यावर प्रभावी ठरेल? याबाबत संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. इश्वर गिलाडा यांच्याशी बीबीसी मराठीने चर्चा केली.
 
ते म्हणतात, "डेल्टा व्हेरियंट लस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देतो हे सिद्ध झालंय. त्यामुळे, डेल्टा प्लसही रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्याची (immune escape) शक्यता नाकारता येणार नाही."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तव्यावर झटपट तयार करा ब्रेड पिझ्झा