महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे राज्यात मार्च महिन्यात 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आहे.
उष्माघातामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
उष्माघात म्हणजे काय?
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात.बाहेरचं तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडतं, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो, असं आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.
राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते.
जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्डब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेची लाट आल्याने आणि अनेक शहरांमध्ये पारा 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता.
एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं?
लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने आणि मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पीवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे."
उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी, थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणं सुद्धा दिसतात असंही त्या म्हणाल्या.
उष्माघाताची लक्षणं
चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं.
शरीराचं तापमान जास्त वाढणं.
पोटात कळ येणं.
शरीरातील पाणी कमी होणं.
ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत.
तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
आरोग्य विभाग सतर्क
वृत्तानुसार, महाराष्ट्रात गेल्या वर्षी (2023 )मार्च ते जुलै महिन्यात राज्यात 3,191 लोकांना उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागले होते, तर याच काळात राज्यात 22 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.
यंदा मार्च महिन्यात राज्यात 33 जणांना आतापर्यंत उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागल्याचं बातमीत म्हटलं आहे.
या पर्श्वभूमीवर कोणत्या वर्गाला उष्माघाताचा फटका बसू शकतो याचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व कृती आराखडा आरोग्य विभागाने तयार केल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.
उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेथ ऑडिट जिल्हास्तरिय डेथ ऑडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
Published By- Priya Dixit