Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोट का सुटतं? पोटावर चरबी कशी साठते? ती कशी कमी करायची? वाचा

fats
, शुक्रवार, 15 मार्च 2024 (20:03 IST)
जगभरात लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी हा आजार वेगाने पसरत असल्याचं दिसत आहे. सध्या जगात 100 कोटी म्हणजे 1 अब्ज लोक लठ्ठ असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकानं केलेल्या अभ्यासात या 100 कोटींमध्ये 88 कोटी लोक प्रौढ आहेत तर 16 कोटी मुलं लठ्ठ आहेत.
 
ओबिसिटीमुळे हृदयरोग, टाइप टू डायबेटिस आणि कर्करोगासारखे नवे आजार उद्भवू शकतात. लठ्ठ देशांच्या यादीत महिलांच्या बाबतीत भारत 19 व्या स्थानावर आणि पुरुषांच्या बाबतीत भारत 21 व्या स्थानावर आहे.
 
अमेरिका हा लठ्ठपणा वेगाने वाढणाऱ्या देशांच्या यादीत पुरुषांच्या बाबतीत 10 व्य़ा तर महिलांच्या बाबतीत 36 व्या स्थानावर आहे.
 
महिलांच्या बाबतीत चीन 11 व्या तर पुरुषांच्या बाबतीत 52 व्या स्थानावर आहे.
 
लठ्ठपणा ही इतकी मोठी समस्या झालीच कशी?
जगभरात लठ्ठपणा चुकीच्या आहारपद्धतीमुळे वाढला असं इंपिरियल कॉलेज लंडनचे वरिष्ठ संशोधक माजिद इज्जती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले.
 
आरोग्यासाठी अयोग्य असलेल्या पदार्थांचं तडाखेबाज मार्केटिंग हे या समस्येचं मूळ आहे असं ते सांगतात.
 
प्रा. इज्जती लठ्ठपणावर गेली अनेक वर्षं संशोधन करत आहेत. लठ्ठपणा अतिशय आश्चर्यकारक वेगानं वाढत आहे असं ते सांगतात. 1990 ते 2022 या काळात मुलांमधील लठ्ठपणा चौपट वेगानं वाढल्याचं दिसलं आहे.
याच काळात महिलांमधील लठ्ठपणाचा वेग दुप्पट झाला आहे तर प्रौढ पुरुषांमध्ये हा वेग तिपटीने वाढला आहे.
 
तर आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या प्रौढांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. अर्थात आजही गरिब देशांत कुपोषण आणि पुरेसं पोषण न मिळणं या समस्या आहेत असं संशोधक सांगतात.
 
यामागे कोव्हिड आणि युद्ध ही कारणं आहेत का?
यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये कोव्हिडची जागतिक साथ, युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध, वातावरणीय बदल असे अनेक घटक आहेत.इज्जती सांगतात, या कारणांमुळे जगभरातील लोक चांगले आरोग्यदायी अन्न खाऊ शकत नाहीयेत त्यामुळे गरीबी वाढली आहे.
 
अनेक कुटुंबांना अपुरं अन्न मिळत आहे त्यामुळे त्यांना चांगले आरोग्यदायी पदार्थ खायला मिळत नाहीत असं ते सांगतात.
यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटरसह 1500 संशोधकांनी वय वर्षं पाच आणि त्यापुढील वयाच्या 2.2 कोटी लोकांच्या वजन आणि उंचीचा अभ्यास केला.
यामध्ये त्यांनी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयची तुलना केली. अर्थात बीएमआय हे बॉडी फॅट म्हणजे शरीरातील मेद निश्चित करणारा एकमेव परिमाण नसलं तरी जगभरात बीएमआय हे लोकप्रिय एकक मानलं जातं.
 
भारतीय लोकांचं पोट का सुटतं?
बीबीसी तमिळने चेन्नई येथील मधुमेह आणि चयापचय तज्ज्ञ डॉ. अश्विन कुमार यांच्याशी या विषयावर चर्चा केली. भारतामध्ये सध्या असलेला लठ्ठपणा मुख्यत्वे जनुकीय कारणांमुळे आहे.याचाच अर्थ जर पालक लठ्ठ असतील तर मुलंही लठ्ठ होणं.
 
“भारतामध्ये पुरुषांच्या पोटावर मेद साठल्याचं आणि महिलांच्या मांड्या आणि नितंबांवर मेद साठल्याचं दिसतं. मात्र जगभरात लोकांच्या शरीरावर त्यांच्या वजन आणि उंचीनुसार सर्वत्र समप्रमाणात मेद विभागल्याचं दिसतं”, असं ते सांगतात. यामुळे कमी खाऊनही जाड झाल्यासारखं लोकांना वाटतं असं डॉ. अश्विन सांगतात. तसंच ही समस्य़ा प्रौढ आणि लहान मुलांमध्ये दोन्हींतही आढळते असं ते सांगतात. याबरोबरच शारीरिक हालचाल कमी करणं, बैठी जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी हे लठ्ठपणाचं मुख्य कारण आहे असं डॉ. अश्विन यांचं मत आहे.ते सांगतात, यामुळे लठ्ठपणाची समस्या सर्वत्र दिसत आहे, 40 ते 50 वर्षांवरील बहुतांश लोक जीवनशैलीविषयक आजारांमुळे त्रस्त आहेत.
 
लठ्ठपणा कसा ठरवला, मोजला जातो?
फक्त शरीर मोठं आहे म्हणून त्या व्यक्तीला लठ्ठपणाची समस्या आहे असं नसतं, अंगकाठी बारीक असलेल्या लोकांमध्येही मेद वाढलेला असू शकतो आणि त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो असं डॉ. अश्विन सांगतात.साधारणपणे रुढ असलेल्या मोजणीपद्धतीनुसार 24 पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय असलेल्या लोकांना ओव्हरवेट समजलं जातं. बीएमआय 30 च्या पुढे असेल तर त्याला लठ्ठ म्हणजे ओबिस म्हटलं जातं तर 35 च्या पुढे बीएमआय असेल तर त्याला गंभीर लठ्ठपणाची समस्या मानलं जातं.परंतु आता बारीक अंगकाठीचे लोकही लठ्ठपणाची समस्या अनुभवत आहेत असं ते सांगतात. फक्त बीएमआयच नाही तर इतर काही घटकांद्वारे लठ्ठपणा मोजला जातो.
“एडमॉंटन ओबेसिटी स्टेजिंग सिस्टिम ही सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याची पद्धती आहे. यात मानसिक, शारीरिक, वाढीचे सर्व घटक विचारात घेतले जातात. म्हणजेच तुम्हाला एखादा मानसिक तणाव आहे का, शारीरिकदृष्ट्या तुम्हाला एखादी कृती करता येतेय का, तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे का अशा घटकांचा विचार करुन लठ्ठपणा मोजला जात”, असं ते सांगतात.
 
वजन कमी करायला काय करावं?
डॉ. अश्विन सांगतात, “फक्त वजन कमी करणं हे एकमेव ध्येय नसावं, अर्थात व्यायाम आणि डाएटमुळे वजन लवकर कमी होतं तसंच हृदयरोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.”
“वजन कमी करण्यासाठी लो कॅलरी डाएट हा एक चांगला उपाय आहेत. त्यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञाला भेटून त्याच्या सल्ल्यानुसार आहार घ्या, पण आहाराबरोबर तुम्ही कितीवेळ झोपता, व्यायाम करता, मोबाईल आणि संगणकाच्या स्क्रीनसमोर असता हे घटकही लक्षात घेतले पाहिजेत”, असं अश्विन सांगतात.
“लठ्ठपणावर Semaglutide नावाचे औषध युरोपात तयार करण्यात आले आहे”, ते भारतात उपलब्ध असल्याचं ते सांगतात.“तसेच जे अतिशय लठ्ठ आहेत ते बॅरिएट्रिक सर्जरीद्वारे लठ्ठपणा कमी करू शकतात. पूर्वी ही शस्त्रक्रीया अगदी प्राथमिक टप्प्यावर होती आता मात्र यात मोठी सुधारणा झाल्याच”, अश्विन सांगतात.ते पुढं म्हणाले, “आता एंडोबॅरिएट्रिक उपचार आले आहेत. यामध्ये तुमच्या तोंडाद्वारे एक ट्यूब आणि बलून पोटात सरकवला जातो. त्यामुळे पोटाचा भाग व्यापला जातो आणि एका मर्यादेपलिकडे अन्न भक्षण केलं जात नाही. एकदा वजन आटोक्यात आलं की हा बलून काढला जातो. एंडोबॅरिएट्रिक पद्धतीने बॅरिएट्रिक सर्जरीही शक्य आहे.”
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलींना आवडतात मुलांमधील हे 3 गुण, तुमच्यात आहे का?