- डॉ मनोज बाऊस्कर, कान, नाक घसा विकार तज्ञ, रुबी हॉल क्लिनिक, पुणे
अलीकडेच कणांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. आणि त्याला मोठ्या प्रमाणात होत असलेला इअरफोनचा वापर कारणीभूत ठरत आहे. ह्या वर्ल्ड हेअरिंग डे निम्मित जाणून घेऊयात कशाप्रकारे हि समस्या बहिरेपणाला आमंत्रण देत आहे.
सध्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा, घर बसल्या वेब सिरीज पाहणे, सतत फोन सुरु असणे आणि त्याकरिता तासनतास इअरफोन्सचा वापर करण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. यामुळे डोके दुखी, कान दुखणे अशा समस्या पहायला मिळतात. यासाठी तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असून इअरफोनचा वापर कमी करणं गरजेचं आहे. इअरफोनच्या नियमित वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. कानाचा पडदा वायब्रेट व्हायला लागतो. दूरचा आवाज ऐकण्यात त्रास होतो. यामुळे तुम्हाला बहिरेपणा देखील येऊ शकतो. तसेच कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे अशा समस्या उद्भवतात.
इअरफोन कानात घालून मोठ्या आवजात गाणी एकल्याने मानसिक ताण वाढू शकतो. इअरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनच्या वापराने कानातील पेशी मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना इअरफोन वापरापासून परावृत्त करणं गरजेचं आहे. तसंच मोठ्यांनीही कानाच्या विकाराचा धोका समजून घेत इअरफोनचा वापर करणे आवश्यक आहे. जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास कानात हवा जाण्याच मार्ग राहत नाही आणि त्यामुळे कानात संसर्ग होऊन त्याचा परिणाम श्रवणशक्तीवर होऊ शकतो. सततच्या वापराने जीवणुंची वाढ होऊन कानात मळ साठू शकतो. इअरफोनमधून निघणारे चुंबकीय तरंग मेंदुला नुकसान पोहोचवून त्यावर वाईट परिणाम करू शकतात. हेडफोन वापरण्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. कानाच्या त्वचेला रॅश येणे, त्वचेला फोड येणे, कानात बुरशी होणे, तयार झालेला मळ बाहेर न पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. कानाच्या आतील भागात आवाज प्रदूषणामुळे बहिरेपणा वाढण्याचा धोका आहे.
दुस-या व्यक्तीने वापरलेले हेडफोन्स स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. जेणेकरून कानाचा संसर्ग पसरणार नाही. इअरफोन्सचा वापर कानांसोबत हृदयालाही नुकसानदायी होऊ शकते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढू शकते.
यावर एकमेव उपाय म्हणजे इअरफोनचा वापर कामाशिवाय करणे टाळणे किंवा कमीच करणे.
Published By -Smita Joshi