घराघरातील शान म्हणजे मायक्रोवेव्हचा पटकन पदार्थ तयार करण्यासाठी तर पदार्थ झटकन गरम करण्यासाठीही वापर केला जातो. पण मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टीकच्या भांड्यात अन्न गरम करणं धोक्याचं ठरू शकतं. मायक्रोवेव्ह सेफ किंवा टप्परवेअरची प्लास्टीकची भांडी अन्न गरम करण्यासाठी सर्रास वापरली जातात. अनेकदा हॉटेलच्या प्लास्टीक कंटेनरमध्ये अन्न गरम केलं जातं. पण प्लास्टीक आरोग्यासाठी फार घातक ठरू शकतं.
या प्लास्टीकमध्ये अनेक घातक रसायनं असतात. या भांड्यांमध्ये अन्न गरम केलं तर या रसायनांचा अंश अन्नात उतरतो. प्लास्टीकचा दर्जा चांगला नसेल तर ते वितळूही शकतं. म्हणून कमी दर्जाचं प्लास्टीक कधीही वापरू नये.
जागतिक आरोग्य संघटनेनंही प्लास्टीकचा वापर आरोग्याला घातक असल्याचं म्हटलंय. प्लास्टीकमध्ये 800 प्रकारची घातक रसायनं असतात. ही रसायनं शरीरात गेली तर त्याचे भयंकर परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.
या घातक रसायनांमुळे स्थूळपणा, मधुमेह, कॅन्सर अशा व्याधी जडू शकतात. हार्मोन्सचं असंतुलन, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर या रोगांनाही निमंत्रण मिळू शकतं. लहान मुलांच्या आरोग्यासाठीही प्लास्टीक चांगलं नसतं. त्यामुळे तुम्ही प्लास्टीकच्या मायक्रोवेव्ह भांडी टाळाच. त्याऐवजी काचेच्या भांड्यांमध्ये अन्न गरम करायला प्राधान्य द्या.
प्लास्टीक कितीही चांगल्या दर्जाचं असलं तरी त्यात घातक रसायनं असतातच. त्यामुळे गरम करण्यासाठी प्लास्टीकच्या भांडींना नकार द्या आणि स्वस्थ राहा.