दिवाळी म्हटली की स्वयंपाकघरात घमघमाट सुटतो.... बायका मन लावून दिवाळीचा फराळ तयार करण्यास सुरु करतात. चकल्या, करंज्या, शंकरपाळी, मठरी, शेव तयार करण्यासाठी अगदी उत्तम दर्जेच्या वस्तू वापरल्या जातात..मात्र एक मोठी चूक घडते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याची. जर आपणही ही चूक करत असाल तर याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामुळे गंभीर आजाराचा धोका असतो.
दिवाळीत तयार केले जाणारे अनेक पदार्थ तळलेले असतात आणि अशात तेल टिपण्यासाठी अनेक जण घरात रद्दी म्हणून पडलेले असणारे कागद किंवा वर्तमानपत्र वापरतात. त्यावर पदार्थ पसरवले जातात आणि गार झाल्यावर डब्ब्यांमध्ये भरले जातात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण यासाठी वापरली जाणारी शाही आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
सोशल मीडियावर देखील हा दावा केला जात आहे आणि लोक सर्वांना सावध करत आहे आणि सांगत आहे की यामुळे कसला धोका अधिक वाढतो?
▪ मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. अशात शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने कॅन्सरचा धोका देखील असतो.
▪ शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडत असतात परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. याचा थेट परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.
▪ वर्तमानपत्रामधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतूलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.
▪ तसेच काही लोकांचा गैरसमज आहे की न्यूजपेपरपेक्षा मासिकाचा कागद अधिक दर्जेचा असतो पण जाणून घ्या की हा कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात.
▪ आपण पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा किचन पेपर टॉवेलचा वापर करा.
▪ मात्र कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा.