स्नायूंना पीळदार बनवण्याचं तुमचंही स्वप्न आहे का? सेलिब्रिटींचे पीळदार स्नायू, सिक्स पॅक अॅब्ज बघून असंच काहीतरी आपणही करावं, असं वाटून जातं.
यासाठी नेमकं काय करावं हे मात्र कळत नाही. त्यातच अनेकांना जीममध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्याघरी व्यायाम करून तंदुरूस्त शरीर घडवू शकता. या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
* बळकट स्नायू घडवण्यासाठी व्यायाम करायला हवा. स्नायूंच्या बळकटीसाठी सर्वात सोपा व्यायाम म्हणजे धावणं. धावल्याने संपूर्ण शरीराचा व्यायामहोतो. शरीर बळकट व्हायला मदत होते. दररोज क्वॅट्स केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात. पुश अप्स केल्याने हात आणि छातीचे स्नायू बळकट होतील. क्रंचेस केल्याने पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळेल. यासोबत लेग ड्रॉप, साइड प्लँकसारख्या व्यायामप्रकारांनी स्नायू बळकट करता येतील.
* दररोज अर्धा तास ब्रिक्स वॉकिंग करा किंवा धावा.
* क्वॅट्स करण्यासाठी सरळ उभे राहा. दोन्ही हात समोरच्या बाजूला सरळ रेषेत ठेवा. गुडघे वाकवा. खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा. आता श्वसनावर लक्ष केंद्रित करून मूळ स्थितीत या. 10 ते 15 मिनिटं हा व्यायाम करा.
* पुश अप्ससाठी सुरूवातीला वॉर्म अप करा. आता पोटावर झोपा. दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर टेकवा. शरीर वर उचला, पुन्हा खाली न्या. असं 30 वेळा करा.
* क्रंचेस करण्यासाठी जमिनीवर सरळ झोपा. आता दोन्ही हात कानांच्या मागे ठेवा. पाय दुमडून घ्या. आता शरीराचा पाठीपर्यंतचा भाग वर उचला. पुन्हा खाली न्या. असं 30 वेळा करा.
* यासोबतच आहारविहारावर लक्ष केंद्रित करून तुम्ही स्नायूंना बळकटी देऊ शकता. यासाठी फिटनेस ट्रेनरची मदत घेता येईल.