गुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गुडची' 'गरोळ' आणि 'गरुड'ही गुळवेलची आणखी काही नावं आहेत. या वनस्पतीचं कंद आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. मात्र या वनस्पतीची पानंही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरीन गिलोइन, गिलोनीन रासायनिक गुणद्रव्यं आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानात आलेला आहे.
या वनस्पतीचं खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असतं. या अनोख्या गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये वनस्पतीचा उपयोग केला जातो. कुठलीही व्याधी अशी नाही जी गुळवेलीमुळे बरी झाली नाही. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्यादींमध्ये गुळवेलीचा उपयोग केला जातो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.